विद्यार्थ्यांविनाच वाजणार यंदा शाळेच्या शेवटच्या दिवसाची घंटा

Dainik Gomantak
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

कोरोनामुळे मुल्यांकन पद्धतीत बदल करण्याबरोबरच भविष्य काळात मुल्यांकन पद्धतीचे बदलते आवाहन शिक्षण संस्थांसमोर उभे केले आहे.

काणकोण, 

राज्यात कोविड-१९ च्या टाळेबंदीमुळे यंदा  शैक्षणिक वर्षाची शेवटची घंटा विद्यार्थ्यांविना वाजणार आहे. मात्र, शैक्षणिक संस्थांना पहिली ते नववी वर्गातील विद्यार्थ्यांचा निकाल शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापूर्वी म्हणजे ३० एप्रिलपूर्वी जाहीर करावा लागणार आहे. यापूर्वी दरवर्षी शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून निकाल जाहीर करण्याची पद्धत होती. काही विद्यालये विद्यार्थ्यांचा निकाल पोस्टामार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोचवित होते. मात्र, टाळेबंदीमुळे विद्यार्थ्यांना शेवटच्या दिवशी सामाजिक अंतरामुळे शाळेत बोलावून मुलांच्या हातात निकाल देण्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांचा निकाल पोस्टामार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचा एक मार्ग ग्रामीण भागात खुला  आहे.
यंदा दुसऱ्या सत्राच्या अभ्यासाचे मुल्यांकन न करताच पहिले सत्र, उपक्रम, तोंडी परीक्षा याच्या सरासरी गुणाच्या आधारे विद्यार्थ्यांचा अभ्यासातील प्रगतीचा आलेख मांडण्याची वेळ शिक्षण संस्थांवर आली आहे. कोरोनामुळे मुल्यांकन पद्धतीत बदल करण्याबरोबरच भविष्य काळात मुल्यांकन पद्धतीचे बदलते आवाहन शिक्षण संस्थांसमोर उभे केले आहे.
काणकोणमधील काही शैक्षणिक संस्थांनी हा मार्ग अमलात आणण्याचे ठरवले आहे. सर्वच शैक्षणिक संस्थांनी पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करून विद्यार्थ्यांचे या वर्षाचे प्रगती पुस्तकही तयार ठेवले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक अधांतरीच आहे. या परीक्षा नक्की केव्हा होणार हे गोवा बोर्ड किंवा शिक्षण खात्याने स्पष्ट केलेले नाही. दहावीच्या परीक्षेची घोषणा दहा दिवसांपूर्वी करण्यात येणार असल्याचे बोर्डाने शिक्षण संस्थांना कळवले आहे. ३ मेपर्यंत राष्ट्रीय लॉकडाऊन आहे.त्यामुळे त्यापूर्वी परीक्षा घेण्याचे ठरविल्यास समाज अंतर ठेऊन परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठी परीक्षा केंंद्रे व उपकेंद्रात वाढ करण्याची पाळी गोवा बोर्डवर येण्याची शक्यता आहे. अनुषंगाने पर्यवेक्षक व अन्य मनुष्यबळात वाढ करावी लागणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी काणकोण व पैंगीण अशी दोन परीक्षा केंद्रे होती.

संबंधित बातम्या