कुंकळ्ळीत होणार दिमाखदार शिवजयंती सोहळा

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

कुंकळ्ळीत १९ रोजी शिवजयंती सोहळा

शिवाजी महाराज वेशभूषा स्पर्धा, महिलांकडून ढोल वादन सोहळ्याचे खास आकर्षण

कुंकळ्ळी : यंग बॉइज ऑफ कुलवडा कुंकळ्ळीतर्फे अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा संघटनेच्या सहयोगाने १९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वा. शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण मूळस्थान कुलवडा कुंकळ्ळी येथे शिवजयंती सोहळा २०२०, शिवाजी महाराज वेशभूषा स्पर्धा व इतर विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत.

समन्वय समिती अध्यक्ष वीरेंद्र य. देसाई यांनी आपल्या निवासस्थानी समिती सदस्य रोहन एम. देसाई, प्रजोत देसाई, प्रजय सावंत देसाई, प्रसाद डी. देसाई, अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा संघटनेचे उपाध्यक्ष संदीप ब. देसाई, शिवाजी देसाई, नितीन देसाई, सागर देसाई यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

शिवजयंती सोहळा आयोजित करण्यामागचा उद्देश कथन करताना अध्यक्ष देसाई म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आजच्या युवा पिढीचे प्रेरणास्थान आहेत. शून्यातून राष्ट्र निर्मिती करणाऱ्या, अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या या विभूतीचे कार्य सतत युवा पिढी व विद्यार्थ्यांसमोर असणे गरजेचे आहे. यासाठी या शिवजयंती सोहळ्याचे आयोजन तसेच छ. शिवाजी महाराज वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी काही प्रतिष्ठितांचा सन्मानही केला जाणार असून जगदंब गट फोंडा यांचे ढोलताशा वादन व महिलांकडून ढोल वादन हे खास आकर्षण असेल. छत्रपती शिवाजीराजांचे कार्य अफाट असून त्यांचे कार्य युवा पिढी तसेच विद्यार्थ्यांसमोर असणे गरजेचे आहे. शिवाजी महाराज यांचे कार्य व चरित्र शालेय पुस्तकांत येणे आवश्यक आहे. यासाठी यंग बॉइज ऑफ कुलवडा सरकार दरबारी प्रयत्न करणार असल्‍याचे सांगितले.

अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा संघटनेचे उपाध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले की, सोहळ्याचे अध्यक्षस्थान अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा संघटनेचे अध्यक्ष महेश नाईक गावकर व उपाध्यक्ष संदीप ब. देसाई भूषवतील. प्रमुख पाहुणे म्हणून कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस उपस्थित असतील. सन्माननीय अतिथी म्हणून माजी मंत्री सुभाष फळदेसाई व खासअतिथी म्हणून समाजसेवक केदार जगदाळे, अ.गो.म. संघटनेचे खजिनदार सुहास फळदेसाई, शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण मंदिराचे अध्यक्ष नितिन देसाई उपस्‍थित राहतील, असे सांगितले. छत्रपती शिवाजी चौक काकोडा कुडचडे येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीला सुरवात होणार आहे. त्याची सांगता कुंकळ्ळी येथे मूळस्थान कुलवडा येथे होणार आहे. प्रत्येक थांब्यावर सुवासिनिंनी पुष्पहार अर्पण करून व फुले उधळून मिरवणुकीचे स्वागत करावे, असे आवाहन केले.

 

 

संबंधित बातम्या