लॉकडाऊन काळात एकच अपघात मृत्यू

dainik gomantak
बुधवार, 29 एप्रिल 2020

लॉकडाऊन काळात एकच अपघात मृत्यू 

पणजी,

दरवर्षी राज्यातील रस्ता अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून आटोकाट प्रयत्न केले जातात. मात्र, लॉकडाऊनच्या काळात राज्यात नुवे येथील स्वयंअपघात वगळता कोठेच रस्ता अपघाताची नोंद झाली नाही. लॉकडाऊनपूर्वी यावर्षी ९२५ अपघातापैकी ८५ भीषण अपघात झाले त्यामध्ये ८७ जणांचा मृत्यू झाला होता. सध्या मृत्यूची संख्या ८८ झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये रस्ता अपघातात मृत्यूची एकही नोंद झालेली नाही.
दरवर्षी राज्यात पावणे तिनशे ते तिनशेजण रस्ता अपघातात मृत्यूमुखी पडतात. या वाढलेल्या मृत्यूच्या संख्येला अनेक वेगवेगळी कारणे दिली जातात.त्यामध्ये रस्तावर सुरू असलेली कामे, बेभानपणे वाहन चालविणे, मोटार वाहन कायद्याचे नियम न पाळणे यामुळे अपघात वाढत असल्याचे सांगितले जाते. राज्यात लॉकडाऊन काळात वाहनांची वर्दळ नव्हती तरी जीवनावश्‍यक वस्तू घेऊन मालवाहू वाहने ही धावत होती. काही दुचाकी व चारचाकी वाहनेही अधुनमधून रस्त्यावर दिसत होती. नुवे येथे दोन आठवड्यापूर्वी एक वृद्ध दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर गोमेकॉ इस्पितळत उपचार सुरू असताना काही दिवसानंतर निधन झाले. एखाद्या महिन्यात रस्ता अपघात होऊन मृत्यू झाला नाही असे कधीच घडले असल्याची शक्यता नाही. त्यामुळे लॉकडाऊन हा रस्ता अपघातावर नियंत्रण ठरले आहे. या काळात वाहनांची संख्या कमी होती मात्र अनेकदा ज्या कारणामुळे हे अपघात घडतात ती खासगी बससेवा तसेच खनिजवाहू ट्रक बंद होती.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी २७ एप्रिल काळापर्यंतची रस्ता अपघाताची तुलना केल्यास संख्या खूपच कमी आहे. यावर्षी मार्च २० पर्यंत रस्ता अपघातात ८७ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षी हे प्रमाण शंभराच्या आसपास पोहचले होते. आतापर्यंत ९२५ रस्ता अपघात घडले आहेत ती संख्याही यावर्षी कमी आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात रस्ता अपघात घडले नाहीत कारण नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसही जागोजागी काटेकोरपणे तपासणी व कारवाई करत असल्याने वाहनांवर नियंत्रण राहिले होते. मात्र येत्या ३ मे रोजी राज्यात लॉकडाऊनमध्ये अधिक शिथिलता केल्यास त्याचा फटका रस्ता अपघातात वाढ होण्यावर बसणार आहे. आताच अनेकजण वाहने घेऊन रस्त्यावर आले आहेत त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात जे रस्ते मोकळे असायचे ते आता वाहनांमुळे गजबजले आहेत. रस्त्यावर आलेल्या वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत हे रस्ता अपघातात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केेले. 

 

संबंधित बातम्या