सांगेत घुमला ओस्सय...चा गजर!

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

सांगे शिमगोत्सव समिती आणि गोवा राज्य पर्यटन खाते यांच्या संयुक्त विद्यमाने शिमगोत्सव २०२० चा भव्य शुभारंभ आज करण्यात आला.

सांगेः सांगे शिमगोत्सव समिती आणि गोवा राज्य पर्यटन खाते यांच्या संयुक्त विद्यमाने शिमगोत्सव २०२० चा भव्य शुभारंभ आज करण्यात आला. यजमान समितीने सांगेचे आराध्य दैवत श्री पाईक देवाला नमन करून, मिलाग्रीस सायबिणीचे दर्शन घेऊन बेंडवाडा येथील श्री  कानडीपुरुष देवाला श्रीफळ  वाढवून ढोल-ताशांच्या गजरात व हजारो नागरिकांच्या उपस्थितीत लोकनृत्य, रोमटामेळ, चित्ररथ, वेशभूषा स्पर्धेच्या भव्य मिरवणुकीस सुरुवात झाली.

गोविंदा  रे गोपाळा...! गोपाळा...गोपाळा.. देवकीनंदन गोपाळा...! विटेवरी उभा त्याचा कटेवरी हात काय मौजेचा पंढरीनाथ. वाऽऽ..वाऽऽ..किती आनंद झाला... भले...भले..! शबय... शबय... शबयऽऽऽ..! ओस्सयऽऽऽ...ओस्सयऽऽऽ...च्या जल्लोषात अशा पारंपरिक जती गात आणि आसमंत दुमदुमून टाकणाऱ्या ढोल-ताशांच्या गजरात बुधवारी  संगमपूर नगरीत   शिमगोत्सवास सुरुवात  झाली.   हातात गुढ्या, तोरणे व अब्दागिर घेऊन नाचणाऱ्या कलाकारांसह वाजत-गाजत निघालेले भव्य रोमटामेळ, गोमंतकीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी लोककला पथके. विविध पेहराव केलेले कलाकार आणि लक्षवेधक चित्ररथ देखावे अशा उत्साही वातावरणात पाच तास शिगमोत्सव मिरवणूक सुरू होती. यंदा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाने सांगे येथे शिमगोत्सव साजरा होत असल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला. 

पाईकदेव शिमगोत्सव समिती, सावर्डे शिमगोत्सव समिती, कुडचडे-काकोडा  शिमगोत्सव समिती, बोरी शिमगोत्सव समिती व राज्यातील विविध रोमटामेळ पथके, आकर्षक चित्ररथ आदींचा सहभाग होता. या शिवाय सरस्वती कला संघ, केळबाय कुर्टी यांनी घोडेमोडणी, गुरू कला मंडळ पिसगाळ प्रियोळ यांनी गोफ', सावईवेरे सख्याहरी पथकाने विविध लोकनृत्य, धनगर नृत्य, लहान मुलांबरोबर  तरुण व ज्येष्ठ कलाकारांबरोबरच महिलांंनी सहभागी होऊन नृत्य व वादनातील आपले कौशल्य दाखवून दिले. 

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी आग्नेलो फर्नांडिस, सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे, मामलेदार मनोज कोरगावकर, संयुक्त मामलेदार आनारिता पायस, गटवविकास अधिकारी भगवंत करमली, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी दयानंद नाडकर्णी, समिती अध्यक्ष जुवावं फर्नांडिस, सचिव सुहास फळदेसाई, वन अधिकारी मिंगेल फर्नांडिस, अबकारी खात्याचे उपनिरीक्षक रमेश नाईक, समिती खजिनदार गीता गावकर उपस्थित होते.

उपजिल्हाधिकारी अजय गावडे म्हणाले, ग्रामीण कला आणि संस्कृती जपून ठेवण्यासाटी सरकार सर्व तोपरी प्रयत्न करीत असून शिमगोत्सव हा सर्व परिश्रम आणि थकवा घालवणारा उत्सव असून कितीही नृत्य केले तरी ढोल-ताशावर थाप पडताच अंगात उत्साह निर्माण होतो.
 

संबंधित बातम्या