जिल्हा खनिज फाउंडेशनमधील निधीचा वापर कोरोना संकटात करा

Dainik Gomantak
मंगळवार, 21 एप्रिल 2020

जिल्हा खनिज फाउंडेशनमधील  निधीचा वापर कोरोना संकटात करा 

पणजी, 

जिल्हा खनिज फाऊंडेशनमधील (डीएमएफ) निधीचा वापर ‘कोविड-१९’ संकटकाळात लोकांसाठी करावा, अशी मागणी ‘प्रहार’ या दिल्लीस्थित संघटनेने केली आहे. ही संस्था गरजू लोकांना मदत करते. या संस्थेने ‘कोविड-१९’च्या आपत्तीमध्ये राष्ट्रीय पातळीवर रोजीरोटी पुनरुत्थान आणि स्वयंरोजगार उपक्रम सुरू केला आहे.
खाण खात्याच्या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार ३१ जानेवारी २०२०पर्यंत डीएमएफ फंडामध्ये ३५ हजार ९२५ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यातील फक्त ३५ टक्के म्हणजेच १२ हजार ४१४ कोटी रुपये खर्च केले असून, एकूण २३ हजार ५१० कोटी रुपये शिल्लक आहेत.
२६ मार्च २०२० रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली होती की, डीएमएफ फंडामधील निधीचा वापर टेस्टिंग, स्क्रिनिंग तसेच राज्याच्या इतर आरोग्य सेवांसाठी वापरण्यात यावा. परंतु तीन आठवडे होऊनही या फंडाचा वापर नगण्य आहे. कारण या फंडाचा वापर ‘कोविड-१९’च्या दरम्यान जीवन वाचविण्यासाठी कसा करावा याबाबत स्पष्ट निर्देश नाहीत.
गोव्याच्या लोहखनिज फंडामध्ये ३९९ कोटी रुपये आहेत तर डीएमएफ फंडामध्ये १८८.६५ कोटी रुपये आहेत. यातील केवळ २ टक्के फंड म्हणजेच ४ कोटी रुपये हे लोककल्याणासाठी वापरले आहेत. राज्य ‘कोविड-१९’सारख्या आपत्तीमधून जात असताना या फंडाचा वापर ‘बेल आउट पॅकेज’ सारखा होऊ शकतो. अर्थ मंत्र्यांची घोषणा व त्यानंतर राज्य शासनाने केलेला फंडचा वापर यात विरोधाभास आहे. माध्यमातील बातमीनुसार गोव्यातील एका एनजीओने या फंडाच्या वापराविषयी सर्वोच्च न्यायालयात तक्रार घालण्याची धमकी दिली आहे. अशाप्रकारे विधायक कामास विरोध करणे चुकीचे आहे, असेही संस्थेचे म्हणणे आहे.

चौकट करा...
ााअर्थव्यवस्था जगण्यासाठी एकत्र या...
‘प्रहार’ संस्थेचे अध्यक्ष अभय राज मिश्रा म्हणाले की, पंतप्रधानांनी आपल्या भाषणात जीवन तसेच उपजीविकेचे साधन वाचविण्याचे सांगितले आहे. त्याला अनुसरून सध्याच्या परिस्थितीत सामाजिक, आर्थिकदृष्ट्या सर्वात खाली असलेल्या लोकांसाठी न वापरलेला खनिज निधी वापरला पाहिजे. फंडाच्या वापराला विरोध करणाऱ्या संथांना वेळीच रोखले पाहिजे. सध्याच्या घडीला माणसे तसेच अर्थव्यवस्था जगविण्यासाठी न्याय व्यवस्था, विधिमंडळ, प्रशासकीय अधिकारी तसेच सर्व नागरी समाजाने एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.

 

संबंधित बातम्या