शेअर बाजारातील घसरण कायम

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

सलग तिसऱ्या सत्रात सेन्सेक्‍स, निफ्टीमध्ये पडझड

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 67 अंशांची घट होऊन 12 हजार 45 अंशांवर बंद झाला.

 

मुंबई : आर्थिक मंदी आणि कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बसणारा आर्थिक फटका, यामुळे शेअर बाजारातील घसरणीचे वारे सोमवारी सलग तिसऱ्या सत्रात कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 202 अंशांची घसरण होऊन 41 हजार 55 अंशांवर बंद झाला.

बॅंकिंग, तेल व नैसर्गिक वायू आणि वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांवर आज मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव दिसून आला. सेन्सेक्‍सच्या मंचावरील 19 कंपन्यांचे समभाग घसरले, तर 11 कंपन्यांचे समभाग वधारले. ओएनजीसी, सन फार्मा, एनटीपीसी, बजाज ऑटो, एचडीएफसी, आयटीसी आणि एसबीआय यांच्या समभागांत आज 3.20 टक्‍क्‍यांपर्यंत घसरण नोंदविण्यात आली. दुसरीकडे टायटन, नेस्ले, टीसीएस, कोटक बॅंक, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट आणि इन्फोसिस यांच्या समभागांत 1.86 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली. आशियाई देशांतील शेअर बाजारांमध्ये आज संमिश्र वातावरण होते. युरोपीय देशांतील शेअर बाजारांमध्ये आजच्या सत्राच्या सुरुवातीला तेजी दिसून आली.

विकासदराचा अंदाज कमी
"मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिस'ने 2020 वर्षासाठी भारताच्या विकासदराचा अंदाज घटविला आहे. आधी विकासदराचा 6.6 टक्के असलेला अंदाज कमी करून 5.4 टक्के वर्तविण्यात आला आहे. मंदीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची अर्थव्यवस्थेची क्षमता अपेक्षेपेक्षा कमी दिसून आल्याने विकासदराचा अंदाज घटविण्यात आला आहे.

या कंपन्यांनी भरला कोटींचा दंड​

खनिज तेल घसरले
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आज खनिज तेलाच्या भावात घसरण नोंदविण्यात आली. खनिज तेलाचा भाव प्रतिबॅरल 0.07 टक्‍क्‍याने कमी होऊन 57.28 डॉलरवर आला.

संबंधित बातम्या