महाराष्ट्राला जोडणारे आडमार्ग बंद

Dainik Gomantak
बुधवार, 22 एप्रिल 2020

महाराष्ट्रातील दोडामार्गला जोडणारे डिचोलीतील खरपाल भागातील आडमार्ग अखेर शासकीय यंत्रणेने अडथळे निर्माण करून बंद केल्याने चोरट्या मार्गाने होणारी वाहतूक आता बंद झाली आहे.

डिचोली

सरकारी यंत्रणेने प्रतिबंधात्मक पावले उचलल्याने ‘टाळेबंदी’च्या पार्श्वभूमीवर डिचोलीतील खरपाल येथील आडमार्गाने गोव्यातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून गोव्याच्या दिशेने होणाऱ्या चोरट्या वाहतुकीवर अखेर नियंत्रण आले आहे. महाराष्ट्रातील दोडामार्गला जोडणारे डिचोलीतील खरपाल भागातील आडमार्ग अखेर शासकीय यंत्रणेने अडथळे निर्माण करून बंद केल्याने चोरट्या मार्गाने होणारी वाहतूक आता बंद झाली आहे. त्यामुळे विशेष करून खरपाल भागातील जनतेने सुटकेचा श्वास घेतला आहे.
टाळेबंदी लागू झाल्यापासून आडमार्गाने चोरटी वाहतूक करण्याचे प्रकार वाढीस लागले होते. ‘कोरोना’ महामारीच्या धोक्‍याच्या पार्श्वभूमीवर ‘टाळेबंदी’ लागू झाल्यापासून डिचोली तालुक्‍याला जोडून महाराष्ट्राच्या सिमेलगत दोडामार्ग येथील पोलिस तपासणी नाक्‍यावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. शेजारच्या राज्यातून गोव्यात येणाऱ्या आणि गोव्यातून दोडामार्ग-महाराष्ट्राच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. ‘कोरोना’बाबतीत राज्यातील स्थिती बरीच नियंत्रणात असली, तरी महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव वाढल्याने दोडामार्ग तपासणी नाक्‍यावरील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य वाहनांना महाराष्ट्रातून गोव्यात आणि गोव्यातून महाराष्ट्रात वाहतूक करण्यास मनाई करण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांनी खरपाल भागातून दोडामार्गला जोडणाऱ्या आडमार्गाचा वाहतुकीसाठी अवलंब केला होता. या आडमार्गाने चोरट्या पध्दतीने वाहतूक करण्याचे प्रकारही दिवसेंदिवस वाढले होते.
न्यूवाडा-खरपाल येथून वाहणाऱ्या तिळारी कालव्याच्या बाजूने गेलेल्या कच्च्या रस्त्यावरून तर वाहतुकीची रहदारी वाढली होती. या आडमार्गाने दुचाकी आणि चारचाकी वाहनांची ये-जा चालूच होती. कालपर्यंत हा प्रकार चालूच होता. एका बाजूने कोरोना संसर्गाचा धोका आणि दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रातून होणाऱ्या या चोरट्या वाहतुकीमुळे खरपाल येथील जनतेमध्ये भीतीयुक्‍त वातावरण पसरले होते. आडमार्गाने चोरटी वाहतूक बंद व्हावी अशी खरपालवासीयांची मागणी होती. अखेर कालव्याजवळील या आडमार्गावर मोठे पोलादी खांब आडवे टाकून हा मार्ग अडवण्यात आला आहे, तर याच मार्गाला जोडणाऱ्या तेथील अन्य एका मार्गावर मोठा खंदक खोदून तो मार्गही बंद करण्यात आला आहे. यामुळे या आडमार्गाने महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून गोव्यातील खरपालच्या दिशेने होणाऱ्या वाहतुकीवर पूर्ण नियंत्रण आले आहे. आज (मंगळवारी) सकाळी मार्ग बंद झाल्याने काहींना माघारी परतावे लागले. शासनाच्या या निर्णयामुळे खरपालवासीयांनी समाधान व्यक्‍त केले आहे. टाळेबंदीनंतर लागलीच साळ येथील पदपुलावर लोखंडी फाटक बसवून महाराष्ट्रातील वाहतुकीवर लगाम घालण्यात आला होता. मात्र, खरपाल येथील आडमार्गांकडे दुर्लक्ष झाले होते.

संबंधित बातम्या