खेड्यात देश आहे, देशात नाही खेडे.....

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

भारताच्या काना कोपऱ्यात काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत फिरताना माझ्या भारत देशाचा नकाशा मला आग्रहाने सांगतो प्रिय माझा भारत देश! गोष्ट खरी आहे. कितीही असो जाती धर्म आणि तऱ्हेतऱ्हेचे लोक आणि वेगवेगळ्या भाषा तरीही त्या विविधतेत आम्हाला एकतेचा संदेश मिऴतो.

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझे माझ्या देशावर प्रेम आहे. ही प्रार्थना म्हणत आम्ही प्राथमिक शाळा, मग ती ओठावर घोळवीत हायस्कूलला पोचलो आणि नंतर महाविद्यालयीन झाल्यानंतर देखील खोल आमच्या ह्रदयात जाऊन बसली. भारताच्या काना कोपऱ्यात काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत फिरताना माझ्या भारत देशाचा नकाशा मला आग्रहाने सांगतो प्रिय माझा भारत देश! गोष्ट खरी आहे. कितीही असो जाती धर्म आणि तऱ्हेतऱ्हेचे लोक आणि वेगवेगळ्या भाषा तरीही त्या विविधतेत आम्हाला एकतेचा संदेश मिऴतो.

सुजलाम सुफलाम माझा देश. नदी, डोंगर आणि हिरवीगार वसुंधरेचे वरदान लाभलेल्या माझ्या देशावर जेव्हा कोरानासारखा संसर्ग विषाणू थैमान घालतो तेव्हा आम्ही खडबडून जागे होतो. काय आणि कशी ही अवकळा आपल्यावर येऊन ठेपली त्याचा आपल्याला सुगावही लागू नये याची खंत होते. कारणे कितीही आणि काहीही असू देत पण अशा वेळी आमची निरीक्षणशक्ती तीव्र वेगाने फिरू लागते. माझा भारत देश गावा गावात वसला आहे असे आपण म्हणतो. कोरोना संसर्ग फैलावला तेव्हा आपल्याला एक केविलवाणे दृश्य बघायला मिळाले. आपल्या पोटासाठीची कमाई करण्यासाठी गावागावांतून लोक शहराकडे आले होते ते आपल्या संरक्षणासाठी बायकामुलांना घेऊन पायी आपल्या गावी परतू लागले तेव्हा मला वाटले यांनी निराधार का बनावे? देशाच्या पाठीवर कोठेही त्यांना राहण्याची आणि त्यांच्या रक्षणाची सोय असलीच पाहिजे. ती माझी, तुझी, आपली आणि सर्वांची जबाबदारी आहे असेच समजावे लागेल. सारे भारतीय माझे बांधव आहे. माझ्या ह्रदयातून हा हुंकार बाहेर फुटला.
माझा गोवा पाहायचा झाल्यास आणि निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आस्वाद घ्यायचा असल्यास गावात आल्याशिवाय पर्याय नाही. गावातील महिलांनी संस्कृती आणि राहणीमान राखून ठेवले आहे. लॉकडावनच्या वेळी आणि कोरोनाच्या भितीपोटी काही बदल जरूर घडले. पण हे सगळे पूर्ववत होणार आहे याची खात्री गावातील लोकांना आहे आणि त्या नजरेने आपल्या आरोग्याची निगा राखणे प्रत्येकजण आपल्या दैनंदिन जीवनात प्राधान्य देऊ लागलेत.

मास्क घातल्याशिवाय कोणी बाहेर जात नाही. दुकान अथवा गाड्यावर काही खरेदी करताना सामाजिक अंतर राखून राहतात. आपल्या वृद्ध आई वडिलांना तरुण मुले घरा बाहेर पाठवीत नाही, अशी खबरदारी घेतल्यास आणि जबाबदारीचे पालन केल्यास या संसर्गातून आपण लवकर मुक्त होऊ शकतो. यांना हे एव्हढे ज्ञान कोणी  दिले? कोणी कौंन्सिलर नाही आला कोणाला काही सूचना द्यायला. एक गोष्ट जी आपण नेहमीच सांगत आलो ती म्हणजे, घरातील एका महिलेला साक्षर करणे म्हणजे सबंध घर साक्षर करणे. घरच नव्हे तर शेजारी आणि इतर लोकांना देखील समजावून सांगण्याचे काम एखादी स्त्रीच चांगल्या तऱ्हेने करू शकते यावर कोणाचे दुमत असू नये. कोरोनाचीच गोष्ट घेतली तर आज गावातील प्रत्येक घरात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीचे घरगुती उपाय सुरू आहेत. तुळस घरासमोरील अंगणात भरपूर आहेत. खोकल्यावर परिणाम साधणारी प्रभावी वनस्पती घराच्या आजूबाजूलाच उपलब्ध आहे. सुरुवातीला जेव्हा कोरोनाने गोव्यात प्रवेश केला तेव्हा त्याची लक्षणे काय आणि त्यावर उपाय काय याची विस्तृत माहिती कोणालाच नव्हती आणि ज्यांना ठाऊक होती त्यांनी स्त्रियांना विश्वासात घेण्याचा मोठेपणा दाखविलाच नाही. आज मला वाटते गावातील काही स्त्रियांना याची जुजबी माहिती जरी दिली असती तर घरगुती उपचारांवर एव्हाना आमचा गाव कोरोनामुक्त बनला असता. आजही येथील स्त्रिया हेच करतात. चुलीवरील आधनाच्या तापलेल्या पाण्याची वाफ घेतात, कुटुंबातील इतरांना देतात. घर स्वच्छ ठेवतात. सभोवतालचा परिसर साफ ठेवतात. मास्काची निर्मिती घराघरांतून होते. पदार्थ चांगले शिजवून ताटात वाढतात आणि ज्याना अक्षर ओळख नाही त्या देखील आपल्या मुलांच्या शिक्षणात व्यस्त असतात.

याच बायकांनी गावात संस्कृती टिकवून ठेवली. फुगडी, धालो सारख्या गीतांची रचना मागच्या पिढीतील बायकांची. त्यांच्या ओठावर या रचना घोळत राहिल्या. त्या रचनांचे संकलन आता होत आहे. पुस्तकी शिक्षण अंगी नसले तरी त्यांना जी माहिती आहे ती आपल्याला नसेल. आज त्यांनी आपल्या परीने कोरोना पासून संरक्षण करून घेतले आहे. पण अजून त्यांच्या रोजगाराची सोय झालेली नाही. त्यांच्या अंगी विविध कला आहेत. शिवण शिलाई त्यांना ठाऊक आहे. विविध पाककृती करण्याचे ज्ञान त्यांना आहे. पण जाहिरात करून गिऱ्हाईक जोडून आणण्याची कला त्यांच्याकडे नाही.
गावात स्वयं सहाय ग्रुप पुष्कळ आहेत. शहरात महिला मंडळे आहेत. अशा लोकांनी या महिलांची तळमळ हेरून त्यांच्या निर्मितीला गिऱ्हाईक मिळवून द्यावीत म्हणजे त्यांना आपली सुस्थिती परत मिळेल. त्यांना फुकट पैसा नको. त्यांच्या कलेची कदर केलेली त्यांना हवी आहे.  

आपण त्यांच्या निराशेचे कारण बनू नये. आम्ही सुशिक्षित आहोत. नोकरी करणाऱ्यांकडे पैसा येतो. मध्यंतरी तर आठवड्याचे बाजारही बंद झालेत. सध्या पावसामुळे चांगले पीक नाही. महागाई आभाळाला भिडली. सारे भारतीय माझे बांधव आहेत.

- हेमा नायक

संबंधित बातम्या