१० वी, १२ वीचे विद्यार्थी संभ्रमात

तेजश्री कुंभार
रविवार, 26 एप्रिल 2020

खरे तर ९ वी आणि ११ वीची परीक्षा संपली की लगेच म्हणजे एप्रिल महिन्यापासून बोर्डाची परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू होतो.

पणजी,

१० वी आणि १२ ची परीक्षा संपली की विद्यार्थ्यांना सुट्ट्यांचे वेध लागतात, पण यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदी सुरू असल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासातून सुटका तर होतच नाही, शिवाय परीक्षा केव्हा हा प्रश्न त्यांना भेडसावत असल्याने विद्यार्थी अधिक तणावग्रस्त होत चालले आहेत.
खरे तर ९ वी आणि ११ वीची परीक्षा संपली की लगेच म्हणजे एप्रिल महिन्यापासून बोर्डाची परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू होतो. बोर्डाच्या परीक्षा संपून मार्चअखेरीस विद्यार्थी अभ्यासातून मुक्त होतात. मात्र, आता एप्रिल संपत आला तरी परीक्षेची तारीख जाहीर होत नसल्याने विद्यार्थी अभ्यास करून कंटाळले आहेत. शिवाय शाळा बंद आहेत आणि घरी पालकांकडून अभ्यास करण्यासाठीचा आग्रह केला जात असल्याने विद्यार्थ्यांच्यात ताण येत आहे.
काही विद्यार्थ्यांनी असेही सांगितले की तोच तो अभ्यास करून आता कंटाळा आला आहे. मात्र घरी अभ्यासासाठी वेळ मिळाला असल्याचे सांगत अधिक अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. जे विद्यार्थी खासगी वर्गाला जातात, त्यांच्या वर्गामधील शिक्षकांकडे अनेक पालकांनी अधिक सरावासाठी गणिते आणि अभ्यासाच्या साहित्याची मागणी केली आहे. एकूणच विद्यार्थी या लॉकडाऊनला कंटाळले असून सामाजिक अंतर ठेवून लॉकडाऊनचे पालन करीत परीक्षा घेण्याची मागणी केली जात आहे.

आम्ही अभ्यासाला कंटाळलोय...
आम्ही आता अभ्यास करून करून कंटाळलो आहोत. परीक्षा केव्हा आहे, याची तारीख जरी सांगितली तरी आम्हाला थोडाफार दिलासा मिळेल. घरी बसून असल्याने घरातील लोकही अभ्यास कर म्हणून मागे लागतात. माझ्या मित्र मैत्रिणींची स्थितीही अशीच कंटाळवाणी आहे. दहावीच्या गुणांवर महाविद्यालयाचा प्रवेश आणि करिअर आधारलेले असल्याने गुण अधिक मिळविण्यासाठीचा ताणही आमच्यावर आहे. त्यामुळे परीक्षांच्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय होणे गरजेचे असल्याचे मत युनिटी हायस्कूल, वाळपईची दहावीची विद्यार्थिनी सोबिया इनामदार हिने व्यक्त केले.

सामाजिक अंतर ठेवत परीक्षा शक्य
आता राज्य कोरोनामुक्त असल्याने योग्य सामाजिक अंतर ठेवत तसेच सॅनिटायझर, मास्क या सुविधा पुरवीत परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना अभ्यासातून मुक्त करणे आवश्यक आहे. मला दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे फोन येत असून आता विद्यार्थी अभ्यास करून कंटाळले आहेत. त्यांच्यासह पालकांच्यातही तणावाचे वातावरण वाढत असून यावर लवकर तोडगा निघणे गरजेचे असल्याची माहिती सक्सेस अकादमीतील प्राध्यापक राहुल सबनीस यांनी दिली.

संबंधित बातम्या