आयुर्वेदातर्फे "इम्यून सिस्टम'साठी खास चूर्ण!

Dainik Gomantak
गुरुवार, 16 एप्रिल 2020

गोवा आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशनशी संबंधित डॉक्‍टरांकडे अशाप्रकारची चूर्ण तसेच इतर औषध प्रणाली उपलब्ध करण्यात आली असल्याची माहितीही डॉ. अनुरा बाळे यांनी दिली.

फोंडा,

कोरोना रुग्णांसाठी आयुर्वेद महाविद्यालयाने खास वनस्पतींचा वापर करून तयार केलेले चूर्ण हे उपयुक्त ठरत असून "इम्यून सिस्टम' अबाधित राखण्यासाठी या चूर्णचा अत्यंत प्रभावी वापर होत असल्याचे शिरोडा येथील गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र तसेच कामाक्षी आरोग्यधामच्या प्राचार्य डॉ. अनुरा बाळे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.
हे आयुर्वेदिक चूर्ण कॉरन्टाईन केलेल्या सर्वांना उपयुक्त असून दीड लिटर पाण्यात पाव चमचा चूर्ण घालून ते दहा मिनिटे उकळून त्याचे सेवन ठराविक कालावधीत केले पाहिजे. याशिवाय गरम पाणी पिणे हे महत्त्वाचे असून श्‍वसनाच्या तक्रारी असलेल्यांनी आयुर्वेदिक औषध प्रणालीचा वापर करणे गरजेचे आहे. गोवा आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशनशी संबंधित डॉक्‍टरांकडे अशाप्रकारची चूर्ण तसेच इतर औषध प्रणाली उपलब्ध करण्यात आली असल्याची माहितीही डॉ. अनुरा बाळे यांनी दिली.
कोरोनाशी लढा देताना प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे. कोरोनावर उपचार करताना आपली "इम्यून सिस्टम' व्यवस्थित असणे गरजेचे आहे. पाचन शक्तीबरोबरच आत्मिक आणि शारीरिक शक्ती जर अबाधित राहिली तर कोरोनाची भीती बाळगण्याची गरजच नाही. त्यामुळे काळजी हे प्रथम पथ्य असल्याचे अनुरा बाळे म्हणाल्या. जगभर कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे. मोठमोठी राष्ट्रे जेरीस आली आहेत. त्यामुळे भारतात कोरोनाचा प्रादूर्भाव अधिक होता कामा नये यासाठी नागरिकांनीच काळजी घ्यायला हवी. सरकार आपल्यापरीने काम करीलच, पण प्रत्येकाने सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करायला हवा. मूळात सोशल डिस्टन्सिंग हे महत्त्वाचे आहे. एकमेकापासून फैलाव होणाऱ्या या विषाणूला रोखण्यासाठी अशाप्रकारचे सोशल डिस्टन्सिंग हे अत्यावश्‍यक आहे, आणि गोव्यातील शिक्षित नागरिकाला ते पूर्ण माहिती असल्याने गोवात कोरोनाचा तेवढा प्रादूर्भाव झालेला नाही. तरीपण अधिक काळजी घेणे आवश्‍यक असून कुणालाही ताप अथवा श्‍वसनाचा विकार जाणवल्यास लगेच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्‍यक असल्याचे मत डॉ. अनुरा बाळे यांनी व्यक्त केले.
शिरोडा येथील गोमंतक आयुर्वेद महाविद्यालयाच्या कामाक्षी आरोग्यधामात बाह्य रूग्ण विभागात रोज किमान शंभर ते सव्वाशे रुग्ण तपासणी येतात. विविध आजारांवर प्रभावी उपचार पद्धतीचा अवलंब कामाक्षी आरोग्यधामात केला जात असल्याने रुग्णांना ते सोयिस्कर ठरते. दीर्घकाळ आराम मिळत असल्याने आयुर्वेदिक या प्राचीन उपचार पद्धतीला रुग्णांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचेही अनुरा बाळे म्हणाल्या.
शिरोड्यातील गोमंतक आयुर्वेद महाविद्यालयाची स्थापना झाल्यास सव्वीस वर्षे झाली आहेत. दरवर्षी साठ नवे डॉक्‍टर्स आयुर्वेद उपचार पद्धतीचे शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून या महाविद्यालयाला मर्यादित सरकारी अनुदान मिळत असल्याने रुग्णसेवा प्रभावीपणे राबवणे शक्‍य झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच या महाविद्यालयाचे अध्यक्ष व इतरांचे वेळोवेळी सहकार्य लाभत असल्याने शिरोड्यातील या कामाक्षीधामात केवळ गोवाच नव्हे तर गोव्याबाहेरील रुग्णही उपचार घेण्यासाठी येतात, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
कोरोनाशी लढा देताना सरकारच्या सूचनेनुसार कामाक्षी आरोग्यधामात कॉरन्टाईन करण्याची तयारीही करण्यात आली आहे. शेवटी प्रत्येक माणूस आणि त्याचे जीवन हे महत्त्वाचे आहे, त्यामुळे गरज भासल्यास कोरोनाच्या सेवेत वृद्धी करण्याची तयारीही कामाक्षी आरोग्यधामाने ठेवली असल्याचे डॉ. अनुरा बाळे यांनी स्पष्ट केले.

आयुर्वेद वैद्यकीय सेवेस प्राधान्य!
शिरोड्यातील गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आणि कामाक्षी आरोग्यधामतर्फे राज्यातील कोरोनाबाधित संशयित रुग्णांसाठी आयुर्वेदिक सेवा देण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. अशाप्रकारची सेवा देणारे हे पहिले आरोग्यधाम आहे. कोरोनाचे संक्रमण गोव्यात वाढता कामा नये, याबद्दल आम्ही सजग आहोत, फक्त प्रत्येकाने आवश्‍यक नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
- पी. के. घाटे (अध्यक्ष, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र, शिरोडा) 

संबंधित बातम्या