तर दक्षिण गोव्यावर पाण्याचे संकट!

Dainik Gomantak
बुधवार, 15 जानेवारी 2020

शेळेप जलशुद्धीकरण प्रकल्प हा दक्षिणेतील महत्त्वाचा प्रकल्प आहे. पण, या प्रकल्पाची स्थिती पाहता सरकार या प्रकल्पाकडे गांभीर्याने पाहते की नाही, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. चार महिन्यांपूर्वी घटना घडूनही तुटलेल्या जलकुंभाच्या जागी नवा जलकुंभ बांधण्यासाठी उद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही.

मनोदय फडते

सांगे

दक्षिण गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या शेळपे येथील जल शुद्धीकरण प्रकल्पाची चाळीस एमएलडी पाणीसाठा साठवून ठेवणारी टाकी (जलकुंभ) सप्टेंबर महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसात जमीन खचून निकामी झाला होता. या ठिकाणी दुसऱ्याही जलकुंभाची तीच अवस्था झाली होती. परंतु पाऊस ओसरल्याने तिला हानी पोचली नाही. पण, चार महिन्यांपूर्वी ही घटना घडूनही सार्वजनिक बांधकाम खात्याने त्याकडे वेळीच लक्ष न दिल्याने दुसरा जलकुंभ निकामी होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे याचा दक्षिण गोव्यावर पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
शेळेप जलशुद्धीकरण प्रकल्प हा दक्षिणेतील महत्त्वाचा प्रकल्प आहे. पण, या प्रकल्पाची स्थिती पाहता सरकार या प्रकल्पाकडे गांभीर्याने पाहते की नाही, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. चार महिन्यांपूर्वी घटना घडूनही तुटलेल्या जलकुंभाच्या जागी नवा जलकुंभ बांधण्यासाठी उद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. कोसळलेल्या जलकुंभाच्या पायाखालची जमीन पावसाळ्यात खचल्याने जलकुंभ निकामी झाला, की जलकुंभाला गळती लागून खालच्या भागातील जमीन खचली हे शोधणे गरजेचे बनले आहे.
सार्वजनिक बांधकाम खाते घटना घडून चार महिने उलटले तरी वरिष्ठ पातळीवरून नवीन जलकुंभ बांधण्यासाठी तरतूद करीत नाही. दोन जलकुंभापैकी तुटलेल्या जलकुंभाखालची जमीन ही भरावाची आहे, तर शिल्लक जलकुंभ पक्क्या जमिनीवर आहे. आता परत त्याच ठिकाणी जलकुंभ बांधू गेल्यास कोसळलेल्या दरडीला पक्‍क्‍या स्वरूपात बांधकाम करून भरावला प्रथम आधार द्यावा लागणार आहे. त्यानंतर दोन्ही जलकुंभ नवीन बांधल्यास भविष्यात अशा घटना घडणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार.
चार टाक्यांमधून दक्षिण गोव्याला १६० एमएलडी पाणीपुरवठा होत असतो. त्यापैकी एक टाकी निकामी झाली. पावसाळ्यात टाकी कोसळली म्हणून पाणीपुरवठ्यावर परिणाम जाणवला नाही. परंतु आता उन्हाळा सुरू झाल्यावर त्याचा परिणाम दिसून येईल. अद्याप सार्वजनिक बांधकाम खात्याने हा प्रश्‍न गांभीर्याने घेतलेला नाही. आतापर्यंत तुटलेला जलकुंभ त्या जागेपासून हटवून नवीन जलकुंभ बांधण्याची तयारी करायला हवी होती. शिवाय कोसळलेली दरड परत बांधायला हवी आहे. चार महिने वाया घालविले. परत पावसाळा येण्यासाठी चार महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सरकारने वेळीच जागे होण्याची आवश्‍यकता आहे.

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज...
सार्वजनिक बांधकामत खात्याने तुटलेल्या जलकुंभाजागी नवीन जलकुंभ उभारण्याकरिता आतापर्यंत जर प्रामाणिकपणे हालचाली केल्या असत्या, तर चार महिन्यांपूर्वी कोसळलेला भूभाग किमान स्वच्छ तरी केला असता. पाणी खाते अत्यावश्‍यक सेवेकडे दुर्लक्ष करीत असल्याची धारणा नागरिकांत उत्पन्न होऊ लागली आहे. आता या प्रकरणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लक्ष घालून दक्षिण गोव्याला पाणीपुरवठ्याची उणीव भासण्यापूर्वी कोसळलेला जलकुंभ परत बांधण्याची योग्य ती काळजी घेण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

संबंधित बातम्या