प्रतिभासंपन्न फॅशन डिझायनर - प्रतिभा धारगळकर

 Talented Fashion Designe Pratibha Dhargalkar
Talented Fashion Designe Pratibha Dhargalkar

डिचोलीः प्रबळ इच्छा आणि आवड असल्यास कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे डिचोली पालिका क्षेत्रातील लामगाव येथील ‘प्रतिभा’संपन्न फॅशन डिझायनर सौ. प्रतिभा प्रशांत धारगळकर (पूर्वाश्रमीच्या प्रतिभा शशिकांत देसाई).

आपल्या संसाराचा रथ हाकताना आजही त्या फॅशन डिझायनर या क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवून उभ्या आहेत. केवळ आवड म्हणून फॅशन डिझाईनर या क्षेत्राकडे वळलेल्या प्रतिभा या आज शहरातील एक प्रसिध्द फॅशन डिझायनर म्हणून परिचित आहेत. गिऱ्हाईकाला त्याच्या आवडीनुसार हवे तसे फॅशनेबल कपडे शिवून देण्यात प्रतिभा यांचा हातखंडा आहे. त्यामुळेच महिलावर्गात त्यांनी विश्वास संपादन केला आहे. आपल्या अंगातील कलेचा योग्यरितीने वापर केल्यास नावलौकीक तर प्राप्त होत असतोच. त्याचबरोबर स्वावलंबी बनता येते, असे प्रतिभा धारगळकर यांनी सांगून आजच्या युवा पिढीने केवळ नोकरीच्या मागे न धावता आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर (भवितव्य) घडवावे. असा सल्ला त्यांनी दिला.

मोठी बहीण फॅन्सी कपडे शिवत होती. कॉलेजमध्ये जाताना बहिणीने शिवलेले कपडे वापरू लागले. त्या फॅन्सी कपड्यांमुळे कॉलेजमधील मित्रमैत्रिणींत प्रशंसा होऊ लागली. त्यातूनच फॅशनेबल कपड्यांबद्दल आवड निर्माण झाली. आपल्याप्रमाणेच इतरांनीही फॅशनेबल कपडे वापरावेत. असे वाटू लागल्याने आपणही फॅशन डिझाईनर व्हावे, अशी प्रतिभा हिने मनात इच्छा बाळगली आणि मग बारावी वाणिज्यपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयटीआयमधून टेलरींग (शिलाई) अभ्यासक्रम पूर्ण केला. टेलंरींग अभ्यासक्रमात प्रथम वर्गात उत्तीर्ण झाल्यानंतर प्रतिभा हिने दादर-मुंबई येथे फॅशन डिझायनर हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर घरी टेलरींगचा व्यवसाय सुरू करतानाच टेलरींगचे प्रशिक्षण देण्यास सुरवात केली आणि गावातील बऱ्याच युवतींना शिलाईकामाचे प्रशिक्षण दिले.

घरच्यांचे प्रोत्साहन आणि सहकार्य मिळाल्यास आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होता येते. हे साहजिकच आहे. लग्नापूर्वी आपणाला आई आणि लहान बहिणीकडून पाठिंबा आणि सहकार्य मिळाले. लग्नानंतर या क्षेत्रात पती आणि सासरच्या मंडळीकडून पाठिंबा आणि सहकार्य मिळत गेले. त्यामुळे आपण फॅशन डिझायनर या क्षेत्रात स्थिरावू शकले, असे प्रतिभा धारगळकर अभिमानाने सांगतात. प्रत्येकाला व्यवसायात वा एखाद्या कलेत चढउतार आणि बऱ्यावाईट गोष्टींचा अनुभव येत असतो.

आपणही या गोष्टींचा अनुभव घेतलाय. फॅशन शो आदी कार्यक्रमासाठी आपण अनेकांना फॅशनेबल कपडे शिवून दिलेले आहेत. मात्र, गरजेच्यावेळी एका गरीब कुटुंबातील ख्रिश्‍नच धर्मीय मुलीच्या लग्नावेळी स्व:त कापड आणून काही तासातच नववधूला आवश्‍यक ते कपडे शिवून दिलेत. या आपल्या जीवनातील आतापर्यंतचा न विसरण्यासारखा क्षण आहे, असे प्रतिभा धारगळकर सांगतात. महिलांना आज वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी आहे. त्या संधीचा फायदा घेऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात नाव कमवावे, असा संदेश त्यांनी महिलादिनानिमित्त दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com