श्री ब्रह्मानंदाचार्य स्वामींची उद्या अष्टदशम् पुण्यतिथी

Dainik Gomantak
रविवार, 3 मे 2020

शिष्यांद्वारे घरोघरीच संपन्न होणार पुण्यतिथी उत्सव

खांडोळा

  कुंडई श्री क्षेत्र तपोभूमीचे संस्थापक तसेच ब्रह्मानुसंधान साधणारे किमयाकार, ब्रह्मलीन योगी, व्यसनमुक्ती ते जीवन मुक्तीच्या प्रवासातील सत्पुरुष ब्रह्मानंद स्वामी यांचा अष्टदशम् पुण्यतिथी उत्सव मंगळवार ५ रोजी साजरा करण्यात येणार आहे.
श्री दत्त पद्मनाभ पीठ पीठाधीश्वर, आध्यात्मिक धर्मगुरु, धर्मभूषण ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी धर्म, जात, पंथ या सर्वांना एकाच छत्राखाली घेऊन मानवतेसाठी व अभ्युदयासाठी शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रात वैश्विक स्तरावर नेत्रदीपक कार्य करीत आहेत. विश्वभर कोविड - १९ या विषाणूने थैमान घातलेले आहे. त्यामुळे भारत देशामध्ये संचारबंदी सुरु आहे. देशहिताचा व मानवतेचा सर्वोपरी विचार करून पूज्य ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या आज्ञेनुसार यंदाच्या वर्षी मंगळवार ५ मे रोजी सर्व शिष्य, अनुयायी घरोघरीच साजरा करण्यात येणार आहे.
शिष्य-अनुयायींद्वारे घरोघरी सद्‍गुरूपूजन, ब्रह्मसत्यम् जीवन चरित्र वाचन, जपानुष्ठान अशा प्रकारे पुण्यतिथी संपन्न होईल. तपोभूमी गुरुपीठावर फक्त पुरोहितांद्वारे अभिषेक, महापूजा व पालखी सोहळा तसेच सायंकाळी ७.०० वा. समाज माध्यमातून पूज्य ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींचे आशीर्वचन संपन्न होणार आहे. त्यामुळे राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजींच्या अष्टदशम् पुण्यतिथी दिनी कोणीही शिष्य - अनुयायांनी गुरुस्थानी येऊ नये, असे निवेदन श्री दत्त पद्मनाभ पीठाचे महाप्रबंधक शुभक्षण नाईक यांनी केले आहे.

ऑनलाईन प्रवचन
अष्टदशम् पुण्यतिथी कार्यक्रम शिष्य, अनुयायींच्या घरोघरी साजरा होणार असून याप्रसंगी ब्रह्मेशानंदाचार्याचे आशीर्वचनही नेहमीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे सर्वांना या प्रवचनाचा लाभ घरबसल्या घेता येणार आहे. टाळेबंदीच्या काळात स्वामींनी अनेक प्रवचने, संदेश ऑनलाईन दिल्याने साधकांना, भाविकांना मोबाईल, संगणकाद्वारे आपल्या निवासस्थानी उपलब्ध झाला. तसेच तपोभूमीच्या विविध फेसबुक, वॉटस् सेवेद्वारेही ही प्रवचने ऐकण्याची, पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या