टँकर अपघातात दोनजण जखमी

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

टँकर पलटी होऊन दोघे जखमी

शमेचे अडवण येथील घटना : उतरणीवर चालकाचा ताबा सुटल्‍याने अपघात

पेडणे : शमेचे अडवण येथे आज दुपारी पाण्याचा टॅंकर पलटा होउन चालक व क्लिनर गंभीररीत्या जखमी झाले आहेत. चालकाला बांबोळी येथे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात तर क्लिनरला म्हापसा येथील आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

मोप विमानतळाच्या बांधकामासाठी पाणीपुरवठा करून परतताना उतरणीवर चालकाचा ताबा गेल्याने हा अपघात झाला.

सविस्तर माहितीनुसार, ए. पी. ०७ - एक्स ४७२५ या क्रमांकाचा टॅंकर येथे सुरू झालेल्या विमानतळ प्रकल्पाच्या बांधकामासाठी पाणी पोहचवून परत जात असताना चालकाचा ताबा गेला व रस्त्याजवळ असलेल्या वीजेच्या खांबाला धडक देऊन पलटी झाला. त्यात टॅंकरचा चालक सपन महंतो (वय ३०, मुळ झारखंड) व जवळ बसलेला व्यवसायाने चालक असलेला दयाळकुमार महंतो (वय २३, दोघेही मूळ झारखंड) गंभीररीत्या जखमी झाले. तर विजेचा खांब मोडून पडला.

जखमी चालकाला उपचारासाठी बांबोळी येथे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात तर दयाळकुमार महंतो याला म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हवालदार आनंद परब यांनी अपघाताचा पंचनामा केला. पेडणे पोलीस ठाण्याचे संदेश यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आनंद परब पुढील तपास आहेत.

 

संबंधित बातम्या