‘श्रद्धानंद’च्या ‘बुजगावणे’ला प्रथम पारितोषिक

Dainik Gomantak
सोमवार, 20 जानेवारी 2020

पैंगीण येथील श्री श्रद्धानंद विद्यालयाने सादर केलेल्या ‘बुजगावणे’ या एकांकिकेला सर्वाधिक बक्षिसे मिळून सादरीकरणाचे पहिले बक्षिस प्राप्त झाले.

सुभाष महाले
काणकोण

काणकोण कलाकार संघाच्या मराठी एकांकिका स्पर्धेचे बक्षिस वितरण रविवारी(ता. १९) संगीत संमेलनावेळी करण्यात आले. पैंगीण येथील श्री श्रद्धानंद विद्यालयाने सादर केलेल्या ‘बुजगावणे’ या एकांकिकेला सर्वाधिक बक्षिसे मिळून सादरीकरणाचे पहिले बक्षिस प्राप्त झाले. लोलये येथील श्री दामोदर विद्यालयाला सादरी करणाचे दुसरे व तुडल हायस्कूलला तिसरे बक्षीस मिळाले. उत्तेजनार्थ बक्षिस श्री मल्लिकार्जुन विद्यालयाला देण्यात आले.
दामोदर विद्यालयाने ‘पुनश्च हरिओम’, तर तुडल हायस्कूलने ‘उंच माझा झोका’ या एकांकिका सादर केल्या होत्या. उत्कृष्ट संहिता लेखन व दिग्दर्शनाचे पहिले बक्षीस श्रद्धानंदच्या सुभाष महाले यांना प्राप्त झाले. तर संहिता लेखन व दिग्दर्शनाचे दुसरे बक्षीस दामोदरच्या जितेंद्र आमशेकर यांना मिळाले. उत्कृष्ट पुरूष अभिनयाचे पहिले बक्षीस स्वस्तीक नाईक व दुसरे औदुंबर च्यारी (बुजगावणे), उत्कृष्ट स्त्री अभिनयाचे पहिले बक्षीस भूमी धुरी (पुनश्च हरिओम), दुसरे नितिशा रेडकर(बुजगावणे) यांना प्राप्त झाली. उत्कृष्ट नेपथ्य चंद्रशीला च्यारी, उत्कृष्ट पार्श्वसंगीत सज्जन नाईक गावकर, उत्कृष्ट प्रकाश योजना अमोल प्रभुगावकर, उत्कृष्ट रंगभूषा प्रणिता नाईक गावकर (बुजगावणे) यांना मिळाली. अस्खलित मराठी संभाषणासाठी क्षीती आमशेकर हिला बक्षीस मिळाले. त्याशिवाय प्रत्येक एकांकिकेतील उत्कृष्ट पुरुष व स्त्री अभिनयासाठी बक्षिसे देण्यात आली. विजेत्यांना नगराध्यक्षा नितू देसाई, संमेलनाध्यक्ष सरपंच प्रमोद फळदेसाई, श्रीस्थळचे सरपंच गणेश गावकर, श्री मल्लिकार्जुन देवालयाचे अध्यक्ष राजेंद्र देसाई, पंच विद्या गायक यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.

संबंधित बातम्या