प्राथमिक शिक्षक वेतनापासून वंचित

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

 शिक्षकांना अजूनही वेतन नाही. शिक्षण संचालकांची मनमानी, निषेध मोर्चाचा काँग्रेसचा इशारा

गोव्यातील प्राथमिक विभागातील शिक्षकांना मासिक वेतन अजूनही मिळालेले नाही. फेब्रुवारीची ७ तारीख उटलून गेल्याने काही शिक्षकांनी काढलेल्या कर्जासाठी दिलेले धनादेश बँकेत न वटल्याने परत गेले आहेत.

पणजी : मुलांना विद्यार्जन करून देशाचे भविष्य घडविणाऱ्या गोव्यातील प्राथमिक शिक्षकांना जानेवारी महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाहीत. शिक्षण संचालकांना भेटण्यास गेलेल्या शिक्षकांनाही या अधिकाऱ्यांनी भेटण्यास नकार दिला. यासंदर्भात त्यांनी आर्थिक सचिवांशी संपर्क साधून चौकशी करण्याचीही तसदी घेतली नाही. शिक्षकांवरील अन्याय त्यांनी सोडविला नाही, तर काँग्रेसतर्फे त्यांच्याविरुद्ध निषेध मोर्चा काढून कार्यालयात धडक देऊ, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन भंडारी यांनी दिला आहे.

त्यामुळे या शिक्षकांना कर्जापोटी दंड म्हणून ३ हजार रुपये बँकेने जादा घेतले आहे. सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने त्याचा फटका या प्राथमिक शिक्षकांना बसल्याचे या प्रकरणावरून दिसते. प्रथमच असा प्रकार या शिक्षकांच्या वेतनाबाबतही घडला आहे. शिक्षण खात्याचे मंत्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आहेत. शिक्षण खात्याच्या संचालक वंदना राव यांची शिक्षण क्षेत्रात कमालीच्या बाहेर मनमानी चालली आहे. शिक्षकांना त्या अपमानस्पद वागणूक देत असल्याने शिक्षण क्षेत्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षकांचे वेतन वेळेवर न मिळण्यास शिक्षणमंत्री असलेले मुख्यमंत्री सावंत हे पूर्णपणे जबाबदार आहेत. यापूर्वी शिक्षकांच्या मागण्या ते पूर्ण करण्यास अपयशी ठरलेले आहेत, असा भंडारी यांनी आरोप केला आहे.

पुढील दोन दिवस (शनिवार व रविवार) राज्यातील बँका बंद आहे. त्यामुळे या प्राथमिक शिक्षकांना आणखी काही दिवस वेतनासाठी वाट पाहावी लागणार आहे. या शिक्षक कर्मचाऱ्यांवरील अन्यायाबाबत मुख्यमंत्र्यांनी शिक्षण संचालक वंदना राव यांना जाब विचारून कारवाई करावी. त्या अल्पसंख्यांक शिक्षण संस्थांवर अन्याय करून लक्ष्य ठरवत आहे. हे वेतन शिक्षकांना त्वरित मिळावे यासाठी प्रयत्न करण्याची मागणी काँग्रेसतर्फे करण्यात येत आहे. येत्या सोमवारी हे वेतन शिक्षकांना न मिळाल्यास काँग्रेसतर्फे पर्वरीतील शिक्षण खात्याच्या कार्यालयावर धडक निषेध मोर्चा काँग्रेसतर्फे काढण्यात येईल, अशी माहिती भंडारी यांनी दिली.

 

विद्यार्थ्यांनी वाहतूक शिस्तीचे धडे इतरांना द्यावेत

संबंधित बातम्या