जीवरक्षकांच्या आंदोलनाला यशाचे किरण

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

संसाधन विकास महामंडळातर्फे सेवेत घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

जीवरक्षकांच्या वयोमानाचा विचार केला, तर त्यांना सेवानिवृत्तीपर्यंतचे काम मिळणे आवश्‍यक आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांना इतर सुविधाही मिळायला हव्यात, अशी आपली इच्छा आहे. त्यामुळे त्यांना गोवा संसाधन विकास महामंडळातर्फे सरकारी सेवेत घेण्याचा आमचा विचार आहे.

पणजी : गेली अडीच ते तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या जीवरक्षकांच्या आंदोलनाला आज अखेर मुखमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यशाचा किरण दाखविला आहे. जीवरक्षकांच्या शिष्टमंडळाबरोबर आल्तिनो येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जीवरक्षकांच्या वयोमानाचा विचार करून गोवा मानव संसाधन विकास महामंडळातर्फे सरकारी सेवेत घेण्याविषयी सकारात्मकता दर्शविली आहे.

येत्या १५ तारखेनंतर पुढील बैठकीत त्याविषयी निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती गोवा ट्रेड युनियन असोसिएशनचे नेते ॲड. अजितसिंग राणे आणि स्वाती केरकर यांनी आज पत्रकारांना दिली.
दृष्टी कंपनीतून बाहेर पडलेल्या आणि सरकारी सेवेत घेण्यासाठी गेली अडीच ते तीन महिन्यांपासून विविध प्रकारे आंदोलन करणाऱ्या जीवरक्षकांच्या मागणीला आज अखेर यश आल्याचे राणे म्हणाले. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जीवरक्षकांच्या शिष्टमंडळाला आज निवासस्थानी बोलावून घेतले. त्यांनी आपणास जीवरक्षकांचा विषय माहीत असून आपणास त्यांच्याविषयी सहानुभूती आहे. याशिवाय राज्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये असलेल्या पोहण्याच्या तलावांवर जीवरक्षकांच्या वयाचा विचार करून काम उपलब्ध करण्याचा विचार आहे.

मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्‍वस्त केले असून आत्तापर्यंत जीवरक्षकांनी अत्यंत शांतपणे आंदोलन केले आहे. ५ रोजी विधानसभेवर आम्ही मोर्चा काढणार होतो, परंतु पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली नाही. त्यावेळी आम्ही पोलिसांच्यामार्फत आमचा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडला. आत्तापर्यंत आमच्या आंदोलनाला सत्ताधारी मंत्री, आमदार, विरोधी आमदार व इतर पक्षांच्या नेत्यांनी पाठबळ दिले आहे. त्याचबरोबर सुरवातीला विरोध करणाऱ्या परंतु आता जीवरक्षकांविषयी मत बदलणाऱ्या मंत्री बाबू आजगावकर यांचेही आम्ही आभार मानत असल्याचे केरकर यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या