टेबल टेनिसपटूंसाठी ऑनलाईन मार्गदर्शन

टेबल टेनिसपटूंसाठी ऑनलाईन मार्गदर्शन

पणजी ,

कोरोना विषाणू महामारी लॉकडाऊन कालावधीत टेबल टेनिसपटूंसाठी ऑनलाईन मार्गदर्शन लाभदायक ठरत असल्याचे मत गोवा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष व्हेरो नुनीस व सचिव सुरेश भांगी यांनी व्यक्त केले आहे.

व्हेरो हे गोव्याचे माजी राज्य विजेते खेळाडू आहेत. त्यांनी सांगितले, की ``टेबल टेनिसमध्ये तंदुरुस्ती, चपळता आणि फटके यांना अतीव महत्त्व असते. लॉकडाऊनमध्ये स्टेडियम बंद आहेत. या आव्हानावर मात करण्यासाठी भारतीय टेबल टेनिस महासंघाने भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) सहकार्याने १५ दिवसांचा प्रशिक्षक अभ्यासक्रम कार्यक्रम सुरू केला आहे. त्यात देशातील नावाजलेल्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे. केवळ प्रशिक्षकच नव्हे, तर काही खेळाडूही या प्रशिक्षक अभ्यासक्रम कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत.`` गोव्यातील टेबल टेनिसपटूंचे दैनंदिनी वेळापत्रक लॉकडाऊनमुळे कोलमडले असले, तरी विविध माध्यमांद्वारे राज्यस्तरीय प्रशिक्षक खेळाडूंना सकारात्मक राहण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करत आहेत, त्यांचा उत्साह वाढवत आहेत. राजा दयाळ हे यापैकीच एक प्रशिक्षक असल्याचे व्हेरो यांनी नमूद केले.

सुरेश भांगी यांच्या माहितीनुसार, लॉकडाऊन कालावधीत गोव्यातील बहुतांश टेबल टेनिसपटू विविध तंदुरुस्ती उपक्रमात व्यस्त आहेत. ऑनलाईन प्रशिक्षण माध्यमाचाही त्यांना लाभ होत आहे. नागेश वेरेकर, अंशुमन अगरवाल, खुशाल नाईक, त्रिशा वेर्लेकर आदी खेळाडू घरीच टेबलवर फटके आणि सर्व्हचा सराव करत आहेत. बहुतेक खेळाडूंनी लॉकडाऊनशी जुळवून घेतले आहे. घरसंकुलातच त्यांचा सराव सुरू आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, स्वतःच्या मागील सामन्यांचे व्हिडिओ पाहून चुकांची दुरुस्ती करण्याची संध खेळाडूंना लॉकडाऊनमध्ये मिळाली आहे.

आगळी स्पर्धा परिणामकारक

गोवा टेबल टेनिस संघटनेचे प्रसिद्धी समन्वयक संदीप हेबळे यांनी लॉकडाऊनमध्ये खेळाडूंसाठी आगळी स्पर्धा घेतली, जी खूपच परिणामकारक ठरली. ऑफ-कोर्टस लढती या आशयाची फोटोग्राफी स्पर्धा घेण्यात आली. ``या स्पर्धेद्वारे खेळाडू स्वतःला विविध प्रकारे कशा तऱ्हेने गुंतवून ठेवतो हे आम्हाला पाहायचे होते. त्यात १२ जणांनी भाग घेतला. त्यांच्यासाठी ऑफ कोर्टस जीवन खूपच आव्हानात्मक ठरले.`` असे हेबळे यांनी नमूद केले. नागेश राव सरदेसाई यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

``गोमंतकीय टेबल टेनिसपटूंनी केवळ राष्ट्रीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही यश प्राप्त केले आहे. नवोदित आणि उदयोन्मुख गुणवत्तेस खतपाणी घालणे आणि त्यातून पदक विजेत्यांची निर्मिती करणे हे आमचे ध्येय आहे. यासंदर्भात आम्ही सरकारला प्रस्ताव सादर केलेला आहे. सरकारकडून आवश्यक सहकार्य मिळेल आणि गोव्यातील टेबल टेनिस सुरळीत होण्याची आम्हाला आशा आहे.``

-सुरेश भांगी,

गोवा टेबल टेनिस संघटनेचे सचिव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com