मेघ:श्‍याम राऊतसह सहाजणांना अटक

Dainik Gomantak
शनिवार, 18 जानेवारी 2020

संशयितांनी जामिनासाठी डिचोलीच्या प्रथमश्रेणी न्यायालयात केलेल्या अर्जावर युक्तिवाद होऊन, न्यायालयाने निवाडा सोमवारपर्यंत राखून ठेवला आहे. तोपर्यंत संशयितांना पोलिस कोठडीत राहावे लागणार आहे.

तुकाराम सावंत
डिचोली

डिचोलीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेला वाद आता पोलिसांपर्यंत गेला आहे. डिचोली बचाव अभियानाने केलेल्या तक्रारीनुसार पुतळ्याजवळ शिवीगाळ करून तसेच मारण्याची गंभीर धमकी देणे आदी आरोपाखाली मेघ:श्‍याम राऊतसह सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
संशयितांनी जामिनासाठी डिचोलीच्या प्रथमश्रेणी न्यायालयात केलेल्या अर्जावर युक्तिवाद होऊन, न्यायालयाने निवाडा सोमवारपर्यंत राखून ठेवला आहे. तोपर्यंत संशयितांना पोलिस कोठडीत राहावे लागणार आहे. डिचोलीतील श्री शांतादुर्गा जंक्‍शनवरील शिवरायांचा पुतळा हटवण्याचे कारस्थान डिचोली बचाव अभियानाचे अध्यक्ष तथा माजी आमदार नरेश सावळ यांनी चालविले आहे. असा गंभीर आरोप करून मेघश्याम राऊत आणि इतरांनी काल नरेश सावळ यांच्या प्रतिमेचे दहन केले होते. या पुतळ्याला नरेश सावळ वा अन्य कोणीही हात लावण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा गंभीर इशारा राऊत यांनी देऊन त्या ठिकाणी मोठा अकांडतांडव केला होता.
या प्रकरणी काल रात्री डिचोली बचाव अभियानाचे सचिव नरेश कडकडे यांनी डिचोली पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मेघश्याम राऊत, मनोज नाईक, भूपेंद्र मळीक, नितीन परब, सदा घाडी आणि दर्शन राऊत यांच्या विरोधात बेकायदा जमाव करणे, धमकी देणे, शिवीगाळ करणे, बेकायदा शस्त्रास्त्र बाळगणे या आरोपाखाली गुन्हा नोंद केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी रात्रीच साळ येथे जाऊन मेघश्याम राऊत यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, ते घरी सापडू शकले नाही. तर तेथीलच एक संशयित नितीन परब यांना ताब्यात घेऊन अटक केली. मध्यरात्री ३ वा. मनोज नाईक शरण आल्यानंतर आज (शनिवारी) सकाळी मेघश्याम राऊत यांच्यासह भूपेंद्र मळीक, नितीन परब, सदा घाडी आणि दर्शन राऊत हे पोलिसांना शरण आले. लागलीच पोलिसांनी संशयितांना रीतसर अटक केली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय मामलेदार पुढील तपास करीत आहेत.

कार्यकर्त्यांची धडक
मेघ:श्‍याम राऊत आणि अन्य संशयितांना अटक करावी, अशी मागणी करीत डिचोली बचाव अभियानाच्या कार्यकर्त्यांनी आज (शनिवारी) सकाळी डिचोली पोलिस स्थानकावर धडक दिली होती. कार्यकर्ते बराचवेळ पोलिस ठाण्याबाहेर होते. नरेश सावळ यांचे डिचोलीच्या विकासासाठी मोठे योगदान असून, मेघश्याम राऊत यांनी दिलेल्या धमकीला कोणीही महत्त्व देत नाहीत, असे नरेश कडकडे यांनी म्हटले केले. छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करून मेघश्याम राऊत यांनी हिंदूंच्या या दैवताचा अपमान केला आहे, असेही श्री. कडकडे यांनी स्पष्ट करून या प्रकाराचा निषेध केला आहे.

संबंधित बातम्या