गोव्यातील टेबल टेनिसमध्ये लॉकडाऊन चॅलेंज!

Dainik Gomantak
रविवार, 19 एप्रिल 2020

लॉकडाऊनमुळे गोव्यातील इनडोअर स्टेडियममधील टेबल टेनिस ठप्प असले, तरी राज्यातील खेळाडू सक्रिय आहेत. चॅलेंज (आव्हान) देत त्यांनी स्फूर्ती जागविली आहे.

पणजी,

लॉकडाऊनमुळे गोव्यातील इनडोअर स्टेडियममधील टेबल टेनिस ठप्प असले, तरी राज्यातील खेळाडू सक्रिय आहेत. चॅलेंज (आव्हान) देत त्यांनी स्फूर्ती जागविली आहे.

त्रिशा वेर्लेकर ही मडगावची गुणवान युवा टेबल टेनिसपटू आहे. राज्य टेबल टेनिस वर्तुळात तिच्या चॅलेंजचा सध्या चांगलाच बोलबाला आहे. राज्यस्तरीय कॅडेट आणि सबज्युनियर मुलींत अव्वल मानांकित असलेल्या त्रिशाने हिमाचल प्रदेशमधील धरमशाला येथे झालेल्या ८१व्या राष्ट्रीय कॅडेट-सबज्युनियर टेबल टेनिस स्पर्धेत गोव्याचे नेतृत्व केले होते. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर त्रिशाने चॅलेंजच्या माध्यमातून स्वतःला, तसेच इतरांनाही सक्रिय केले.

त्रिशाने आव्हान देताना ऑनलाईन माध्यमाचा आधार घेतला. याकामी तिला वडील विक्रम वेर्लेकर यांचे सहकार्य लाभले. त्रिशाच्या आव्हान स्वीकारणे केवळ टेबल टेनिसपटूंनाच बंधनकारक नव्हते, तर इतरही प्रतिसाद देऊ शकत होते. प्रत्येकास आव्हान स्वीकारल्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल माध्यमावर अपलोड करून त्याचा साखळी निर्माण करणे आवश्यक होते. या खेळात कोणीच विजेता ठरत नव्हता किंवा पराभूत. सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर त्रिशाच्या आव्हानस जोरदार प्रतिसाद मिळाला. यामध्ये नियमित टेबल टेनिस खेळणारे सुरेश कारापूरकर यांचाही समावेश होता.

कारापूरकर यांनी त्रिशाचे आव्हान स्वीकारल्यानंतर सांगितले, की ``मी आव्हान स्वीकारले आणि एका बाजूने ४७१ टॉसेस केले. हे करताना मला खूपच एकाग्रता साधावी लागली, पण खूप आनंद मिळाला.`` सुरेश हे गोव्यातील मास्टर्स टेबल टेनिस संघटनेचे पदाधिकारी असून क्रीडा आयोजक व प्रमोटर म्हणून कार्यरत असतात.

कॅडेट गटातील गोव्याचा द्वितीय मानांकित खेळाडू खुशाल नाईक लॉकडाऊन काळात संगीतात रमला आहे. हार्मोनियम, तबला, पखवाज, घुमट ही वाद्ये वाजविण्यास शिकताना त्याने पारंगतताही मिळविली आहे.

 

अंशुमनचे तंदुरुस्तीस प्राधान्य

गोव्याचा अव्वल युवा टेबल टेनिसपटू अंशुमन अगरवाल याने लॉकडाऊन काळात तंदुरुस्तीस प्राधान्य दिले. सबज्युनियर व ज्युनियर मुलांच्या मानांकनात अंशुमन गोव्यात अग्रस्थानी असून राष्ट्रीय सबज्युनियर मानांकनात १६व्या क्रमांकावर आहे. तंदुरुस्तीस महत्त्व देताना अंशुमनने घरीच सराव सत्र सुरू केले. ``लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मी फिटनेसवर भर दिला आहे. सुरवातीची २० मिनिटे मी स्ट्रेचिंग व वार्मअप करतो. नंतर स्किपिंग आणि पुशअप्स काढतो. याशिवाय जेवण बनविण्याचा प्रयोग सुरू आहे. संध्याकाळी घरीच तबला वाजवतो,`` असे अंशुमनने सांगितले. गतमोसमात राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत अंशुमनने ब्राँझपदक जिंकले होते. त्याची खेलो इंडिया शिष्यवृत्तीसाठीही निवड झाली आहे.

संबंधित बातम्या