डिचोलीत देखाव्यातून म्हादईच्या अस्तित्वाचे चित्रण

Dainik Gomantak
सोमवार, 30 डिसेंबर 2019

पाजवाडा येथून लामगावच्या दिशेने जाताना उजव्या बाजूने रस्त्याला टेकूनच हा भव्य देखावा उभारण्यात आला आहे.

तुकाराम सावंत

डिचोली

डिचोलीत सध्या नाताळ सणाचा जल्लोष सुरू असून नाताळनिमित्त शहरात विविध ठिकाणी आकर्षक गोठा सजावट, येशू जन्म आदी देखावे उभारण्यात आले आहेत. मात्र, डिचोलीतील एक युवक किंगस्ली डिसोझा यांनी लामगाव येथे टाकाऊ वस्तूंपासून भव्य देखावा उभारलेला असून या देखाव्यातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच एकतेचा संदेश देण्यात आला आहे. पाजवाडा येथून लामगावच्या दिशेने जाताना उजव्या बाजूने रस्त्याला टेकूनच हा भव्य देखावा उभारण्यात आला आहे. टायर, बाटल्या आदी टाकाऊ वस्तू आणि पर्यावरणपूरक वस्तू त्यांनी सजावट करून आकर्षक देखावा साकारलेला आहे. सध्या म्हादईवर ओढवलेले संकट आणि रस्ते आदी बांधकामांमुळे होणारा वृक्षसंहार यावर या देखाव्यातून प्रकाश टाकलेला आहे. हा देखावा सध्या डिचोलीत आकर्षक ठरत असून, सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
येत्या ५ जानेवारीपर्यंत या देखाव्याचे दर्शन घेण्याची संधी जनतेला मिळणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास वेळीच थांबवला नाही, तर भविष्यात धोका अटळ असल्याचे या देखाव्यातून स्पष्ट होत आहे.

म्हादईवरील संकट
सध्या गोव्यात म्हादईचा विषय तापला आहे. गोव्याची जिवनदायीनी असलेल्या म्हादईचे पाणी कर्नाटकात वळविण्यास गोमंतकियांकडून विरोध वाढत आहे. म्हादईचे पाणी कर्नाटकात वळवले, तर भविष्यात म्हादईचे अस्तित्व संकटात येणार हे निश्‍चित आहे. नदी आटून गोव्याच्या दिशेने नदीचे पात्र कसे कोरडे पडणार, याचे ज्वलंत चित्र किंगस्ली डिसोझा यांनी आपल्या देखाव्यातून मांडले आहे. या देखाव्यातून ‘म्हादई वाचवा’ असा संदेश त्यांनी दिला आहे. सध्या कॉंक्रीटीकरणामुळे वनसंपत्तीवर संक्रांत आली आहे. रस्ते आदी बांधकामांसाठी वृक्षसंहार करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणावर घाला पडत आहे. दुसऱ्याबाजूने रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यावरही किंगस्ली यांनी आपल्या देखाव्यातून प्रकाश टाकला आहे.

येशू ख्रिस्तांनी दिलेला संदेश यामुळे आपणाला हा देखावा करण्यास स्फूर्ती मिळाली. जवळपास वीस दिवस रात्रंदिवस मेहनत घेवून हा देखावा आणि सजावट उभारण्यात आली आहे. वेळ मिळेल तेव्हा या कामात वडिल किस्तू आणि काही मित्रांनी मदत केली. येशू ख्रिस्तांचा संदेश आणि पर्यावरणाचे संवर्धन ही संकल्पना नजरेसमोर ठेवून हा देखावा उभारलेला आहे. प्रत्येकांनी पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
- किंगस्ली डिसोझा, डिचोली

संबंधित बातम्या