...म्‍हणूनच कोरोनाची लढाई जिंकता आली

तेजश्री कुंभार
बुधवार, 22 एप्रिल 2020

...म्‍हणूनच कोरोनाची लढाई जिंकता आली 

पणजी,

जगभरात ‘कोविड-१९’चा फैलाव व लोकांचे बळी जात असल्‍याचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्‍ही जानेवारी महिन्‍यापासूनच ‘कोविड-१९’ नियंत्रण आणि बचावासाठी सज्‍ज होतो. जानेवारी महिन्‍यात राज्‍यात एकही रुग्‍ण सापडला नाही. तरीही ११३ हा वॉर्ड आयसोलेशन वॉर्ड म्‍हणून तैनात ठेवला होता. ३० रुग्‍णांची क्षमता असणारा हा वॉर्ड पाहून केंद्रीय सचिवांनी ‘गोमेकॉ’च्‍या व्‍यवस्‍थापनाचे कौतुकही केले होते. आम्‍ही साधनसुविधांच्‍या बाबतीत ठेवलेली तयारी आम्‍हाला राज्‍यात रुग्‍ण सापडल्‍यानंतर उपयोगी पडली. म्‍हणूनच आम्‍ही ही लढाई जिंकू शकलो, अशी प्रतिक्रिया ‘गोमेकॉ’चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली. 
‘कोरोना-१९’ लढ्यासाठी आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजित राणे यांचा आम्‍हाला भक्‍कम पाठिंबा लाभला. २६ मार्च रोजी तीन कोरोनाग्रस्‍तांची नोंद झाल्‍यानंतर रुग्‍णांची संख्‍या वाढू लागली. त्‍यानंतर या रुग्‍णांना वेगळे ठेवणे आवश्‍‍यक वाटू लागल्‍याने मडगावातील ‘ईएसआय’ रुग्‍णालयाला ‘कोरोना’ उपचार रुग्‍णालयाचे स्‍वरूप दिले. राज्‍यात व्‍हायरॉलॉजी लॅब सुरू करणे हे आमच्‍यासाठी आव्‍हान होते. याच कालावधीत आणखी एका आयसोलेशन कक्षाची गरज वाटली. त्‍यामुळे आम्‍ही १६ खाटांची व्‍यवस्‍था असणारा ‘११५ वॉर्ड’ एका रात्रीत सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत उभा केला. सध्‍या केंद्राकडून आलेल्‍या मार्गदर्शक तत्त्‍वानुसार कोरोनासदृश्‍‍य लक्षणे असणाऱ्या रुग्‍णांसाठी एक वॉर्ड निर्माण करणे आवश्‍‍यक असल्‍याने आम्‍ही ‘१४८ वॉर्ड’ कार्यरत केला आहे. या वॉर्डमध्‍ये ट्रुनेट टेस्‍टींग सुविधा उपलब्‍ध आहे. अवघ्‍या दोन तासांत रुग्‍णाची कोरोना पडताळणी चाचणी शक्‍य असल्‍याचे डॉ. बांदेकर यांनी सांगितले.  
‘कोविड-१९’विरुद्ध लढा देण्‍यासाठी त्‍याचा प्रसार कसा होतो, याबाबत आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजित राणे यांच्‍यासह मी आणि माझ्‍या टीमनेही अतिशय चांगले संशोधन केले होते. त्‍यामुळे आम्‍ही संशयित रुग्‍णांनाही इतर रुग्‍णांच्‍या संपर्कात आणणे कटाक्षाने टाळले. अगदी कोरोना संशयितांचे वॉर्डही इतर वॉर्डपेक्षा वेगळे होते. इतर राज्‍यांत आणि देशात असणारी परिस्‍थिती आम्‍ही पाहत होतो. त्‍यामुळे गोमंतकीय जनतेची जबाबदारी आमच्‍यावर असल्‍याची जाणीव आम्‍हाला होती आणि म्‍हणून रात्रंदिवस झटून काम केल्‍याचे गोमेकॉचे अधीक्षक डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले. 
व्‍हेंटिलेटरची असणारी आवश्‍‍यकता आम्‍हाला माहीत होती. त्‍यामुळे मी पुढाकार घेत आणि आरोग्‍यमंत्री राणे यांच्‍या सहयोगाने आणखी ८ व्‍हेंटिलेटर आणण्‍यात यश मिळविले. सध्‍या मडगाव येथील ईएसआय रुग्‍णालयात सुमारे २० लोकांचा कर्मचारी वर्ग आहे. गोमेकॉतील व्‍यवस्‍थापनही आम्‍ही या कालावधीसाठी वेगळे केले असून कोरोना संशयितांना पूर्णपणे विलगीकृत ठेवत इतर रुग्‍णांवर उपचार करण्‍याचे कामही दुसऱ्या बाजूला आम्‍ही करीत असल्‍याचे डॉ. बांदेकर म्‍हणाले. 
वैद्यकीय अधीक्षक या नात्‍याने सर्वांना एकत्रित बांधून ठेवण्‍याचेही कार्य मला करायचे होते. आरोग्‍यमंत्री राणे आणि आरोग्‍यसचिव यांच्‍यासह एकमेकांच्‍या सहयोगाने आम्‍ही ही लढाई जिंकली आणि देशातील कोरोनामुक्‍त पहिले राज्‍य म्‍हणून आपला नावलौकिक झाल्‍याचे डॉ. बांदेकर म्‍हणाले. 
 

संबंधित बातम्या