सहा वर्षांनंतर रस्ता रुंदीकरण काम सुरू

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

रस्ता रुंदीकरण आणि सुशोभिकरण प्रकल्पाचा नामफलक.
रस्ता रुंदीकरणाचे चाललेले काम.

बायणापासून ते सडा जंक्शनपर्यंतच्‍या कामाला चालना

मुरगाव : बायणा ते सडा, जेटी बोगदापर्यंतच्या साडेनऊ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि सुशोभिकरणाचे काम दीड वर्षात पूर्ण करू, अशी वल्गना केलेल्या गोवा साधन सुविधा विकास महामंडळाने आता सहा वर्षांनंतर अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्याचे काम जेटी येथे हाती घेतले आहे. या रेंगाळलेल्या कामाला चालना मिळावी यासाठी दै. ‘गोमन्‍तक’ने सातत्याने पाठपुरावा केला होता.

बायणापासून ते सडा जंक्शनपर्यंतचा प्रमुख रस्ता बराच अरुंद आहे. हा रस्ता मुरगाव बंदराकडे जात असल्याने या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. मालवाहू अवजड वाहनांसाठी हाच एकमेव रस्ता बंदराकडे ये जा करणारा आहे. त्यामुळे अरुंद रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव आमदार मिलिंद नाईक यांनी गोवा साधन सुविधा विकास महामंडळाकडे मांडून मंजुरी मिळवून घेतली.

बायणापासून ते सडा जंक्शन ते जेटी बोगदापर्यंत साडेनऊ किलोमीटर अंतराच्या या रस्त्याचे रुंदीकरण आणि सुशोभिकरण असा प्रकल्प महामंडळाने हाती घेऊन ता. २६ ऑक्टोबर २०१४ रोजी पायाभरणी समारंभ घडवून आणला. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर, विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री मिलिंद नाईक, तत्कालीन नगराध्यक्ष भावना भोसले आणि इतर नगरसेवकांच्या उपस्थितीत हा समारंभ सडा जंक्शनवर घडवून आणला. तेव्हा हा प्रकल्प दीड वर्षात पूर्ण केला जाईल अशी ग्‍वाही दिली होती, पण सहा वर्षे उलटत आली तरी आतापर्यंत अवघे तीस टक्केच काम पूर्ण झाले आहे.

कासवगतीने चाललेल्या या कामाविषयी दै. ‘गोमन्‍तक’ने सातत्याने बातम्या दिल्या. तेव्हाच कुठे तरी महामंडळाचे अधिकारी झोपेतून जागे होऊन त्यांनी कामाला सुरवात केली. जेटी परिसरात एक मीटर रुंदीचे गटार रस्त्याच्या दुतर्फा बांधले आहेत. ते पूर्णपणे बंद केले नसल्याने गेल्या काही दिवसांत या गटारात जनावरे पडून जखमी होण्याची घटना घडली आहे. या गटावरील लोखंडी सळ्या धोकादायक अवस्थेत ठेवल्या आहेत. गेल्यावर्षी एका मोटरसायकल चालकाच्या पायातून या सळ्या आरपार घुसण्याची घटना घडली होती. तरीही महामंडळाने त्याकडे लक्ष दिले नव्हते.

मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. तो पूर्ण व्हावा यासाठी त्यांनीही आपल्यापरीने प्रयत्न केले. हा प्रकल्प साकार करण्यासाठी ज्याला कंत्राट दिले होते तो कंत्राटदार अर्धवट काम करुन पळाल्याचे सांगितले जायचे. पण त्याऐवजी अन्य कंत्राटदारांची नेमणूक करुन प्रकल्प चालीस लावण्याची तसदी महामंडळाने गेल्या पाच वर्षांत घेतली नाही. परिणामी दीड वर्षात साकार होणारा प्रकल्प सहा वर्षे झाला तरी अद्याप पूर्ण होत नाही.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जेटी येथे रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी बंदराच्या बाजूने संरक्षक भिंत उभारली जात आहे. अजूनही हे काम कासवगतीनेच चालले आहे. त्यामुळे आणखी किती वर्षे या रस्त्याचे काम चालणार असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

एकूण ३२ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचा खर्च आता वाढला आहे. या वाढीव खर्चाचे ओझे नाहक सरकारला पेलावे लागणार आहे. या रेंगाळलेल्या कामाच्या बाबतीत महामंडळाचे जे कोण अधिकारी कारणीभूत आहेत त्यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करुन खर्चाची वाढीव रक्कम त्यांच्याकडून वसुल करुन घ्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

 

 

संबंधित बातम्या