डिचोलीतील जुन्या प्रकल्पाचा जिना शाबूत

Dainik Gomantak
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

सुडाच्या सूचनेनुसार जिना पाडण्याची तयारीही चालू झाली होती. मात्र या 'जिन्या'खालील विक्रेत्यांच्या स्थलांतरांचा प्रश्‍न सध्यातरी "जैसे थे" राहिल्याने जिना पाडण्याचा पालिकेचा प्रस्ताव तूर्तास रेंगाळल्यातच जमा आहे.

तुकाराम सावंत
डिचोली

डिचोली बाजारातील जुन्या इमारत प्रकल्पाचा कमकुवत "जिना" पाडण्याचा प्रस्ताव आता लांबणीवर पडल्यातच जमा आहे. त्यामुळे जमीनदोस्त होण्याची संक्रांत आलेल्या या जिन्याचे आणखी काही दिवस तरी अस्तित्व दिसून येणार आहे. पूर्णत्वाच्या मार्गावर असलेल्या चौथ्या टप्प्यातील प्रकल्पासाठी मोकळी जागा मिळावी. या उद्‍देशाने कमकुवत झालेला हा जिना पाडण्याचा विचार पुढे आला होता. सुडाच्या सूचनेनुसार जिना पाडण्याची तयारीही चालू झाली होती. मात्र या 'जिन्या'खालील विक्रेत्यांच्या स्थलांतरांचा प्रश्‍न सध्यातरी "जैसे थे" राहिल्याने जिना पाडण्याचा पालिकेचा प्रस्ताव तूर्तास रेंगाळल्यातच जमा आहे.
या विक्रेत्यांचे स्थलांतर करण्यासाठी बाजारातील गणपती पूजन मंडपाच्या मागच्या बाजूने उभारण्यात आलेले 'ते' पाचही पत्र्यांचे गाळे बेकायदा असल्याचे स्पष्ट झाल्याने हे गाळे काढण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. जोपर्यंत जिन्याखालील विक्रेत्यांचे स्थलांतर होत नाही, तोपर्यंत जिना पाडण्याचा प्रस्ताव रखडल्यातच जमा आहे.
दरम्यान, सोमवारी झालेल्या पालिका मंडळाच्या तातडीच्या बैठकीत या जिन्याचा विषय चर्चेत आला. हा जिना पाडावा, असे पत्र सुडाने पाठवले असले, तरी जिन्याखालील विक्रेत्यांचे जोपर्यंत स्थलांतर होत नाही, तोपर्यंत जिन्याला हात लावता येणे शक्‍य नाही. तूर्तास या जिन्याची स्थैर्यता पुन्हा तपासावी. आणि त्यानंतरच जिन्याबाबतीत काय तो निर्णय घ्यावा. असे पालिका मंडळाच्या बैठकीत ठरविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
"जिना" शाबूत!
पालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील इमारत बांधकामाला 35 वर्षांहून अधिक काळ लोटलेला आहे. या प्रकल्पासाठी जुन्या बाजाराच्या दिशेने बाहेरच्या बाजूने जिना बांधण्यात आलेला आहे. गेल्या जवळपास तीस वर्षांपासून या जिन्याखाली पाच विक्रेते गाळे थाटून आपला व्यवसाय करीत आहेत. या गाळ्यांना शटरे बसवतानाच वीज जोडणीही मिळालेली आहे. जिना पाडण्यासाठी या विक्रेत्यांचे स्थलांतर करण्यासाठी गणपती पूजन मंडपाच्या मागच्या बाजूने पत्र्यांचे पक्‍के गाळे उभारले होते. मात्र, या गाळ्यांचे प्रकरण तापले आणि बेकायदा असल्याचे निष्पन्न झाल्याने आता हे गाळे हटविण्यात येणार आहे. परिणामी विक्रेत्यांचे स्थलांतर झाले नसल्याने तूर्तास हा जिना शाबूत राहणार आहे.

 

संबंधित बातम्या