प्रबळ उमेदवारांमुळे मये मतदारसंघात चुरस

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 10 मार्च 2020

डिचोली: मये जिल्हा पंचायत मतदारसंघातील भाजप, काँग्रेस, मगोसह प्रमुख उमेदवारांनी सध्या प्रचारावर जोर दिला असून, बहुतेक उमेदवारांच्या प्रचाराची पहिली फेरी पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. मये जिल्हा पंचायत मतदारसंघातून विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर हे भाजपतर्फे, माजी आमदार धर्मा चोडणकर यांचे बंधू तथा चोडणचे पंच प्रसाद चोडणकर काँग्रेसतर्फे, तर मयेचे माजी सरपंच नारायण तारी मगोतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

डिचोली: मये जिल्हा पंचायत मतदारसंघातील भाजप, काँग्रेस, मगोसह प्रमुख उमेदवारांनी सध्या प्रचारावर जोर दिला असून, बहुतेक उमेदवारांच्या प्रचाराची पहिली फेरी पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. मये जिल्हा पंचायत मतदारसंघातून विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर हे भाजपतर्फे, माजी आमदार धर्मा चोडणकर यांचे बंधू तथा चोडणचे पंच प्रसाद चोडणकर काँग्रेसतर्फे, तर मयेचे माजी सरपंच नारायण तारी मगोतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

माजी सभापती अनंत शेट यांचू बंधू तथा मयेचे पंच प्रेमेंद्र शेट आणि अनेक संस्थाशी संबंध असलेले प्रा. राजेश कळंगुटकर हे या मतदारसंघातून निवडणूक लढविणारे अन्य प्रबळ उमेदवार आहेत. याशिवाय राष्ट्रीय समाज पक्षातर्फे दिपकुमार मापारी आणि कृष्णा वळवईकर हे अपक्ष मिळून सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या दोन अपक्ष उमेदवारांचा यापुर्वी भाजपशी संबंध आल्याने भाजपच्या मतांची काही प्रमाणात विभागणी होण्याची शक्‍यता आहे.

शंकर चोडणकर यांच्यावर भाजपने विश्वास ठेवून त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. मयेचे आमदार प्रवीण ‌झांट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या स्थानिक नेत्यांसह मतदारसंघातील भाजपची युवा, महिला मोर्चा आणि मंडळ समितीचे कार्यकर्ते त्यांच्या प्रचारकार्यात उतरले आहेत. विविध पंचायतींचे सरपंच, पचसदस्यही त्यांच्या प्रचारकार्यात सहभागी होत आहेत. कार्यकर्त्यांसह शंकर चोडणकर यांनी घरोघरी प्रचार करण्यावर भर दिला आहे. चोडण, नार्वे, मये या पंचायत क्षेत्रात त्यांनी आपल्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे. अन्य उमेदवारांच्या तुलनेत अपक्ष उमेदवार प्रेमेंद्र शेट हे प्रचाराच्याबाबतीत आघाडीवर आहेत.

त्यांनी घरोघरी भेट देवून जनतेशी संवाद साधण्यावर तसेच कोपरा बैठकांवर भर दिला आहे. त्यांच्या प्रचारकार्यात बंधू तथा माजी सभापती अनंत शेट सक्रिय झाले आहेत. मयेतील काही पंच तसेच भाजपकडे संबंध असलेले कार्यकर्तेही प्रेमेंद्र शेट यांच्या प्रचारकार्यात सहभागी होत आहेत. मगोचे नारायण तारी हे मगोचे पक्षनिष्ठ आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांच्या प्रचारकार्यात मगो कार्यकर्त्यांची फळी भक्‍कमपणे उभी आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवित असलेले प्रा. राजेश कळंगुटकर हे सुशिक्षित उमेदवार आहेत. मये भू-विमोचन समिती, मराठी सांस्कृतिक केंद्र, हातुर्ली ग्राम समिती, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सम्राट क्‍लब आदी संस्थाकडे त्यांचा संबंध आहे.

यापुर्वी त्यांनी भाजपच्या मये युवा समितीचे अध्यक्ष, उत्तर गोवा युवा समितीचे सरचिटणीस आणि मंडळ समितीचे सचिव म्हणून काम केलेले आहे. निवडक सुशिक्षीत कार्यकर्त्यांची फळी त्यांच्या प्रचारकार्यात उतरली आहे. त्यांचा मतदारसंघात नियोजीतपणे प्रचार चालू आहे. काँग्रेसचे प्रसाद चोडणकर यांनीही काँग्रेस कार्यकर्त्यांसह प्रचारकार्यावर जोर दिला आहे. राजकारणातील दांडगा अनुभव असलेले त्यांचे बंधू धर्मा चोडणकरही प्रचारकार्यात सक्रिय झाले आहेत. दिपकुमार मापारी आणि कृष्णा वळवईकर यांनीही प्रचारावर भर दिला आहे. एकंदरीत प्रबळ उमेदवारांमुळे या मतदारसंघात सध्याच्या घडीस चुरस वाढली आहे.

संबंधित बातम्या