...तर तारवटी आणि गोमंतकीयही सुरक्षित

Dainik Gomantak
मंगळवार, 21 एप्रिल 2020

...तर तारवटी आणि गोमंतकीयही सुरक्षित

तेजश्री कुंभार
पणजी,

राज्‍याबाहेर अडकलेल्‍या तारवटींची संख्‍या साडेसात हजारपेक्षा अधिक आहे. योग्‍य नियोजन, पुरेशी विलगीकरण व्‍यवस्‍था आणि येथील वैद्यकीय कर्मचाऱ्‍यांना सुरक्षा देत जर त्‍यांची संख्‍या वाढविली, तर तारवटींच्‍या सुरक्षेसह राज्‍यवासीयांची सुरक्षा करणे शक्‍य होणार आहे. मोठ मोठ्या वास्‍तूंचा उपयोग योग्‍य सामाजिक अंतर बाळगत केला तर आरोग्‍य तपासण्‍या, त्‍यांच्‍या आरोग्‍याच्‍या चाचण्‍या करीत संबंधितांना त्‍यांच्‍या शारिरीक लक्षणांवरून वैद्यकीय सेवा पुरविणे सुलभ होईल. 
कोविड - १९ च्या रुग्णांसाठी क्वारंटाईनमध्ये ठेवण्याच्या दृष्टीने  सोय व्हावी यासाठी राज्य सरकारकडून २०० हॉटेलमधील २० हजार खोल्यांची सोय करण्यात येणार आहे. या विषयाशी संबंधित नावांची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली असून या खोल्यांच्या निवडीसंबंधी अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यावर अंमलबजावणी करण्याविषयीचा आदेश जारी होणार आहे. 
गोव्‍याबाहेरील तारवटींना टप्‍प्‍याटप्‍याने आणून त्‍यांचे विलगीकरण करणे शक्‍य तर आहेच. मात्र, ते जेथून येत आहेत, तेथून राज्‍यात येईपर्यंत आणि राज्‍यात आल्‍यानंतर त्‍यांचे विलगीकरण होईपर्यंत त्‍यांना योग्‍य मास्‍क, सॅनिटायझरची व्‍यवस्‍था करून देणे किंवा जर तशी व्‍यवस्‍था पुर्ववत कार्यरत असेल तर त्‍या व्‍यवस्‍थेची पडताळणी करण्‍याचे कामही सरकारने करायला हवे. 
हॉटस्‍पॉट समजल्‍या जाणाऱ्‍या देशातून म्‍हणजेच इटली, चीन, अमेरिका यासारख्‍या देशातून जर हे तारवटी असतील तर त्‍यावरून त्‍यांच्‍या विलगीकरणाचा कालावधी ठरायला हवा. मार्गदर्शक तत्‍वांनुसार त्‍यांच्‍या शारिरीक लक्षणांवर आधारित हा कालावधी १४ अथवा २८ दिवसांचा ठरवावा. जे तारवटी कोरोनाच्‍या बाबतीत अतिसंशयित आहेत, त्‍यांची व्‍यवस्‍था रूग्‍णालयात इतर तारवटींपासून अधिक दूर करावी. 
परदेशातून राज्यात परतणाऱ्या सर्व गोमंतकीय खलाशांची कोविड-१९च्या दृष्टीने वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार असून या सर्व खलाशांना तुकडीच्या स्वरूपात आणून क्वारंटाईन केले जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले आहे. राणे यांनी असेही स्पष्ट केले आहे की आरोग्य खात्याला खलाशी आल्यानंतर सर्व आरोग्यविषयक सुविधा तयार ठेवण्यासाठी २१ दिवसांची नोटीस द्यावी लागणार आहे. अडकलेल्या गोमंतकीय खलाशांचा निश्चित असा आकडा अजून तरी उपलब्ध नसला तरी त्यांची संख्या ७ हजारच्या आसपास किंवा त्याच्यावरही असू शकते असा प्राथमिक अंदाज आहे.

हेही महत्त्‍वाचे...
तारवटींच्‍या कोरोना पडताळणी चाचण्‍या लवकरात लवकर होतील याची दक्षता घेणे महत्त्‍वाची आहे. ज्‍या चर्च, मंदिरांच्या निवासी खोल्या, शाळा, हॉटेल यासारख्‍या विलगीकरण कक्षात यांना ठेवण्‍यात येणार आहे, तेथे काम करणाऱ्‍या कर्मचाऱ्‍यांना आरोग्‍यविषयक सुविधा सुरक्षा कवच, मास्‍क, सॅनिटायझर म्‍हणजेच पीपीई (पर्सनल प्रोटेक्‍टिव्‍ह इक्‍विपमेंट) सुरक्षा साधणे असणे आवश्‍‍यक आहे. तारवटींच्‍या जेवणाची, औषधांच्‍या सोयीसह येथील आरोग्‍यविषयक साधनसुविधांचा आढावा त्‍यांना आणण्‍यापूर्वीच घेतला जाणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्‍वाचे कोरोना संशयित तारवटींना त्‍यांच्‍या घरच्‍यांपासून दूर ठेवण्‍यासाठी तत्‍परतेने काम करणारी व्‍यवस्‍था नेमणे आवश्‍‍यक आहे.

संबंधित बातम्या