पैरात चौगुले खाणीवरील ‘शॉवेल’ला सील

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

वन खात्याची कारवाई, एकोणीस झाडे उन्मळलेल्या अवस्थेत, आजच्या बैठकीकडे लक्ष

चौगुले खाण परिसरात पंचनामा करताना वन खात्याचे अधिकारी. सोबत कंपनीचे अधिकारी, सरपंच सदानंद गावकर आणि मान्यवर.

डिचोली: पैरा-शिरगाव येथील चौगुले खाणीवर बेकायदेशीरपणे डंप उत्खनन होत नसल्याचा निष्कर्ष डिचोलीचे मामलेदार यांनी काढला असतानाच, वन खात्याने या खाणीवर कारवाई करताना ‘शॉवेल’ला (उत्खनन यंत्र) सील ठोकले.काल सायंकाळी उशिरा शिरगावच्या नागरिकांनी केलेल्या तक्रारीला अनुसरुन वन खात्याच्या पथकाने सकाळी खाण परिसराची पाहणी केली.या पाहणीवेळी बेकायदा डंप उत्खनन सुरू असल्याचा संशय असलेल्या परिसरात जवळपास १९ झाडे उन्मळल्याचे वन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. लागलीच वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून कारवाई केली.

पुढील कारवाई होईपर्यंत खाणीवरील कामकाज बंद ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी कंपनीला दिले आहेत. वन खात्याचे क्षेत्रीय वन अधिकारी विवेक गावकर, राऊंड फॉरेस्टर प्रदीप सिनारी आणि वनरक्षक विष्णू आमोणकर यांच्या पथकाने पंचनामा करून ही कारवाई केली. या कारवाईवेळी सेझा (वेदांता) आणि चौगुलेचे अधिकारी तसेच शिरगावचे सरपंच सदानंद गावकर तसेच अजय गावकर उपस्थित होते.या खाणीवर बेकायदा डंप उत्खनन होत नसल्याचा अहवाल, त्यातच आता वन खात्याने केलेली कारवाई यामुळे शिरगाववासियांच्या आरोपाला महत्व आले असून, गेल्या चार दिवसांपासून बंद असलेल्या खनिज वाहतुकीला पुन्हा ग्रहण लागल्यातच जमा आहे.

ई-लिलावाच्या खनिज वाहतुकीच्या नावाखाली पैरातील चौगुले खाणीवर बेकायदा उत्खनन चालू आहे.या शिरगाववासीयांनी केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांच्या निर्देशानंतर खाण आणि भुगर्भ खात्याची भुगर्भतज्ञ कार्व्हालो यांच्यासह मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी काल (मंगळवारी) पैरा येथे जावून चौगुले खाण परिसराची पाहणी केली. चौगुले खाणीवरुन सेझाकडून (वेदांता) फक्‍त ई-लिलावाच्या खनिजाची वाहतूक करण्यात येत आहे. अन्य कोणत्याही बेकायदा कारवाया चालू नाहीत, असे मामलेदार श्री. पंडित यांनी पाहणीनंतर आपल्या अहवालात म्हटले आहे.

मंगळवारच्या पाहणीवेळी खाण परिसरात उन्मळून पडलेल्या लहान-मोठ्या झाडांकडे लक्ष वेधले असता, हा विषय आमच्या अखत्यारित येत नसल्याचे खाण आणि भुगर्भ खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगून वेळ मारुन नेली. त्यामुळे आम्ही रात्रीच वन खात्यानडे संपर्क केला. त्यानुसार वन खात्याने कारवाई केली. अशी माहिती शिरगावचे सरपंच सदानंद गावकर यांनी देवून, खनिज उत्खननाबाबतीतच्या अहवालाबाबत साशंकता व्यक्‍त केली आहे. तर सरकाने डंप खनिजाची वाहतूक करण्यासंबधी अद्याप धोरण तयार केलेले नाही. फक्‍त ई- लिलाव केलेल्या खनिजाची वाहतूक करता येते. असे नागरिक अजय गावकर यांनी सांगून, चौगुले खाणीवरुन बेकायदेशीरपणे डंप खनिजाची वाहतूक होत असल्याचा दावा केला.

मांगूरहिलमध्‍ये हॉटमिक्‍स डांबरीकरण कामास सुरवात

आजच्या बैठकीकडे लक्ष..!
खनिज वाहतुकीवरुन निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी पुर्वनियोजितप्रमाणे गुरुवारी (ता. ३०) दुपारी अडीच वाजता डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. खाण कंपन्यांकडून भरणा न केलेल्या थकीत पाण्याच्या बिलांच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक होणार आहे. या बैठकीत पाणी बिलांचे भवितव्य स्पष्ट होण्याची शक्‍यता असतानाच, आता खाणीवरुन नवा वाद निर्माण झाल्याने उद्याच्या बैठकीत कोणता तोडगा निघतो. त्याकडे शिरगाववासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

संबंधित बातम्या