केंद्र सरकारतर्फे डिजीटायझेशनसाठी पुरेसा निधी

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

केंद्र सरकारतर्फे खात्‍यांचे डिजीटायझेशन करण्‍यासाठी प्रोत्‍साहन तर दिलेच जाते, शिवाय पुरेसा निधीही दिला जातो. त्‍यामुळे आम्‍ही गोव्‍यातील महिला आणि बालकल्‍याण खाते तसेच आरोग्‍य खात्‍याचे डिजीटायझेशन करीत आहोत.

पणजी: केंद्र सरकारतर्फे खात्‍यांचे डिजीटायझेशन करण्‍यासाठी प्रोत्‍साहन तर दिलेच जाते, शिवाय पुरेसा निधीही दिला जातो. त्‍यामुळे आम्‍ही गोव्‍यातील महिला आणि बालकल्‍याण खाते तसेच आरोग्‍य खात्‍याचे डिजीटायझेशन करीत आहोत. या माध्‍यमातून आपल्‍याला हवी असणारी आकडेवारी एकत्रित करून त्‍या आकडेवारीचा वापर विविध योजनांमध्‍ये करता येते शक्‍य होत असल्‍याचे मत आरोग्‍यमंत्री विश्वजित राणे यांनी व्‍यक्‍त केले.

गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटतर्फे आयोजित करण्‍यात आलेल्‍या आरोग्‍य विषयक परिषदेमध्‍ये ते बोलत होते. यावेळी त्‍यांच्‍यासोबत भारत सरकारचे नीती आयोगाचे सल्‍लागार आलोक कुमार, डॉ. लाल पॅथ लॅबचे अध्‍यक्ष डॉ. अरविंद लाल, सेंटर ऑफ डिजिटल फ्‍युचरचे अध्‍यक्ष आर. चंद्रशेखर आणि इतर मान्‍यवर उपस्‍थित होते.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयासह आरोग्‍य खात्‍यातील प्रत्‍येक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना विविध गोष्‍टींचे प्रशिक्षण मिळावे, म्‍हणून सतत प्रयत्‍नशील आहोत. आमच्‍याकडे असणाऱ्या इतर साधनसुविधांमुळेच आम्‍ही सर्वांत मोठे इस्पितळ उभे करीत आहोत. सुमारे ४५० कोटी खर्चून बांधण्‍यात येणारे हे इस्‍पितळ लोकांच्‍या सेवेसाठी येत्‍या काही दिवसात खुले करण्‍यात येणार आहे. सार्वजनिक खासगी भागीदारीच्‍या माध्‍यमातून अनेक साधनसुविधा विकासाची कामे करता येत असल्‍याचे मंत्री राणे म्‍हणाले.

सार्वजनिक खासगी भागीदारीतून राज्‍यात अनेक वेगवेगळे प्रयोग करण्‍यात आले आहेत. स्‍तनकर्करोग, पोटाच्‍या कर्करोगाची तपासणी यासारख्‍या गोष्‍टी राज्‍यात सुरू करण्‍यात आल्‍या आहेत. येथे नवनवीन तंत्रज्ञानाचा वापरही करून घेतला जात आहे. देशभरात गोवा हे असे एकमेव राज्‍य आहे, जेथे मोफत औषधे वाटपांवर राज्‍य सरकारकडून १५० कोटीपेक्षा अधिक खर्च केला जात असल्‍याचेही मंत्री राणे म्‍हणाले.

आजच्‍या युगात तंत्रज्ञानाची झपाट्याने प्रगती होत आहे. या युगात अनेक स्‍टार्टअपच्‍या संकल्‍पना सूचत असतात, या संकल्‍पनांना सत्‍यात उतरविण्‍यासाठी अनेक मार्गही उपलब्‍ध असल्‍याने अशा संकल्‍पना घेऊन पुढे यायला हवे, असे मत आर चंद्रशेखर यांनी व्‍यक्‍त केले.

ही परिषद संपूर्ण दिवसभर चालली. या परिषदेत मेडिकल टुरिझम, आरोग्‍य क्षेत्रातील नवीन स्‍टार्टअप्‍स, सध्‍याच्‍या आरोग्‍य क्षेत्रासमोर आव्‍हाने यासारख्‍या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्‍यात आली.

संबंधित बातम्या