मांद्रेत आज मेणबत्ती मोर्चा ध्वनिप्रदूषणाविरोधात विद्यार्थ्यांचा पुढाकार

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

पत्रकार परिषदेत बोलताना प्रदूषण नियंत्रण समितीचे सदस्‍य ॲड. प्रसाद शहापूरकर, आग्‍नेल फर्नांडिस, संदेश सावंत.सर्वत्र याबाबत जनजागृती होणार आहे, त्यानंतर हरमल किनारी भागातील विद्यार्थी मोर्चा काढणार आहेत.

मोरजी : ध्वनिप्रदूषणाविरोधात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन मोर्चा काढला आणि मोरजी आश्वे किनारी भागातील ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आले. आता त्याचपद्धतीने मांद्रे भागातील विद्यार्थी शुक्रवार ७ रोजी सायंकाळी शांततेत मेणबत्ती मोर्चा काढणार आहेत.

मोरजी, आश्वे, मांद्रे किनारा पर्यावरण विभागाने कासव संवर्धन मोहिमेमुळे संवेदनशील म्हणून जाहीर केला. या भागात सायंकाळी सातनंतर कसल्याच प्रकारचे विजेचे दिवे व संगीत लावण्यावर निर्बंध घातलेले आहेत. या कायद्याची संबंधित खाते, अधिकारी यांनी सरकारी पातळीवरून अंमलबजावणी करायला हवी. मात्र, ती होत नाही. त्याबद्दल व्यावसायिक संदेश शेटगावकर, उपदेश शेटगावकर आदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मोरजीत जागृती मोहीम यशस्वी झाल्यानंतर आता मांद्रेतील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन मांद्रे किनारी भागात चाललेल्या पार्ट्यांविरोधात एल्गार पुकारला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ७ रोजी सायंकाळी मेणबत्ती मोर्चाचे आयोजन केले आहे.

मांद्रे जुनसवाडा येथे ७ व ८ रोजी रिवा बीच रिसॉर्टमध्ये एक संगीत इव्हेंट आयोजित केला आहे. या इव्हेंटमधून ध्वनिप्रदूषण होणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी त्या विरोधात आवाज उठवायला सुरवात केली. पेडणे उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक यांना लेखी निवेदन देऊन या संगीत इव्हेंटला परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थी, नागरिक आता त्याविरोधात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शांततेत मोर्चा काढणार आहेत.

बार्देशमधील संगीत पार्ट्या कोण रोखणार ?
मोरजी, आश्वे, मांद्रे किनारी भागात आठवड्याला किमान चार पार्ट्या एका नाईट क्लबमध्ये चालू असायच्या. विद्यार्थी नागरिक व मोरजी पंचायत मंडळाने मूक मेणबत्ती मोर्चा काढला आणि या किनारी भागातील पार्ट्यांवर नियंत्रण आले. त्‍यामुळे बार्देश भागातील पहाटेपर्यंत चालत असलेल्या पार्ट्या का बंद केल्या जात नाही? असा प्रश्‍‍न विचारला जात आहे.

दरम्‍यान, जुनसवाडा मांद्रे येथे रिवा रिसॉर्टतर्फे होवू घातलेल्‍या ‘गोवा हिप हॉप’ या संगीत रजनीला पेडणे उपजिल्‍हाधिकारी यांनी परवानगी देवू नये, अशी मागणी स्‍थानिक नागरिकांनी केली आहे. मांद्रे ग्रामपंचायतीनेही कार्यक्रमास आक्षेप घेतला आहे, असे सरपंच सेरेफिना फर्नांडिस यांनी स्‍पष्‍ट केले. कार्यक्रमस्‍थळ सीआरझेड विभागात येवूनही परवाना देणारे अधिकारी दुर्लक्ष कसे करतात, असा प्रश्‍‍न प्रदूषण नियंत्रण समितीचे सदस्‍य ॲड. प्रसाद शहापूरकर यांनी उपस्‍थित केला आहे. याबाबत अनेक तक्रारी आल्‍याचे आग्‍नेल फर्नांडिस, संदेश सावंत यांनी सांगितले.
 

संबंधित बातम्या