मुंबईतील विज्ञान विषयक स्पर्धेत शांता विद्यालयाला द्वितीय बक्षीस

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 4 मे 2020

शिक्षक नवनाथ सावंत यांचे लाभले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

मुंबईतील स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना शिवोली शांता विद्यालयाचे शिक्षक

कुचेली : सडये-शिवोली येथील विद्याभारती संचालीत श्री शांता विद्यालयाने स्टॅम लर्निंग प्रायव्हेट लि.,तर्फे मुंबई येथे घेण्यात आलेल्या विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत शांता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी द्वितीय पारितोषिक प्राप्त केले.

स्टॅम लर्निंग प्रायव्हेट लि., यांच्यातर्फे १० फेब्रुवारी रोजी जिल्हा पातळीवर विविध विज्ञान विषयक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांसाठी गोव्यातील एकूण १२ विद्यालयांतील केवळ ५ विद्यालयांची निवड करण्यात आली होती. विज्ञान प्रतिकृती बनविण्याच्या स्पर्धेत प्रथम तर रोबोट मॉडेल बनविण्याच्या स्पर्धेत शांता विद्यालयाला द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले होते. विज्ञान प्रतिकृती बनविण्याच्या व प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी मुंबईला जाण्याची संधी मिळाली होती. यावेळी विद्यार्थ्यांसोबत शिक्षक नवनाथ सावंत शिक्षक हे ही मुंबईला गेले होते.

मुंबई येथील ग्रांट मॅडिकल कॉलेज, स्टुडंट असोसिएशन जिमखाना, मरीन येथे २० फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रथमच राज्य पातळीवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात गोवा, महाराष्ट्र, गुजरात अशा तीन राज्यांमधून एकूण ३० विद्यालय सहभागी झाले होते. अभिमानाची बाब म्हणजे गोव्यातील दोन विद्यालयांची निवड झाली होती. त्यात होते, सडये येथील शांता विद्यालय.

शांता विद्यालयातील कशीश दाभोलकर, मयंक तेंडुलकर, शाश्वत दुबे, अब्रार खातीब, ॐकार दुर्भाटकर, रवीकिशन पंडित या विद्यार्थ्यांची विज्ञान प्रश्नमंजुषा व प्रकल्प बनविण्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली होती. विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत शांता विद्यालयाला दुसरे पारितोषिक प्राप्त झाले असून विजेत्यांना प्रमाणपत्र विद्यालयाला १५ हजार रुपये बक्षीस प्राप्त झाले. प्रकल्प स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्रे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. नवनाथ सावंत यांच्या मार्गदर्शनामुळे तसेच मुख्याध्यापक व इतर शिक्षक, शिक्षिकांच्या पाठिंब्यामुळे विद्यालयाला यशाची पायरी गाठता आली. शिक्षक नवनाथ सावंत व विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

 

संबंधित बातम्या