पोलिसांची स्कूटर चोरणारा गजाआड

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

पणजी:महिला पोलिसाची स्कूटर चोरणारे दोघे गजाआड
पणजी पोलिसांची कारवाई; चोरट्यांनी एटीएममधून २१ हजार काढले

पणजी:महिला पोलिसाची स्कूटर चोरणारे दोघे गजाआड
पणजी पोलिसांची कारवाई; चोरट्यांनी एटीएममधून २१ हजार काढले
आझाद मैदान येथील पोलिस मुख्यालयासमोरच्या रस्त्यावर उभी करून ठेवलेली महिला पोलिसाच्या स्कूटर चोरीप्रकरणी उत्तर प्रदेशच्या राजीव श्रीराम शर्मा (३७) व वेदराज रामश्रवण सिंग (२५) या दोघांना पणजी पोलिसांनी अटक केली. या स्कूटरच्या डिकीमध्ये तक्रारदाराचे बँक एटीएम कार्ड होते व त्याच्याबरोबर असलेल्या पिन क्रमांकाचा वापर करून २१ हजार रुपये काढले होते. त्याच्याकडून चोरलेली स्कूटर जप्त केली आहे.एटीएम कार्ड व रक्कमेची माहिती मिळवण्यात येत असल्याची माहिती उपनिरीक्षक अक्षय पार्सेकर यांनी दिली.
वाहतूक पोलिस विभागात कामाला असलेल्या महिला पोलिस कांचन वेंगुर्लेकर यांनी पोलिस मुख्यालयासमोर नेहमीप्रमाणे आपली स्कूटर उभी करून ठेवली होती. स्कूटरच्या डिकीमध्ये सामान ठेवल्यानंतर चावी काढण्यास त्या विसरल्या. पोलिस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारवरच त्या ड्युटीला होत्या. डिकीमध्ये त्यांची काही रोख रक्कम, बँकेचे एटीएम कार्ड व त्यामध्ये पिन क्रमांक ठेवला होता. स्कूटरला चावी असल्याचा फायदा उठवून चोरट्यांनी स्कूटर नेली. त्यामध्ये असलेल्या एटीएम कार्डने २१ हजार रुपये काढले. त्यानंतर स्कूटर घेऊन ते पसार झाले. दुपारच्या सुमारास तक्रारदार कांचन यांना त्यांची स्कूटर जेथे उभी करून ठेवली होती तेथे नसल्याचे लक्षात आले. वाहतूक पोलिसांनी ही स्कूटर घेऊन गेले असावे म्हणून त्यांनी पणजी वाहतूक पोलिस कक्षात चौकशी केली. मात्र, स्कूटर सापडली नाही. त्यामुळे त्यांनी पणजी पोलिस ठाण्यात वाहन चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोघा तरुणांना अटक केली व चौकशीत त्यांनी स्कूटर चोरल्याची कबुली दिली. त्यानी चोरलेली स्कूटर पणजीतच ठेवली होती. अधिक चौकशीत संशयित राजीव शर्मा हा उत्तरप्रदेशमध्ये कंत्राटदार असून संशयित वेदराज सिंग हा चालक आहे. राजीव याला कसिनो जुगाराचा नाद असल्याने अनेकवेळा तो गोव्यात जुगार खेळण्यासाठी येतो. वेळोवेळी तो जुगारात हरत होता. एकदिवस जुगारात मोठी रक्कम जिंकू अशा आशेने तो वारंवार येत होता. नववर्षाच्या रात्री तो जुगार खेळण्यास कसिनोवर गेला होता. त्यामध्ये तो मोठी रक्कम हरला. हताश झालेल्या संशयित राजीव याला स्कूटरला चावी असलेली दिसली व ती तो घेऊन पसार झाला होता.

जिल्हा पंचायत निवडणुकीत विरोधकांनी एकत्रित यावे:सरदेसाई

संबंधित बातम्या