ना पतीचे अंत्‍यदर्शन, मुलगा चिताग्‍नी देण्‍यास मुकला!

Dainik Gomantak
गुरुवार, 16 एप्रिल 2020

आकस्मिक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सुनीलच्‍या पायाखालची वाळू घसरली. परिसरातील आपल्या मित्र मंडळी तसेच एका स्थानिक पत्रकाराच्या साहाय्‍याने सुनिलने मंगळवारी रात्री पणजीतील जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले व पित्याच्या अंत्यविधीसाठी जाण्यासाठी परवानगी मागितली. मात्र, अधिकाऱ्यांनी ‘नॉट-पॉसिबल’ असे उत्तर देत त्यांना माघारी पाठवले.

शिवोली, 

कोरोना महामारीविरुद्ध लढा देण्‍यासाठी राज्यात गेले २२ दिवस टाळेबंदी होती. आता ३ मे पर्यंत टाळेबंदीत वाढ केली आहे. या कालावधीत अनेकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वाडी- शिवोलीत राहणाऱ्या एका कर्नाटक येथील गृहिणीला टाळेबंदीचा मोठा फटका बसला. आकस्‍मिक निधन झालेल्‍या मृत पतीने अंत्‍यदर्शनही घेता आले नाही. त्यांचा एकुलता एक पुत्र सुनील चलवादी याला पित्याच्या चितेला अग्नी देण्याचे भाग्य न लाभल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी घडली.  
मूळ मुद्देबिहाळ- बीजापूर येथील चलवादी कुटुंब गेली अनेक वर्षे वाडी- शिवोलीत भाड्याच्या घरात वास्‍तव्‍य करून आहेत. मार्ना- शिवोलीत त्यांचा स्वत:चा व्यवसाय असल्याने सुनील चलवादी आपल्या आईसमवेत वाडी शिवोलीत राहात आहे. तर गावाकडील शेतीची देखभाल करण्यासाठी सुनीलचे वडील मुद्देबिहाळ-कर्नाटकात असायचे. शिवोलीत त्यांचे येणे-जाणे असायचे. राज्यात टाळेबंदी जाहीर होण्‍यापूर्वी महिनाभरापूर्वीच त्यांनी शिवोलीत येऊन आपल्या कुटुंबाची भेटही घेतली होती.
जिल्‍हाधिकाऱ्यांनाही विनंती केली, तरीही...
मंगळवारी दुपारी पाच वाजण्‍याच्‍या सुमारास सुनीलच्या वडिलांनी बिजापूर येथून आपल्या पत्नीशी (शिवोलीत) फोनवरून बोलणी केली व घरची खुशाली  कळविली. त्‍यानंतर सायंकाळी ६ वाजता सुनीलचा मोबाईल खणखणला तो वडिलांच्‍या मृत्‍यूची बातमी घेऊन. आकस्मिक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सुनीलच्‍या पायाखालची वाळू घसरली. परिसरातील आपल्या मित्र मंडळी तसेच एका स्थानिक पत्रकाराच्या साहाय्‍याने सुनिलने मंगळवारी रात्री पणजीतील जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले व पित्याच्या अंत्यविधीसाठी जाण्यासाठी परवानगी मागितली. मात्र, अधिकाऱ्यांनी ‘नॉट-पॉसिबल’ असे उत्तर देत त्यांना माघारी पाठवले.

 

संबंधित बातम्या