सांग्यात पाण्याअभावी करपतोय ऊस

Dainik Gomantak
बुधवार, 29 एप्रिल 2020

नुकसानीचा नेमका आकडा कळण्यासाठी आदल्या वर्षी शेतकऱ्यांचा किती ऊस संजीवनीत पाठविण्यात आला. आणि यंदा अपुऱ्या पाण्यामुळे किती टन उसाचे वजन घटले त्याची सरासरी काडून नुकसान भरपाई देण्यात येणार होती. पण, अद्यापही कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही.

मनोदय फडते

सांगे

गतवर्षी वाडे कुर्डीतील ऊस उत्पादकांचे ऊस मळे पाण्याविना करपून गेले होते. या घटनेला वर्ष होत आले आहे, पण अद्यापही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कृषी खात्याकडून एक दमडीसुद्धा मिळाली नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. गतवर्षी पाणीपुरवठा कमी झाल्याने उत्पादन घटले, याचा फटका सहन करावा लागत आहे.
ऊस उत्पादकांना जलसंपदा खात्यामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. वाडेकुर्डीत दोन नंबर वसाहतीजवळ नेत्रावती नदीवर बंधारा घालून पाण्याचा उपसा करून पाणी पुरविले जात आहे. तर दुसरा बंधारा वसाहत क्रमांक एकमध्ये साळावली धरणाच्या साचलेल्या पाण्यावर नायका बांध नावाने परिचित असलेला बंधारा आहे. अश्या दोन बंधाऱ्याचे पाणी पुरविले जात आहे. पण, त्यापैकी दोन नंबर वसाहती जवळील बंधारा गतवर्षी लवकर कोरडा पडू लागला होता. तीन दिवसांनी एकवेळ पाणी पुरविले जात होते. या बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या ऊस अपुऱ्या पाण्यामुळे करपून गेला होता. त्या मानाने नायका बांध बंधाऱ्यात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होता. तरीही अपुरा पाणीपुरवठा झाल्यामुळे वाडेकुर्डीत शंभरपेक्षा अधिक हेक्टर जमिनीतील ऊस करपून गेला होता. अशा शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी म्हणून कुर्डी व्ही. के. एस. सोसायटीचे चेअरमन आयेतीन मास्कारेन्हास, व्हाईस चेअरमन मनोज पर्येकर आणि इतर संचालक, शेतकऱ्यांनी खूप प्रयत्न केले होते. शिवाय सोसायटी संचालक मंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन नुकसान भरपाई मिळावी म्हणून निवेदन सादर करून आर्थिक मदत करण्यासाठी मागणी करण्यात आली असता, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मळ्याची पहाणी करण्यासाठी कृषी खात्याला आदेश देण्यात आला होता. प्रत्येक ऊस मळ्यात जाऊन अहवाल गोळा करून पुरावा म्हणून फोटो काढण्यात आला होता. नुकसानीचा नेमका आकडा कळण्यासाठी आदल्या वर्षी शेतकऱ्यांचा किती ऊस संजीवनीत पाठविण्यात आला. आणि यंदा अपुऱ्या पाण्यामुळे किती टन उसाचे वजन घटले त्याची सरासरी काडून नुकसान भरपाई देण्यात येणार होती. पण, अद्यापही कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही.

कोट्यवधींची योजना फसली...
वाडे कुर्डीत ऊस उत्पादकांना पाणीपुरवठा कमी होतो म्हणून जलसंपदा खात्याने ६५ कोटी रुपये खर्चून साळावली धरणाचे पाणी परत धरण जलाशयात सोडून ते नायकाबांध बंधाऱ्यात साठवून तेच पाणी ऊस शेतीला पुरवठा करणे असे ठरविण्यात आले. पण, ते पाणी संपूर्ण वाडेकुर्डीतील ऊस शेतीला न मिळता अर्धेच ऊसमळे त्या पाण्यामुळे ओलिता खाली आली. आजही जे ऊसमळे पाण्याविना करपून जात आहेत. त्या मळ्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी नायकाबांध ते दोन नंबर वसाहतीतील बंधाऱ्यात पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी जोडण्यात आलेली नाही. त्यामुळे ६५ कोटी रुपये खर्चून राभविण्यात आलेली योजना यशस्वी झाली नाही.

शेतकऱ्यांना गतवर्षाचा अनुभव येणार
गतवर्षी ऊस मळे करपल्याने शेतकऱ्यांनी आवाज उठविताच जलसंपदा खाते, कृषी खाते, अधिकारी धावाधाव करून नायका बांध ते दोन नंबर बंधाऱ्यापर्यंत किती अंतर होणार, खर्च किती येणार याची पडताळणी करून जे अधिकारी पथक वाडेकुर्डीत येऊन गेले होते, त्यानंतर आज पर्यंत हे अधिकारी फिरकलेच नाहीत. जलवाहिनी कागदावरही नाही अशी स्थिती झाली आहे. आजही महिना उलटला तरी ऊस मळ्यांना पाणी मिळत नाही. मे महिन्यात परत एकदा गतवर्षी सारखीच परिस्थिती निर्माण होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

यंदा तोडलेल्या ऊस मळ्याची रक्कम हाती पडताच कर्जाची रक्कम वजा होईल. जो काही नफा हातात पडणार होता, तो पाण्याविना ऊस शेती करपल्याने त्याची भरपाई अद्याप न मिळाल्याने खऱ्या अर्थाने ऊसमळ्या बरोबर शेतकरी करपून गेल्यासारखी स्थिती बनली आहे. यंदा संचारबंदीमुळे थकलेल्या ऊस उत्पादकांना वेळेवर नुकसान भरपाई द्यावी.
- आयेतीन मास्कारेन्हास (चेअरमन - कुर्डी व्ही. के. एस सोसायटी)

 

 

संबंधित बातम्या