केंद्राच्‍या मार्गदर्शक सूचनेनंतरच बारावी, दहावी परीक्षा

Dainik Gomantak
गुरुवार, 30 एप्रिल 2020

परीक्षा घेणार की पूर्वीच्या परीक्षेच्या गुणांवर आधारीत गुण या परीक्षेत देणार हे त्याच दिवशी स्पष्ट होईल.

पणजी

बारावी परीक्षेतील उर्वरित पेपर आणि दहावीची परीक्षा कधी घ्यावी, याचा निर्णय ३ मे रोजी केंद्र सरकारची मार्गदर्शक सूचना आल्यावर घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती आज दिल्याचे ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो यांनी सांगितले. लोबो आणि कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी परीक्षा कधी होतील? हे जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतली. त्या भेटीनंतर लोबो यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, अनेक पालक दूरध्वनी करून परीक्षेसंदर्भात विचारणा करत आहेत. बारावीचा एकच पेपर राहिल्याने त्या विद्यार्थ्यांना ‘परीक्षा संपली सुटलो एकदाचा’ याचा अनुभवही घेता येत नाही. सगळे तणावाखाली आहेत. केवळ विद्यार्थीच नव्हेत, तर पालकही तणावात आहेत. त्यामुळे याविषयी विचारणा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो. ‘कोविड-१९’ टाळेबंदी ३ मे पर्यंत सध्या आहे. देशभरात काय परिस्थिती आहे आम्ही सारे पाहत आहोत. गोव्यात ‘कोविड-१९’ संसर्ग झालेला नवा रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे ३ मे नंतर काही सवलती राज्याला मिळतील काय? याकडे सरकारचे लक्ष आहे. या परीक्षांसंदर्भात केंद्र सरकारच्या पातळीवर निर्णय घेतला जाणे शक्य आहे. त्यामुळे राज्य सरकारने ३ मे पर्यंत केंद्र सरकारची मार्गदर्शक सूचना जारी होईपर्यंत या परीक्षांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी प्रतीक्षा करण्याचे ठरवले आहे. पालक व विद्यार्थ्यांनीही आणखी दोन तीन दिवस सरकारच्या निर्णयाची आजवर दाखवलेल्या संयमानेच वाट पहावी. परीक्षा घेणार की पूर्वीच्या परीक्षेच्या गुणांवर आधारीत गुण या परीक्षेत देणार हे त्याच दिवशी स्पष्ट होईल.

 

 

Goa Goa Goa

संबंधित बातम्या