मुरगाव नागरिक शिमगोत्सव समितीच्या बैठकीत प्रचंड गदारोळ

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

मुरगावात ‘शिमगोत्सव’ अध्यक्षपदासाठी गदारोळ
-इतिहासात पहिल्यांदाच दोघांना अध्यक्षपद घोषित

समितीची २०२०ची नवीन कार्यकारिणी जाहीर

मुरगाव नागरिक शिमगोत्सव समितीच्या अध्यक्षपदासाठी मुरगाव पालिकेच्या शेखर खडपकर आणि दीपक नागडे या दोघा माजी नगराध्यक्षांच्या समर्थकांनी गदारोळ घातला.

मुरगाव : अखेर बैठकीचे अध्यक्ष नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून दोघांनाही अध्यक्षपदी घोषित केले. मुरगाव शिमगोत्सवाच्या इतिहासात असा प्रकार प्रथमच घडला. शेखर खडपकर हे सलग दहाव्यांदा अध्यक्षपदी निवडले गेले तर दीपक नागडे प्रथमच या पदापर्यंत पोचले.

मुरगाव नागरिक शिमगोत्सव समिती २०२० ची नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मुरगावमधील नागरिकांची बैठक झाली. सुमारे दोनशेहून अधिक नागरिक या बैठकीस उपस्थित होते. प्रारंभी जमाखर्चावरुन वादविवाद रंगला. सुमारे एक तास याच विषयावरून बैठकीत वादाचे फवारे उडाले. नगराध्यक्ष श्री.राऊत यांनी जूनी समिती बरखास्त झाल्याची घोषणा केली व नवीन समिती निवडण्यास सांगितले. त्यावेळी सर्वप्रथम अध्यक्षपदासाठी शेखर खडपकर, दीपक नागडे, बाबूराव रेवणकर, शैलेश गोवेकर, दामू कोचरेकर, हेमंत फडते, संतोष नाईक यांची नावे सुचविण्यात आली.

तथापि उपस्थित नागरिकांमध्ये शेखर खडपकर यांना पुन्हा अध्यक्षपदी निवडून दशकपूर्ती करावी असा सूर नागरिकांनी आवळायला सुरवात केल्यावर माजी नगराध्यक्ष दीपक नागडे यांचे समर्थक अध्यक्षपदी श्री.नागडेच असावे यासाठी हट्टाला पेटले. दोघांमध्ये सोडत काढून अध्यक्ष निवडायचे ही नगराध्यक्षांनी जाहीर केले. पण आपलाच निर्णय फिरवून श्री.राऊत यांनी यंदाचे अध्यक्ष दोघेहीजण राहतील अशी घोषणा करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. या निर्णयालाही नागरिकांनी आक्षेप घेतला, पण श्री.राऊत बदले नाही.

यंदाच्या शिमगोत्सवावर जिल्हा पंचायतीचे सावट असू शकते. त्यामुळे आचारसंहिता लागल्यास शेखर खडपकर अध्यक्षपदी राहतील अन्यथा सर्व कारभार दीपक नागडे सांभाळणार अशी घोषणा पत्रकारांशी बोलताना श्री.राऊत यांनी केली. या दरम्यान, उपनगराध्यक्ष रिमा सोनुर्लेकर यांनी नवीन कार्यकारिणी निवडण्याची प्रक्रिया हाती घेतली. त्याला नागरिकांनी आक्षेप घेतला. गोंधळातच समितीवरील अन्य पदाधिकारी निवडण्यात आले असून त्याची घोषणा केली जाईल असे श्री.राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, मुरगाव नागरिक शिमगोत्सव समितीच्या बैठकीत गोंधळ माजवून जी कार्यकारिणी निवडली आहे ती बेकायदेशीर असल्याचे मत शेखर खडपकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. नगराध्यक्ष श्री.राउत यांनी कोणाच्या तरी दडपणाखाली येऊन मनमानेल पणे समिती गठीत केली आहे ती आपल्याला मान्य नसल्याचे श्री.खडपकर म्हणाले.

अध्यक्ष म्हणून दहाव्या वर्षी सलगपणे आपली निवड घोषित केली आहे. यंदा प्रथमच दोन अध्यक्ष निवडले आहेत. शिमगोत्सवाची संपूर्ण कार्यकारिणी निवडण्यासाठी दोन्ही अध्यक्षांना विश्वासात घेणे आवश्यक होते पण याकडे दुर्लक्ष करून अन्य पदाधिकारी निवडले आहेत ते बेकायदेशीर आणि नियमानुसार नसल्याचे श्री.खडपकर यांनी पत्रकारांना सांगितले.

शिमगोत्सव समितीवर दोन अध्यक्ष निवडल्याने मुरगाव नागरिक शिमगोत्सव समितीत दोन गट पडले आहे हे स्पष्ट झाले आहे. पण हिंदुंच्या या उत्सवात कोणत्याच प्रकारे आपण फूट पडू देणार नाही असा पवित्रा श्री.खडपकर यांनी घेऊन पारंपरिक शिमगोत्सव सर्वानूमते वास्कोत साजरा होईल अशी ग्वाही दिली.

मांद्रेत आज मेणबत्ती मोर्चा ध्वनिप्रदूषणाविरोधात विद्यार्थ्यांचा पुढाकार

नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी जाहीर केलेल्या मुरगाव नागरिक शिमगोत्सव समितीत अध्यक्ष- शेखर खडपकर आणि दीपक नागडे,  उपाध्यक्ष- रिमा सोनुर्लेकर, संतोष नाईक, वासू आमोणकर, नीलेश नावेलकर, उमेश साळगावकर, मनेष आरोलकर, तारा केरकर, नितीन चोपडेकर, लवू नार्वेकर, अवधूत नाईक, दामोदर तांडेल, श्रीधर म्हार्दोळकर, सचिव- संतोष केरकर, सहसचिव- बाबूराव रेवणकर, प्रशांत नार्वेकर, खजिनदार- प्रताप गावकर, सहखजिनदार- सुरेश नाईक, विशाल सुर्लीकर, युवाध्यक्ष- विनोद किनळेकर यांचा सहभाग आहे.

 

संबंधित बातम्या