दुचाकी व चारचाकी प्रवाशांना सामाजिक अंतराची सक्ती

two four wheelar
two four wheelar

पणजी, 

टाळेबंदी २० एप्रिलपासून शिथिल केली असली तरी दुचाकी व चारचाकींमधील चालक तसेच सहचालकांमध्ये सामाजिक अंतर ठेवणे सक्तीचे करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन ते गोंधळून गेले आहेत. सरकारी कार्यालये काही तात्पुरत्या कर्मचारी वर्गांच्या मदतीने सुरू करण्यात येत असली तरी ग्रामीण भागांतून येणाऱ्या कर्मचाऱ्यांची मात्र मोठी गैरसोय होणार आहे.
केंद्र सरकारने लॉकडाऊन काळात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी गोव्यातही जारी करण्याचे गोवा सरकारने ठरविले आहे. या नियमांनुसार दुचाकीवरून एकालाच प्रवास करता येणार आहे. मात्र, त्याला मास्क व हेल्मेट सक्तीचे असेल. सहचालकाला दुकाचीवरून प्रवास करता येणार नाही. अपवादात्मक स्थितीत दुचाकीवर सहचालकाला मागे बसविल्यास त्यालाही हेल्मेट व मास्क सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, या सहचालकास घेऊन जाण्यासंदर्भातचे स्पष्टीकरण पोलिसांना द्यावे लागणार आहे. चारचाकी वाहनांमध्ये चालक वगळता एकट्यालाच त्यातून प्रवास करता येणार आहे. ही व्यक्ती चालकाच्या बाजूला बसता कामा नये, तर त्याने मागील आसनावर बसणे बंधनकारक आहे. जर कोणी या नियमांचे उल्लंघन करील त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा देतानाच कोरोनाच्या लढ्यात सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन गस्तीवरील वाहनातून पोलिस ठिकठिकाणी फिरून करत होते. या आवाहनामुळे उद्या सकाळी कामाला जाणारे सरकारी कर्मचारी गोंधळून गेले आहेत.
सरकारी कार्यालये कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीने उद्या (२० एप्रिल) सुरू होणार आहेत. त्यासाठी राज्याच्या प्रमुख शहरातून कदंब बस सेवा प्रवाशांना बसेसमधील आसनावर सामाजिक अंतर ठेवून सुरू करण्यात येणार आहे. मात्र, जे कर्मचारी शहरापासून आतील भागात राहतात त्यांना कार्यालयामध्ये पोहचणे अडचणीचे झाले आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला वाहन चालविता येत नाही व त्याला कुटुंबातील सदस्याने दुचाकीवरून कार्यालयात पोहचविण्याचा प्रयत्न केला, तर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार दुचाकीवरून दोघांना प्रवास करणे शक्य नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी कदंब बससेवा नाही व फक्त खासगी मिनीबसेस धावतात तेथील लोकांनी कार्यालयात कसे जावे असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. या नव्या नियमांमुळे वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
राज्यात लॉकडाऊन असताना दुचाकीवरून दोघांना प्रवास करण्यास हे नियम लावण्यात आले नव्हते. मात्र, आज राज्यातील अनेक भागात वाहनचालकांना या नियमांचे पालन करा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा दमच सरकारकडून दिला जात असल्याने अनेक वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे लागणार आहे, असे मत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com