गोव्यातील उन्हाळी क्रिकेट शिबिर डब्यात!

Dainik Gomantak
रविवार, 26 एप्रिल 2020

गोव्यातील उन्हाळी क्रिकेट शिबिर डब्यात!

पणजी,

गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) एप्रिल-मे महिन्याच्या कालावधीत १४ आणि १६ वर्षांखालील क्रिकेटपटूंच्या शिबिराचे नियोजन केले होते, पण कोरोना विषाणू लॉकडाऊनमुळे संभवित शिबिर डब्यात गेल्यातच जमा आहे.

जीसीएशी संबंधित एका प्रशिक्षकाने सांगितले, की ``मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर एप्रिल-मे महिन्यात १४ व १६ वर्षांखालील क्रिकेटपटूंच्या शिबिराचे नियोजन होते. जीसीएच्या १४ व १६ वर्षांखालील शालेय क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंनाही त्यात सामावून घेतले जाणार होते. आता ३ मेपर्यंत लॉकडाऊन आहे, त्यानंतर मुलांना शिबिरासाठी कमी कालावधी मिळेल. कोरोना विषाणूच्या धास्तीमुळे पालकही मुलांना लॉकडाऊन संपल्यानंतर लगेच शिबिरास पाठवण्यास तयार होतील असे वाटत नाही. सध्या जीसीएचे प्रशासनही ठप्प आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद नाही. आम्ही संघटना प्रशासनाच्या सूचनेची वाट पाहत आहोत.``

पाऊस सुरू झाल्यानंतर जीसीएला युवा क्रिकेटपटूंचे आऊटडोअर शिबिर घेणे अवघडच असेल. त्यामुळे जुलै महिन्यात थेट खेळाडूंची तंदुरुस्ती तपासून इनडोअर शिबिर सुरू करावे लागेल. तोच एक पर्याय बाकी आहे, असे या प्रशिक्षकाने नमूद केले. तसे झाल्यास १४ व १६ वर्षांखालील क्रिकेटपटूंच्या तांत्रिक कौशल्याची पारख करणे शक्य नसेल आणि मुलांना सामने खेळण्याचाही सराव मिळणार नाही, असे हा प्रशिक्षक म्हणाला.

गोव्यातील युवा क्रिकेटपटू शारीरिक व मानसिकदृष्ट्या कमजोर असल्याचा अहवाल जीसीएला एका प्रशिक्षकाने सादर केला आहे. याविषयी उपाययोजना सुचविताना, खेळाडूंसाठी मोसमपूर्व शिबिर-मार्गदर्शनाचा सल्ला या प्रशिक्षकाने दिला आहे, पण यंदाचे उन्हाळी शिबिर रद्द होण्याची दाट शक्यता असल्यामुळे त्या प्रशिक्षकाने संघटनेला सादर केलेल्या अहवालावर उपाययोजना करणे अशक्य ठरणार असून हा अहवाल जीसीएच्या कार्यालयात धूळ खात पडू शकतो.

 

पालकांचे सहकार्य आवश्यक

जीसीएशी संबंधित आणखी एका प्रशिक्षकाने सांगितले, की ``लॉकडाऊननंतर युवा क्रिकेटपटूंचे लघु कालावधीसाठी शिबिर शक्य आहे, पण त्यासाठी संबंधित खेळाडूंच्या पालकांचे सहकार्य आवश्यक आहे. पालकांनी मुलांना मैदानावर पाठवले, तरच १५-२० दिवसांच्या कालावधीसाठी शिबिर शक्य होईल. तसेच झाल्यास पुढील मोसमातील १४ आणि १६ वर्षांखालील संघातील खेळाडूंची थोडाफार चाचपणी करणे शक्य होईल. यंदा १४ वर्षांखालील स्पर्धेत खेळलेले काही खेळाडू पुढील मोसमात १६ वर्षांखालील गटात असतील, त्यामुळे नव्या मोसमासाठी १४ वर्षांखालील खेळाडू हुडकणे शिबिरामुळे शक्य झाले असते. जीसीएचे हे शिबिर झाले नाही, तर नुकसान खेळाडूंचेच होईल.``

 गतमोसमातील १६ वर्षांखालील स्पर्धेत गोवा

- दक्षिण विभागीय विजय मर्चंट करंडक स्पर्धेत ६ सामने

- ३ अनिर्णित, ३ पराभव, ५ गुण, अनिर्णित लढतीत पुद्दूचेरीविरुद्ध डावात आघाडी

- सर्वाधिक धावसंख्या सर्वबाद ३०२ विरुद्ध पुद्दूचेरी (पर्वरी)

- नीचांकी धावसंख्या : सर्वबाद ४३ विरुद्ध केरळ (पर्वरी)

- शतक : १, सनथ नेवगी :  १३९ विरुद्ध पुद्दूचेरी (पर्वरी)

- डावात ५ बळी : २, फैझान सय्यद : ६-७४ विरुद्ध कर्नाटक (हुबळी), श्रेयश उसगावकर : ६-८७ विरुद्ध आंध्र (पर्वरी)

 

संबंधित बातम्या