सुजलाम् सुफलाम्

अनिरुध्द जोशी
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

अनुभव समाजसेवेचे : आपल्या भारत देशाला सुजलाम् सुफलाम् असे जेव्हा आपल्या वंदेमातरम् या गीतात गौरवले गेले, तेव्हा लेखकाच्या मनात आपल्याकडील असलेली वेगवेगळ्या विषयातील सुबत्ताच अभिप्रेत असावी. मात्र, जागेअभावी त्यांनी फळ आणि पाणी याचेच उदाहरण फक्त दिले असावे. आज आपण आपला देश किती बाबतीत समृद्ध आहे, याचा आढावा घ्यायचा प्रयत्न करूया.

आर्थिक : आज काल आर्थिक सुबत्ता ही राष्ट्रातील प्रत्येक माणसाने केलेल्या उत्पादनाची किमतीची तुलना करून पाहिली जाते.या व्याख्येप्रमाणे लुक्झेम्बर्ग या देशातील प्रत्येक नागरिक, जगातील सगळ्यात जास्त, सत्तर लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पादन प्रति-वर्षी करतो. त्यामानाने अमेरिका हा देश, जो जगात सगळ्यात जास्त किमतीचे उत्पादन करतो.

त्यातील नागरिक हे प्रति-वर्षी ४५ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे उत्पादन करतात. जपान,चीन आणि आपल्या देशातील नागरिक अनुक्रमे प्रति-वर्षी अंदाजे २८, ६ व दीड लाख रुपये किमतीचे उत्पादन करतात.प्रगत आणि आपल्यासारख्या प्रगतिशील राष्ट्राच्या उत्पादनाच्या किमतीत एवढी तफावत आहे.तरीपण आपल्या देशात काम करायला योग्य अशी सशक्त आणि शिकलेली लोकसंख्या जगात इतर कुठच्याही देशापेक्षा सगळ्यात जास्त आहे आणि गेल्या ६ वर्षात आपल्या देशाने अव्यवस्थेकडून व्यवस्थेकडे जाण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत, ते पाहता आपले आर्थिक भविष्य उज्‍ज्वल आहे, असे बऱ्याच अर्थतज्ञांचे मत आहे.

ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक आपल्या पूर्वजांनी आपल्या देशात येणाऱ्या वेगवेगळ्या जाती जमातींचा नेहमी आदर केला.इंग्रजांनी या मानसिकतेचा फायदा घेऊन आपल्या देशाला लुटलं व परत जाताना फाळणी करून गेले.तरीसुद्धा आपल्या संस्कृतीचा गाभा ते लुटून नेऊ शकले नाहीत. मोगलांनी त्यांची संस्कृती धर्मपरिवर्तनाच्या आधारे इथल्या जनतेत रुजविण्याचा प्रयत्न केला आणि ते जिथे राज्य करत होते, तिथे ते बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाले. पण भारताच्या संस्कृतीचा गाभा ते सुद्धा बदलू शकले नाहीत, असे जरी असले तरी आपली भारतीय संस्कृती त्यामुळे अजून श्रीमंत झाली. आपल्याकडे आज काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत आणि महाराष्ट्रापासून आसामपर्यंत वेगवेगळ्या राज्यांची आपली संस्कृती तर आहेच, पण त्यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माच्या चालीरीती सुध्दा सामावलेल्या आहेत. आपण जेव्हा दुसऱ्या देशाचे जेवण बघतो तेव्हा आपल्याला कळतं आपल्या देशात बनतात तितके पदार्थ इतर कुठच्याच देशात बनत नाहीत. मी याला संस्कृतीची रेलचेल असे म्हणेन.

हवामान आणि जमीन : जगातल्या वेगवेगळ्या देशातील हवामान जर आपण पाहिले तर आपल्याला कळून येईल की, आपण किती नशीबवान आहोत ते. युरोप, जपान चीन आणि अमेरिका या देशामध्ये पीक घेण्यासाठी त्यांना निसर्गाशी दोन हात करावे लागतात. म्हणूनच की काय ती माणसे निसर्गाशी भांडून आपले जीवन मिळवायला शिकले आणि आपल्याला निसर्गाने सगळेच आयते दिल्यामुळे बहुतेक तंत्रज्ञानात आपण त्यांच्या मागे पडलो.

भौगोलिक : आपल्याकडे जगातला सर्वांत उंच पर्वत आहे. इतर देशांच्या मानाने आपल्याकडे जगातील सगळ्यात श्रीमंत किनारपट्टी आहे. आपल्या पर्वतावरून वाहणाऱ्या नद्यांनी आपल्या देशाला समृद्ध केलेले आहे. आपल्याला लाभलेला समुद्र इतर समुद्रांपेक्षा बराच मवाळ असा आहे.

जैव विविधता : उत्तुंग शिखरे, वर्षाला ५० सेंटीमीटरपासून ६०० सेंटीमीटरपर्यंत पाऊस, बर्फाच्छादित शिखारांपासून ते ५२ डिग्रीपर्यंत तापमान वाढणारे प्रदेश यांची आपल्याकडे रेलचेल असल्यामुळे आपल्याकडे जगात दुर्मीळ असलेली जैवविविधता आहे. त्यामुळे सगळ्या तऱ्हेची फुलं, बऱ्याच तऱ्हेची फळं, आपल्या देशाला लाभलेली आहेत. १०० हून अधिक आंब्याच्या जाती असलेला भारत हा एकच देश आहे. शिवाय औषधी झाडांचा भरणा आहे, तो वेगळाच.

सहा वर्षांनंतर रस्ता रुंदीकरण काम सुरू

वैद्यकीय उपचार : आपल्याकडे प्राचीन काळापासून चालत आलेली आयुर्वेदिक उपचार पद्धती, ईस्टकडून भारतात आलेली उनानी उपचारपद्धती, निसर्गोपचार पद्धती आणि जर्मनीहून आलेली होमिओपॅथिक उपचार पद्धती आणि अॅलोपॉथिक पद्धत अशा सगळ्या पद्धती आपल्या राष्ट्रात वापरल्या जातात. या सगळ्यामुळे आपल्या देशात कुठचाही आजार सगळ्यात स्वस्तात बरा केला जातो.

भूगर्भातील संपत्ती : आपल्या देशातल्या भूगर्भात सगळे महत्त्वाचे पदार्थ आढळतात. आतापर्यंत तेल आणि नैसर्गिक वायू नाही, असे वाटत होते. पण गेल्या वीस वर्षात आपल्या देशाने या दोन्ही पदार्थांचे खाणकाम सुरू केले आहे.

तत्त्वज्ञान : जगात बरेच तत्त्वज्ञानी होऊन गेले, पण भारतात प्राचीन काळापासून जितके तत्त्वज्ञानी निर्माण झाले आहेत, तितके अजून कुठच्याच देशात झाले नाहीत. प्राचीन सनातन हिंदू धर्म जो गेल्या ५००० वर्षांपासून विकसित होतोय. तो याच तत्त्वज्ञान्यांमुळे जिवंत राहिला व जोपासला गेला. आपण सगळे एकाच ईश्वराचे अंश आहोत व वेगवेगळे लोक हे एक तत्त्व अनुभवण्याकरता वेगळे वेगळे मार्ग अवलंबतात, असे हा धर्म मानतो. हा धर्म इतर धर्मीयांना शत्रू मानत नाही

 

संबंधित बातम्या