श्रीपाद नाईक यांच्याकडून मदतीचे वितरण

Dainik Gomantak
गुरुवार, 30 एप्रिल 2020

कोरोनाच्या प्रसारामुळे कोकण रेल्वेच बंद असल्याने ग्राहकच नसल्याने रोजीरोटी मिळवण्याचे संकट निर्माण झाले आहे.

पणजी

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पायलट, रिक्षा आणि टॅक्सीचालक सारख्या कमी उत्पन्न असलेल्या सामान्य माणसांना आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे रेल्वेसेवाच बंद असल्याने या चालकांचा व्यवसायच बंद पडला आहे. या चालकांना बँकेचे हफ्ते फेडण्याचे आणि कुटुंबांला पोसण्याची जबाबदारी असून या कामात थोडीफार मदत मिळणे जरूरी आहे. यासाठी जुनेगोवे, करमळी, खोर्ली सारख्या जवळच्या भागातील या चालकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे ठरविण्यात आले असल्याचे केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज सांगितले.
करमळी कोकण रेल्वे स्थानकावरील पायलट, रिक्शा आणि टॅक्सीचालकांना खासदार नाईक यांच्या हस्ते भुसारी व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त करताना टॅक्सी मालक संघटनेचे अध्यक्ष सुनिल नाईक म्हणाले, कोरोना सारखे भयंकर संकट कोसळले असताना आम्हाला कुणीतरी येउन विचारपूस करून मदतीचा हात दिला हेच आम्हाला मोठे आहे. कोरोनाच्या प्रसारामुळे कोकण रेल्वेच बंद असल्याने ग्राहकच नसल्याने रोजीरोटी मिळवण्याचे आमच्यावर संकट निर्माण झाले आहे. या संकटाच्या काळात खासदार नाईक यांनी आम्हाला मदत केल्याबद्दल सर्वांच्यावतीने आम्ही आभारी आहोत.
कोकण रेल्वे महामंडळाने टॅक्सीचालकांना प्रीपेड काउंटरची जागा देण्यासाठी संघटनेकडे १ लाख ५ हजार रुपये शुल्काची मागणी केली असून कोरोनामुळे हे शुल्क माफ करावी अशी विनंती महामंडळाला केली आहे. याविषयी केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंतीही करण्यात आली असून नाईक यांनी आपण कोकण रेल्वेकडे याबाबत चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे सुनिल नाईक यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश नाईक व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या