डिचोली अपघातात दुचाकीस्वाराचे दोन्ही पाय निकामी

Dainik Gomantak
गुरुवार, 30 एप्रिल 2020

अपघातात गंभीर जखमी झालेल्या ४७ वर्षीय व्यक्तीचे नाव प्रकाश मंगेश जल्मी असे असून ते विर्डी-साखळी येथील आहेत. जखमी प्रकाश याच्यावर सध्या बांबोळी येथील गोमेकॉत उपचार सुरू असून चाकाखाली चिरडल्याने त्यांचे दोन्ही पाय निकामी झाल्याची माहिती मिळाली आहे.

डिचोली

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्कलजवळ ट्रकची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात आज (गुरुवारी) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या ४७ वर्षीय व्यक्तीचे नाव प्रकाश मंगेश जल्मी असे असून ते विर्डी-साखळी येथील आहेत. जखमी प्रकाश याच्यावर सध्या बांबोळी येथील गोमेकॉत उपचार सुरू असून चाकाखाली चिरडल्याने त्यांचे दोन्ही पाय निकामी झाल्याची माहिती मिळाली आहे. टाळेबंदी लागू झाल्यानंतर डिचोली शहरात घडलेला हा पहिलाच भयानक अपघात आहे.
यासंबंधीची माहिती अशी की, येथील आर्कावरून आलेला जीए - ०१ - झेड - ४९३३ या क्रमांकाचा दगडांनी भरलेला ट्रक डिचोली बसस्थानकाच्या दिशेने जात होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वळसा घालून ट्रक पुढे जात असता समोरील जीए - ०४ - एम - ४३२८ या क्रमांकाच्या दुचाकीला ट्रकची धडक बसली. त्यात दुचाकी ट्रकखाली सापडून ट्रकचे चाक प्रकाश जल्मी यांच्या पायांवरून गेले. त्यात प्रकाश यांच्या दोन्ही पायांना जबर मार बसला. एक पाय तर छिन्नविछिन्न झाला होता. पायातून मोठ्या प्रमाणात रक्‍तस्त्राव झाला. अपघात घडला त्या ठिकाणापासून साधारण २० मीटर अंतरावर पोलिसांची नाकाबंदी होती. लागलीच रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमी प्रकाश यांना डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून जखमी प्रकाश यांना पुढील उपचारार्थ गोमेकॉत पाठवण्यात आले. डिचोली पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला. पोलिसांनी ट्रकचालकाविरुध्द निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किशोर रामानंद पुढील तपास करीत आहेत.

जंक्‍शन असुरक्षीत
श्री शांतादुर्गा विद्यालयासमोरील जंक्‍शनवर चुकीच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आल्याने हे जंक्‍शन वाहतुकीस असुरक्षीत बनले आहे. आज झालेल्या अपघातावरून हा दावा खरा ठरला आहे. आतापर्यंत या जंक्‍शनवर लहान-सहान अपघात घडले आहेत. मात्र, आजचा अपघात भयानक होता. असे डिचोली बचाव अभियानचे सचिव नरेश कडकडे यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविताना पालिका तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने योग्य नियोजन केलेले नाही. त्यामुळेच हे जंक्‍शन अपघातास आमंत्रण ठरण्याची भीती यापूर्वी डिचोली बचाव अभियानने व्यक्‍त केली होती. मात्र, त्याकडे संबंधितांनी गांभिर्याने पाहिले नाही. असे अभियानचे सचिव नरेश कडकडे यांनी स्पष्ट करून आजच्या अपघातास पालिका आणि सार्वजनिक बांधकाम खाते जबाबदार असल्याचे म्हटले आहे. अपघातातील जखमीच्या उपचाराचा सर्व भार पालिका आणि बांधकाम खात्याने उचलावा, अशी मागणीही त्यांनी केली. जखमी प्रकाश यांच्या कुटुंबियांनी तसा दावा करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

 

संबंधित बातम्या