तर सुदिन ढवळीकर यांचा राजकीय संन्यास

Dainik Gomantak
बुधवार, 22 जानेवारी 2020

कर्नाटक आणि केंद्र सरकारने म्हादईसंबंधीचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारला देऊन येत्या विधानसभा अधिवेशन सभागृहाच्‍या पटलावर ठेवल्यास आपण राजकीय निवृत्ती घेऊ, असे सुदिन ढवळीकर ठामपणे म्हणाले.

फोंडा

म्हादईचे गोव्यातील अस्तित्त्‍व टिकवून ठेवण्यासाठी कर्नाटक आणि केंद्र सरकारने जर न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून म्हादई ही गोव्याची आहे, असे गोवा सरकारला लेखी दिले आणि कर्नाटक सरकारला दिलेले परवाने रद्दबातल करताना कर्नाटकने आतापर्यंत वळवलेले सत्तावीस टक्के पाणी पुन्हा गोव्याकडे वळते केले, तर आपण राजकीय संन्यास घेईन, असे माजी उपमुख्यमंत्री तथा मगो पक्षाचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी जाहीर केले.
भारतीय जनता पक्षाचे काही नेते आपल्याला भाजपमध्ये प्रवेश करण्यासंबंधी सांगत आहे, त्यांना मला एकच सांगायचे आहे, इतर पक्षांत प्रवेश सोडाच, मी मगो पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. कर्नाटक आणि केंद्र सरकारने म्हादईसंबंधीचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारला देऊन येत्या विधानसभा अधिवेशन सभागृहाच्‍या पटलावर ठेवल्यास आपण राजकीय निवृत्ती घेऊ, असे सुदिन ढवळीकर यांनी ठामपणे म्हणाले.
केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आपण म्हादईचे आंदोलन छेडले नसून त्यात सर्व गोमंतकीयांचेच हित आहे. उद्या म्हादईचे पाणी पूर्णपणे रोखले तर गोव्यावर विपरित परिणाम होईल. गोव्यातील माणसांबरोबरच पशू पक्षी आणि निसर्गाचे अस्तित्वही धोक्‍यात येईल, म्हणून म्हादई लढ्याला मगो पक्षाने प्राधान्य दिले आहे. या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

‘सीएए’ महत्त्वाचे की म्हादई...?
सध्या ‘सीएए’चा विषय लावून धरण्यात आला आहे. पण, ज्या नदीवर गोव्याचे अस्तित्त्‍व आहे, ती नदीच जर नष्ट होत असेल तर ‘सीएए’ महत्त्वाचे की म्हादई बचाव आंदोलन महत्त्वाचे, हे राजकीय पुढाऱ्यांनीच ठरवायला हवे. म्हादई आंदोलनात सर्वांचा सहभाग म्हणूनच आवश्‍यक असल्याचे सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
 

संबंधित बातम्या