..आणि बियाणे पाठविली पोष्टाने

Dainik Gomantak
मंगळवार, 21 एप्रिल 2020

..आणि बियाणे पाठविली पोष्टाने

पणजी,

कृतार्थ, म्हार्दोळ ही संस्था गेली काही वर्षे सातत्याने वेगवेगळे समाजाभिमुख उपक्रम राबवून समाजात जागृती करण्याचे, समाजाला दिशा देण्याचे कार्य तळमळीने करत आहे. या संस्थेचे संस्थापक राजेंद्र देसाई यांच्या सुपीक डोक्यातून नवनवे स्तुत्य उपक्रम निघाताहेत व ते यशस्वीपणे साकारही केले जात आहेत.
सध्या कोरोनामुळे टाळेबंदी सुरू आहे, अशा परिस्थितीतही कृतार्थ या संस्थेने आगळा उपक्रम पार पाडला. कृतार्थ, म्हार्दोळतर्फे फोंडा, केरी, सावईवेरे, कवळे, मंगेशी, प्रियोळ या भागातील सुमारे शंभर घरांना पोष्टाद्वारे भाज्यांची बियाणे पाठविण्यात आली. यामागचा उद्देश हा, की सध्या टाळेबंदीमुळे कुटुंबातील माणसे एकत्र आहेत. त्यांच्याकडे मोकळा वेळही आहे, तेव्हा या वेळेत भाजीच्या बियाण्यांचा उपयोग करून घराच्या बाजूला असलेल्या परसात, मोकळ्या जागेत भाज्यांची लागवड करावी. आपल्याला लागणाऱ्या भाज्या स्वतःच पिकवाव्यात. स्वतः पिकवून खाण्याचा वेगळा आनंदही त्यातून मिळतो.
राजेंद्र देसाई म्हणतात, घरातील जाणत्यांनी या बियाण्यांची मुलांना ओळख करून दिली तरी आम्हाला आनंद वाटेल. आम्ही बियाण्यांची माहितीपण सोबत पाठवली आहे. बियाणे पोचताच आम्हाला पोच पावतीही मिळाली व आमच्या उपक्रमाचे कौतुक केले हे समाधान मोठे आहे.
आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या वस्तू खरेदी करू नका असा नारा लावला जातोय. मात्र, कृतार्थ, म्हार्दोळने २०१५ साली यासंदर्भात फोंडा येथे जागृती फेरी काढली होती.
कृतार्थने अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत. त्यात सार्वजनिक वटपौर्णिमा, ज्या दिवशी वडाच्या झाडाची फांदी न तोडता वडाच्या रोपांची पूजा करून सामूहिकरित्या ती लावणे आणि वाढवणे, चतुर्थीला गणपतीच्या पूजेसाठी ब्राह्मणांची कमतरता भासते म्हणून सर्वसामान्यांना पुजाविधी याव्यात म्हणून पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण शिबिर, गोकुळ अष्टमीची पुजा सुलभरित्या करता यावी म्हणून पुजाविधीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सर्वांपर्यंत पोचवणे, संस्कारक्षम श्लोकांचे रेकॉर्डिंग करून समाज माध्यमाद्वारे घराघरात पोचवणे, फटाके विरोधी मोहिमेचा भाग म्हणून चतुर्थीपूर्व काळात गेली दोन वर्षे माध्यमिक शाळांमध्ये, डॉ. लालन बखले, डॉ. पूर्णिमा उसगावकर, प्रा. वृषाली केळेकर यांची फटाक्यांच्या दुष्परिणामावर व्याख्याने, मुलांना घेऊन पारंपरिक काल्याची निर्मती व त्याचे संवर्धन, शिगमोत्सव शोभायात्रेत ‘स्वच्छ नारायण’ चित्ररथ, सशस्त्र क्रांतीवर 'वंदे मातरम' महानाट्य निर्मिती अशा स्तुत्य उपक्रमांचा समावेश होता.

संबंधित बातम्या