वास्कोतील शिमगोत्सव मिरवणूकीला परवानगी

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

वास्कोत १८ मार्चला शिमगोत्सव मिरवणूक

मुरगाव नगरपालिकेच्या देखरेखीखाली मुरगाव नागरिक शिमगोत्सव समिती निवडण्यात आल्यानंतर बुधवारी पहिली बैठक पालिका सभागृहात घेण्यात आली. यंदा प्रथमच दोन अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली वास्कोत शिमगोत्सव साजरा करण्यात येणार आहे. अध्यक्ष शेखर खडपकर आणि दीपक नागडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारची बैठक झाली.

 वास्‍को : राज्याच्या पर्यटन महामंडळाने १८ मार्च रोजी वास्कोत पारंपरिक शिमगोत्सव मिरवणूक काढण्यास मुरगाव नागरिक शिमगोत्सव समितीला मान्यता दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष शेखर खडपकर यांनी बैठकीत दिली.

राज्‍यातील सर्व शिमगोत्सव समितीच्या अध्यक्ष आणि सचिव यांची बैठक पर्यटन महामंडळाने पणजीत पर्यटन भवनात पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली. या बैठकीत राज्यातील शिमगोत्सव मिरवणुकीत त्या तारखा निश्चित करण्यात आल्या. वास्कोत १८ मार्च रोजी मिरवणुकीस मान्यता देण्यात आल्याचे खडपकर यांनी बैठकीत सांगितले.

सरकारतर्फे शिमगोत्सव स्पर्धेची पारितोषिके आणि खर्च म्हणून दहा लाख रुपये आयोजकांना दिले जातात. त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव आपण मांडल्याचे खडपकर यांनी यावेळी सांगितले. आपल्या प्रस्तावाला मंजुरी देत पर्यटनमंत्री आजगावकर यांनी अतिरिक्त एक लाख रुपये देण्याचे जाहीर केल्याचे खडपकर यांनी सांगितले.

दरम्यान, वास्कोत शिमगोत्सव समितीवर दोघे अध्यक्ष निवडल्याने बॅंक व्यवहार करताना अडचण निर्माण होईल, अशी भीती बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यावर तोडगा काढला जाईल, असे अध्यक्ष दीपक नागडे यांनी सांगितले. तथापि, गेल्या आठवड्यात घाईघाईने शिमगोत्सव समितीची घोषणा करण्यात आली. त्यात गेल्या कित्येक वर्षांपासून शिमगोत्सव आयोजनात अग्रभागी असलेल्या नागरिकांना समाविष्ट करण्यात आले नसल्याबद्दल बैठकीत अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

बैठकीत वामनराव चोडणकर, अरुण आजगावकर, कृष्णा सोनुर्लेकर, शैलेश गोवेकर, नितीन चोपडेकर, मनेष आरोलकर, विनोद किनळेकर, संतोष नाईक, प्रकाश गावस, प्रताप गावकर, उमेश साळगावकर, प्रसाद प्रभूगावकर, लवू नार्वेकर व इतरांनी आपली मते मांडली. सरचिटणीस संतोष केरकर यांनी आभार मानले.

 

संबंधित बातम्या