टिप्पणी: बोरी दुर्घटनेचा बोध आपण घेणार आहोत काय?

नरेंद्र तारी
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

बोरीतील वीज खात्याची दुर्घटना ही आपल्यासाठी बोध देणारी आहे. एकूणच वीजवहन आणि व्यवस्था यावर बोट ठेवणारी आहे. तिघांचे बळी ही साधी बाब नाही, त्यावर सरकारकडून विचार व्हायला हवा. अशा प्रकारच्याच नव्हे, तर इतर दुर्घटनाही आपण कशा टाळू शकतो, त्यावर ही कार्यवाही व्हायला हवी. त्यासाठी अशा घटना आपण साधेपणाने नव्हे तर नेमकेपणाने घ्यायला हव्यात.

एखादी दुर्घटना घडल्यावर आपण लगेच जागे होतो. अशा दुर्घटनेवर एक - दोन दिवस चर्चा होते, राग, चीडचीड व्यक्त केली जाते, प्रसंगी आकांडतांडवही केले जाते. नंतर दोन दिवसांनी सगळे काही शांत होते. अपघातानंतर पुढे काय झाले, काय होणार आहे, त्याचा पाठपुरावा सहसा कुणी करायला मागत नाही, आणि अशा दुर्घटनाही विस्मृतीत जातात. पण, या दुर्घटनांमुळे ज्या कुटुंबाला जे काही भोगावे लागलेले असते, ते मात्र सदा सर्वकाळ या कुटुंबाच्या सोबतीला राहते, कायम टोचण्या देत.

 

बोरीत गेल्या आठवड्यात वीज खात्याच्या खांबवाहू ट्रकला अपघात झाला आणि तिघेजण जाग्यावरच संपले. अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले, तर इतर चारजण सुदैवाने बचावले. अपघात झाल्यानंतर नेहमीप्रमाणे हळहळ व्यक्त झाली, प्रशासनावर शरसंधान करण्यात आले, मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, आणि इतर बरेच काही त्या काळाला अनुरूप असे प्रकारही घडले. मात्र, नंतर काय, हा सवाल आजही तसाच अनुत्तरित आहे. मुळात ट्रकमधून वीज खांबांची वाहतूक करताना ट्रकच्या उघड्या हौद्यात खांबांसोबत कामगारांना बसण्यासाठी कायदेशीर परवानगी आहे काय? परवानगी नाही तर मग गेली अनेक वर्षे हा प्रकार सर्रासपणे कसा काय सुरू आहे. आता अपघात झाल्यानंतर ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे. सरकार पातळीवर तर एवढी वर्षे चाललेय, आता चालायला काय हरकत आहे, असाच हा प्रकार आहे. चालतोय ना कारभार, मग त्यात आणखी नियमांचा आणि कायद्याचा खोडा का घालायचा, अशी मखलाशी केली जाते, आणि मग गंभीर स्वरुपाचा अपघात होतो, चक्क बळी जातात, तेव्हाच प्रशासन जागे होते. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे खुद्द मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून मृतांना त्वरित नुकसान भरपाई देण्याबरोबरच अनुकंपा तत्त्‍वावर मयताच्या कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी देण्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या व वीजमंत्र्यांच्या या ताबडतोब निर्णयाचे अभिनंदन हे करायलाच हवे. अभिनंदन केले तरी प्रशासनाचे काय? बोरीतील अपघाताचा बोध वीज खात्याने घेतला काय? अपघातानंतर दोनच दिवसांत वीज खात्याच्या दुसऱ्या एका ट्रकमधून वीज खांब नेताना चक्क ट्रकच्या हौद्यात कामगार उभे असलेले दिसले. अरे...कालच तर तिघाजणांचे बळी गेले आहेत, आणि आताही पुन्हा त्याचीच री..! काय प्रकार आहे बुवा हा! या प्रकाराची चौकशी होईलच, पण निदान असे प्रकार टाळायला नको का, याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यायला नको का? 

 

वीज खात्याच्या कारभारासंबंधी जास्त काही लिहिणार नाही. खंडित वीज पुरवठ्याची समस्या गोवाभर कशी सतावते आहे, वीज दुरुस्तीच्या नावाने कशा पाट्या टाकल्या जात आहेत, हे सर्वांना माहीत आहे. दरवर्षी सरकारकडून वीज खात्यासाठी करोडो रुपयांच्या निधीची तरतूद अंदाजपत्रकात केली जाते. पण, सुरळीत वीजवहनातील गोंधळ काही दूर होत नाही. हा गोंधळ आधी निकाली काढायला हवा. महाराष्ट्रासारख्या राज्यात सर्वांना पुरेशी वीज मिळत नाही, म्हणून अधूनमधून वीजपुरवठाच बंद करण्याची पाळी त्या सरकारवर येते. बऱ्याचदा एखाद्या भागातील वीजपुरवठा दिवसभर बंद ठेवला तर तेथील जनजीवनाची काय स्थिती झाली असेल हे आपण निदान अनुभवू तरी शकतो. कारण, वीज नसल्यास घरगुती उपकरणे तर चालणार नाही, आपण सर्वस्वी विजेवर अवलंबून आहोत. मिक्‍सर चालू झाला नाही, तर आमटीचे काय, हा मोठा प्रश्‍न आपल्यासमोर आ वासून उभा राहतो, पण तेथे तर विजेची कपात चालली आहे. बऱ्याचदा दिवसभर वीज बंद ठेवली जाते. खंडित विजेमुळे उद्योग व्यवसायावर विपरित परिणाम. आपण त्यामानाने खूप नशिबवान. कारण, महाराष्ट्रासारखी स्थिती गोव्याची नाही. तरीपण एवढ्या मोठ्या आर्थिक तरतुदीनंतरही वीजवहनातील चुका काही दुरुस्त होत नाहीत, त्याचे काय?

 

वीज खात्यातील खंडित वीजपुरवठा, ग्राहकांच्या तक्रारी निवारणाबाबत एकूणच आनंदीआनंद हा कालचा आणि आजचा विषय नाही. सरकारे आली आणि गेली. पण, छोट्याशा गोव्यात विजेच्याबाबतीत स्वयंपूर्णता अजून काही दृष्टिपथात येत नाही. इतर राज्यांच्या विजेवर आपण अवलंबून आहोत. उद्या पाण्याप्रमाणे विजेवरही निर्बंध आले तर काय होईल, याचा विचार करायलाच नको. सध्या पाण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्राकडून गोव्याला धारेवर धरले जातेय, उद्या आपण ज्यांच्याकडून वीज उधार घेतलीय, त्यांनीच जर हात वर केले तर काय, हा खरा प्रश्‍न आहे, त्यामुळेच तर वीज निर्मितीचे शंभर टक्के उद्दीष्ट आपण ठेवणे गरजेचे आहे. दुर्दैवाने आजपर्यंत अशा विचाराकडे आपण पोचतच नाही. निदान आता तरी त्यावर सकारात्मक विचार व्हायला हवा.

 

बोरीतील दुर्घटना वीज खात्यासाठी एक उदाहरण आहे. आताच सुधारा, असा संदेशच देऊन गेली आहे. कारण, एकाचवेळी तिघांचा बळी जाणे हे मृत झालेल्या कुटुंबियांसाठी जेवढे क्‍लेषकारक आहे, तेवढेच ते ऐकणाऱ्यांसाठीही आहे. उघड्या हौद्यात वीज कामगारांना बसवून वाहतूक करणे, वळणावर ट्रक उलटून पडणे आणि ज्या ठिकाणी अपघात झाला, तेथील रस्त्याची रचना हे सर्व पाहता, या अपघाताला बरेच घटक कारणीभूत आहे. आम आदमी पक्षाने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहेच, पण या तक्रारीचा पाठपुरावा व्हायला हवा, कारण भविष्यात अशाप्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होता कामा नये.

 

राज्यातील वीजवहन आणि वितरणासंबंधी बरेच धोरणात्मक निर्णय अजून अपेक्षित आहे. उघड्या वीजवाहिन्या बदलून त्याजागी आता केबलमधील तसेच भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे फार पूर्वीच व्हायला हवे होते. कारण आतापर्यंत विजेशी संबंधित दुर्घटनात बऱ्याच लोकांचे बळी गेले आहेत. तरीपण ही बाब दिलासादायक आहे. खुद्द वीज खांबांवर काम करणाऱ्यांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. कारण आयुधे आणि साधने नसल्याची ओरड केली जाते, त्याकडे कटाक्ष ठेवायला हवा.

 

गोवा हे देशातील छोटेसे राज्य असल्याने आपण सर्वचबाबतीत इतरांसाठी आदर्श निर्माण करू शकतो. पण, दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. सरकार मग ते कोणत्याही पक्षाचे असेना का, एखाद्या समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न अभावानेच दिसतो. दुर्घटना असो वा आपत्कालीन वेळ असूदे, सरकारने भक्कमरीत्या पाठीशी उभे राहणे ही सर्वसामान्यांची अपेक्षा असते. या अपेक्षेला जो जागतो, तोच खरा.

 

अपघातात अकाली आणि आकस्मिक ज्यांचे बळी जातात, त्याचे दुःख हे संबंधित कुटुंबियांनाच भोगावे लागते. अशा कुटुंबियांशी प्रत्यक्ष संबंध नसलेले काही काळ हळहळतात. पण, ज्या मातेने पुत्र गमावला, ज्या स्त्रीचा पती गेला असेल आणि ज्या मुलांचा आधार हरपला असेल, त्यांचे दुःख हे त्यांच्यापुरतेच मर्यादित असते. हे दुःख अशा लोकांना पुढे जीवंत असेपर्यंत सतावते. शेवटी कुणी कुणाचा नसतो हो. एखाद्या दुर्घटनेनंतर सांत्वन होते, हळहळ व्यक्त केली जाते, सरकारी सहाय्यही मिळते. पुढे सगळे काही शांत, पण ज्याचे जळते, त्यालाच कळते. एखादी दुर्घटना घडल्यावर आपण हळहळतो, पुढे अशा घटना आपल्या विस्मृतीतही जातात, पण अपघातात हकनाक बळी गेलेल्या मृतांच्या कुटुंबियांचे काय?

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या