काणकोणातील पाणी समस्या सोडवा ः काँग्रेस

dainik Gomantak
सोमवार, 27 एप्रिल 2020

काणकोणमधील पाणी समस्या निकालात काढण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन भंडारी व अन्य कार्यकर्त्यांनी काणकोण मामलेदार व उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.

काणकोण

काणकोणमधील पाणी समस्या निकालात काढण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन भंडारी व अन्य कार्यकर्त्यांनी काणकोण मामलेदार व उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
तालुक्याच्या ग्रामीण भागात उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. पेय जल मिळवण्यासाठी गावडोंगरी, खोतीगावातील रहिवाशांना  जलपात्रात खड्डे खणून पाणी मिळवावे लागते. येथील जुन्या ग्रामीण जलपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. या कुपनलिकावरील मोटार पंप गंजून गेले आहेत. त्यामुळे हे पाणी प्रकल्प कूचकामी ठरले आहेत. काणकोण तालुक्याच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे त्याप्रमाणे वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी उपाययोजना जलपुरवठा खात्याने केली नाही. चोवीस तास सोडा किमान चोवीस मिनिटे नियमीत उच्च दाबाचा पाणीपुरवठा करण्याची गरज आहे.
ज्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, त्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा त्वरित करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. एका बाजूला नागरिकांना कोविड-१९ मुळे लॉकडाऊनशी सामना करून जीवन जगावे लागत आहे, तर दुसऱ्या बाजूला पाण्याची समस्या बिकट बनली आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणेने त्वरित उपाययोजना करावी अन्यथा काँग्रेसने जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाममंत्री दिदीपक पाऊस्कर, मुख्य सचिव परिमल रॉय, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय, मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर, कार्यकारी अभियंता विजय कुडचडकर, उपजिल्हाधिकारी प्रितीदास गावकर, मामलेदार विमोद दलाल यांना देण्यात आल्या आहेत.
 

संबंधित बातम्या