बाटलीतील जैविक आकाराचे रहस्य

नंदकुमार कामत
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

थरार संशोधनाचा:मी सर्व उपलब्ध संशोधन तपासल्यावर यीस्टच्या पेशी अशा एकत्र येऊ शकत असल्याचे दिसून आले व आमच्या निष्कर्षांना पुष्टी मिळाली.आम्हाला अदभूत गुणधर्म असणारे चार यीस्ट सापडले होते. त्यांचे गुणधर्म दाखवत होते की मानव व इतर सस्तन प्राण्यांत होणारे ‘ट्युमर्स’ तयार होण्याची प्रक्रिया व या यीस्टमुळे तयार झालेला आकार यामध्ये बरेच साम्य आहे.

थरार संशोधनाचा:मी सर्व उपलब्ध संशोधन तपासल्यावर यीस्टच्या पेशी अशा एकत्र येऊ शकत असल्याचे दिसून आले व आमच्या निष्कर्षांना पुष्टी मिळाली.आम्हाला अदभूत गुणधर्म असणारे चार यीस्ट सापडले होते. त्यांचे गुणधर्म दाखवत होते की मानव व इतर सस्तन प्राण्यांत होणारे ‘ट्युमर्स’ तयार होण्याची प्रक्रिया व या यीस्टमुळे तयार झालेला आकार यामध्ये बरेच साम्य आहे.
मुक्तीपूर्वी गोव्यात व्यवसायानिमित्त जी काही कुटुंबे मुरगाव बंदरातील सुबत्तेचा फायदा घेऊन पंजाबमधून गोव्यात आली होती, त्यात वास्कोला फर्निचरचा व्यवसाय करणारे गंगाशरण चोप्रा होते.त्यांची सांकवाळ झरीजवळ थोडी जमीन होती.तिथे त्यांनी आपले वर्कशॉप व घर बांधले होते.कर्मधर्मसंयोगाने या विलक्षण बुद्धिमान, आतिथ्यशील व गोड माणसांशी माझा परिचय झाला होता.त्यांची मुलगी उत्कृष्ट कविता करायची. चोप्रा फार रसिक होते.ज्ञानाच्या सर्वच क्षेत्रांत त्यांना दिलचस्पी होती. वास्कोला येता-जाताना ते घरी असले तर थोडावेळ सांकवाळला उतरून मी त्यांच्याशी गप्पा मारीत असे.त्यावेळी मी गोवा विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागात भूछत्रांवर पीएचडीसाठी संशोधन करीत होतो.सांकवाळच्या पठारावर भटकंती केली होती.सा जासिंतो बेटही धुंडाळले होते. १९८८ या वर्षीच सांकवाळ नावाचा उगम कसा झाला ते मला कळले. कारण चोप्रांच्या जमिनीत सगळीकडे सामुद्रिक जीवाश्‍म सापडत. त्यांत शंखही असायचे.त्यावरून प्राचीन काळी ‘शंखवहाळ’, ‘शंखावली’ हे नाव पडून नंतर उच्चारातील ग्राम्यतेमुळे ‘सांकवाळ’ हे नाव पडले. तर या सांकवाळ गावानेच दोन महान नररत्ने जगाला दिली.बौध्द धर्माचे प्रकांडपंडित आचार्य धर्मानंद कोसंबी व त्यांचे सुपुत्र महान गणितज्ज्ञ व भारतविद्याकार मार्क्सवादी संशोधक दामोदर. आणि १९८८-८९ सालीच या गावातून आम्हाला एक अभूतपूर्व रहस्य उलगडायची संधी मिळाली.आजही या रहस्याचा उलगडा केल्याचा थरार कायम आहे.
चोप्राजींना माझे वैज्ञानिक म्हणून खूप कौतुक वाटे. एकदिवस सकाळीच त्यांच्याकडे गेलो असताना आतून ते एक बाटली घेऊन आले.त्यात नारींगी रंगाचा कसलातरी रस होता व त्यात एक सर्पिलाकार आकाराची रबरी ट्युबसारखी दिसणारी वस्तू होती. तिची वरची बाजू जवळजवळ बाटलीच्या झाकणाला टेकली होती.मला ती बाटली दाखवून चोप्राजी म्हणाले, ‘पाच वर्षे एकाच जागी उजेडात मी ही बाटली ठेवली होती.तर त्यात हा रबरी नळकांड्यासारखा आकार वाढत गेला.पण मी आश्‍चर्याने बघत असे.बाटली न उघडताच म्हटले बघुया आकार कितपत वाढतोय तो.’ मग त्यांनी ती बाटली निरीक्षणासाठी माझ्याकडे सोपवली.मी असला ‘चमत्कार’ प्रथमतःच पाहत होतो.बाटलीचे धातूचे बूच लावलेले तोंड एवढे निमुळते होते की त्यातून व्यासाने पाच ते सहा पटीने मोठा असलेला आकार आत ढकलणे शक्य नव्हते.मग मी बाटलीचा तळ शोधला.तर तिथे करडा गाळ दिसला.जिला आम्ही ‘सेडीमेंट’ म्हणतो.चटकन माझ्या लक्षात आले की हा चमत्कार नसून ही सूक्ष्मजीवांची निर्मिती आहे.मी चोप्राजींना विनंती केली की, त्यांनी मला त्या द्रवपदार्थांबद्दल सांगावे.तर ते कसेच सांगेनात. त्यांनी तो फळांचा रस आहे, फळांचा रस एवढेच पालुपद ऐकवले.मग ते चटकन म्हणाले, ‘तुम्ही वैज्ञानिक आहात ना? मग त्या आकाराचे रहस्य काय ते मला सांगा.मगच तो कसल्या फळाचा रस आहे ते मी उघड करीन’. ठीक आहे असे म्हणून मी ती बाटली ताब्यात घेतली व सांभाळून घरी आणली. घरी तो आकार पाहून सगळे चकीत झाले.
दुसऱ्या दिवशी आमच्या प्रयोगशाळेत माझ्यासमोर पेचप्रसंग उभा राहिला.माझे पीएचडीचे काम बाजूला ठेवून ‘बाटलीतील रहस्य’ उलगडणे अशक्य होते. मग मी डॉ. आयरीन फुर्तादोंपाशी गेलो.व्याख्यात्या म्हणून त्या नवीनच आपल्या पदावर आल्या होत्या.चौकसपणा त्यांना आवडे.मी ती बाटली दाखवताच त्या म्हणाल्या, आपण दोघे मिळून या आकाराचे रहस्य शोधूया. पण त्यासाठी मला एक विद्यार्थिनी शोधावी लागेल. अशी होतकरू, चौकस, हुशार विद्यार्थिनी लगेच मिळाली. मरीना अल्बुक्वेर्क. ती धुळेर म्हापसा येथे राहायची. उत्कृष्ट बॅडमिंटनपटू म्हणून ती पुरस्कार मिळवित होती.‘बाटलीच्या रहस्या’ बद्दल नेमके काय करायचे हे आम्ही तिला सांगितले. डॉ. आयरीन तिला म्हणाल्या तुझ्या पदव्युत्तर प्रकल्पाचा भाग म्हणून तू हे काम कर. त्याबद्दल २५ गुण आहेत. सगळा तांत्रिक अहवाल तुला नंदकुमारच्याच मार्गदर्शनाखाली करायचा आहे.मग जवळजवळ सगळीच संशोधनाची जबाबदारी माझ्यावर आली.मी त्या स्वातंत्र्याचा भरपूर लाभ उठवला. मी सूचना द्याव्यात आणि त्यानुसार मरीनाने काम करावे, या पद्धतीने आम्ही रहस्य उलगडायला लागलो. बाटलीतील रबरी आकार तुकडे करून बाहेर काढला व जंतुविरहीत वातावरणात त्याचा अभ्यास केला. तळातील गाळ व बाटलीतील आम्लयुक्त रसाचे नमुने तपासले.
नळकांड्यासारख्या आकाराची चिवटता, विद्युत प्रवाह वाहन शक्ती वगैरे तपासली. रासायनिक चाचण्या झाल्या.शेवटी मिळालेले निष्कर्ष थक्क करणारे होते. ‘सॅकॅरोमायसीज’ व ‘शिझो सॅकॅरोमायसीज’ या यीस्ट जातींच्या चार वेगवेगळ्या पेशींमुळेच हा त्रिमिती रबरासारखा चिवट पण फार घट्ट व क्लिष्ट आकार उदयाला आला होता.
मी सर्व उपलब्ध संशोधन तपासल्यावर यीस्टच्या पेशी अशा एकत्र येऊ शकत असल्याचे दिसून आले व आमच्या निष्कर्षांना पुष्टी मिळाली.आम्हाला अदभूत गुणधर्म असणारे चार यीस्ट सापडले होते.त्यांचे गुणधर्म दाखवत होते की मानव व इतर सस्तन प्राण्यांत होणारे ‘ट्युमर्स’ तयार होण्याची प्रक्रिया व या यीस्टमुळे तयार झालेला आकार यामध्ये बरेच साम्य आहे.मग हे पाच वर्षे बंद बाटलीत ‘आपोआप’ का घडले त्याचा उलगडा करण्यासाठी द्रवातील घटक वेगळे काढले.त्यातील एक घटक असा निघाला की ज्यात वेगवेगळ्या यीस्ट पेशींना जखडण्याची ताकद होती.मरीनाचे संशोधन या टप्प्यापर्यंत पोहोचले होते. तिच्या अहवालाचे कौतुक झाले, पण हा शोध जगापर्यंत पोहोचला नव्हता.शेवटी गोवा विद्यापीठात १९९७ साली भरलेल्या आयमाका - १९९७ आंतरराष्ट्रीय परिषदेत आम्ही ते संशोधन सादर केले.मध्यंतरी चोप्राजींना प्रयोगशाळेत आमंत्रित करून सर्व सांगितले होते.त्यांनी ज्या फळाची वाच्यता केली त्याचा उल्लेख मात्र त्यांच्या विनंतीप्रमाणे जाहीर करता येणार नाही.त्यांनी आणखी दोन बाटल्या दिल्या.त्यात मात्र यीस्टमुळे दाट चकत्या व साय तयार झाली होती.तब्बल नऊ वर्षे मी हे अद्‌भूत यीस्ट जतन करून ठेवले होते.मग तानिसा डिसौझा या विद्यार्थिनीकडे ते सोपवले.मी तिला म्हटले - ‘आपण हे यीस्ट वापरून खाणक्षेत्रात पाण्यात जो चिकणमातीचा गाळ साचतो तो काढून टाकू’. त्याप्रमाणे २० लीटर्स पाण्यातील गाळ आम्हाला पाच मिनिटांत हे यीस्ट वापरून वेगळा करणे शक्य झाले.आज हेच संशोधन वाराणसीहून गोव्यात आलेली शीला पाल ही माझी पीएचडीची विद्यार्थिनी दुसरे नैसर्गिक यीस्ट वापरून पुढे नेत आहे.पण संशोधनाचा थरार जागृत करायला कारणीभूत झाले सांकवाळचे गंगाशरण चोप्रा. त्यांच्याजागी आणखी कुणी असता तर त्या बाटलीवर एक प्रार्थनास्थळ उभे झाले असते.
२००० पासून माझ्या मार्गदर्शनाखाली यीस्टवर संशोधन होत राहिले.कुमुद फडते या विद्यार्थिनीने फळांतून यीस्ट वेगळे काढले.मग निकीता डिसिल्व्हाने कमाल केली. तिने ५७ वेगवेगळ्या फुलांच्या मधातून १२० जातीचे यीस्ट मिळवले. हायसिंथ ब्रागांझा, प्रयांगी गाड व मंदार ताम्हणकरनी वेगवेगळ्या जलाशयातील पाण्यातून यीस्ट मिळवले.प्रयांगी गाड १५० लीटर्स पाण्यातील गाळ १२ तासात वेगळा करण्यात यशस्वी झाली.दोन वर्षांपूर्वी आम्हाला चक्क पावसाच्या पाण्यात कँडीडा ट्रॉपीकलीस हा यीस्ट मिळाला.हे नवे संशोधन होते.पण हे सर्व १९८८ सालच्या बाटलीतील जैविक रहस्याच्या शोधाने शक्य झाले.

 

संबंधित बातम्या