मुलांच्‍या सहली विज्ञानाशी निगडीत असाव्‍यात, मुख्‍यमंत्री सावंत

Dainik Gomantak
गुरुवार, 16 जानेवारी 2020

पणजी,

पणजी,

विद्यार्थी वयात मुलांना ज्‍या गोष्‍टी शिकवल्‍या जातात, त्‍या त्‍यांच्‍या अत्‍यंत चांगल्‍या पध्‍दतीने लक्षात राहतात. मुलांना केवळ अभ्‍यासातून गोष्‍टी समजावून सांगण्‍याचा प्रयत्‍न केला तर कदाचित त्‍या या गोष्‍टी कंटाळवाण्‍या वाटू शकतात. मात्र त्‍यांनी प्रात्‍यीक्षकांच्‍या माध्‍यमातून दिलेले ज्ञान चांगले लक्षात राहते. म्‍हणून शाळांनी विज्ञानाशी निगडीत संस्‍था आणि प्रकल्‍पांना भेटी देणे गरजेचे असल्‍याचे मत मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्‍यक्‍त केले. 
गोव्‍यात सुरू झालेल्‍या भारतीय विज्ञान फिल्म महोत्सवाच्‍या ५ व्‍या आवृत्तीचे उद्‍घाटन गोव्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या उपस्‍थितीत झाले, यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एसआरएफटीआय) च्‍या संचालक डॉ. देबमित्रा मित्रा, आयआरआरएस- इसरो सेंटर, देहरादूनचे संचालक डॉ. प्रकाश चौहान, गोवा मनोरंजन संस्‍थेचे उपाध्‍यक्ष सुभाष फळदेसाई, धेंपो उद्योग समुहाचे अध्‍यक्ष श्रीनिवास डेम्पो, विज्ञान भारती राष्ट्रीय आयोजन
संस्थेचे जयंत सहस्रबुद्धे, विज्ञान भारतीचे अध्‍यक्ष सुहास गोडसे आणि इतर मान्‍यवर उपस्‍थित होते. 
गोव्‍यात एनआयओ तसेच वास्‍को येथे काम करणारी संस्‍था आहे. साळगाव येथे असणार्‍या कचरा व्‍यवस्‍थापन प्रकल्‍प हा आशियातील सर्वात मोठा प्रकल्‍प आहे. या प्रकल्‍पाला विद्यार्‍थ्‍यांनी भेटी द्यायला हव्‍यात. आम्‍ही शाळेत असताना संजीवणी शुगर फॅक्‍टरीमध्‍ये आमची सहल गेली होती. येथे साखर कशा पध्‍दतीने तयार होते, याची सर्व प्रक्रिया मी पाहिली होती, त्‍यामुळे माझ्‍या अद्यापही ती प्रकिया लक्षात आहे. विद्यार्‍थ्‍यांनी जर समोर प्रात्‍यक्षिक पाहिले तर त्‍यांच्‍या लक्षात राहत असल्‍याचे मुख्‍यमंत्री म्‍हणाले. 
हा महोत्‍सव १५ ते १८ जानेवारीपर्यंत चालणार असून महोत्‍सवाला विज्ञान, तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन विभाग (गोवा सरकार), विज्ञान प्रसार (डीएसटी) भारत सरकार, एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी), सीएसआयआर - एनआयओ (वैज्ञानिक आणि
औद्योगिक संशोधन परिषद - नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी) गोवा विद्यापीठ, सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन संस्था, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन रिसोर्सेस (एनआयएससीएआर) यांचे सहकार्र्य आहे. 

संबंधित बातम्या