शिक्षक राहणार विद्यार्थ्यांच्या संपर्कात

Dainik Gomantak
मंगळवार, 14 एप्रिल 2020

शिक्षण खात्याने परिपत्रकात म्हटले आहे की दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक परीक्षेच्या आधी दहा दिवस जाहीर केले जाणार असले तरी परीक्षा कधी होणार या विषयी अनिश्चितता आहे.

पणजी,
दहावीतील विद्यार्थ्यांचे मनोधैर्य कायम ठेवण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सातत्याने इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून संपर्कात रहावे असे परिपत्रक शिक्षण खात्याने जारी केले आहे. दुसऱ्या परिपत्रकातून शैक्षणिक संस्थांतील कर्मचाऱ्यांनी १५ एप्रिलपासून कामावर येणे बंधनकारक केले आहे.
शिक्षण खात्याने परिपत्रकात म्हटले आहे की दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक परीक्षेच्या आधी दहा दिवस जाहीर केले जाणार असले तरी परीक्षा कधी होणार या विषयी अनिश्चितता आहे. या काळात विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा यासाठी पालक व शिक्षक यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांची मानसिकता दोलायमान झालेली असू शकते. यासाठी प्रत्येक विद्यालयाच्या प्रमुखांनी दहावीतील विद्यार्थ्यांशी शिक्षक संपर्कात असतील असे पाहिले पाहिजे. त्या विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार शिक्षकांनी मार्गदर्शन करत रहावे.
दरम्यान, शैक्षणिक संस्थांतील कर्मचाऱ्यांनी संस्था प्रमुखांनी ठरवल्यानुसार १५ एप्रिलपासून कामावर यावे असे शिक्षण खात्याने म्हटले आहे. एकावेळी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावर बोलवू नये. कामावर बोलावलेल्यांना सकाळी ८ ते दुपारी १२, सकाळी ९ ते दुपारी १ आणि सकाळी साडेनऊ ते दुपारी दीड अशा तीन पाळ्यांत कामावर बोलवावे. घराकडून काम करणारे कर्मचारी दूरध्वनी व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून उपलब्ध असावेत. आजारी असलेल्यांनी डॉक्टरचे प्रमाणपत्र डिजीटल पद्धतीने उपलब्ध कऱावे. संस्थांनी हॅण्ड सॅनिटायझर्स, हॅण्ड वॉश उपलब्ध करावेत आणि समाज अंतर पाळले जाईल याची दक्षता घ्यावी.

goa goa goa 

संबंधित बातम्या