तर लोकसंख्या नोंदणीसाठी पुरावा देणार नाही!

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

आझाद मैदानावर ‘सीएए’ व ‘एनआरसी’विरोधात जमलेला हजारो लोकांचा समुदाय

आझाद मैदानावर हजारो नागरिकांची शपथ : ‘सीएए’ व ‘एनसीआर’ मागे घ्या

लोकांनी आज राजधानीतील या सभेसाठी हजेरी लावली.
‘गोवा अगेन्‍स्‍ट सीएए’ या संघटनेच्यावतीने आज पणजीत ‘सीएए’विरोधात कला अकादमी ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात आला. आझाद मैदानावर या मोर्चाचे सभेत रुपांतर करण्यात आले.

पणजी : नागरिकत्‍व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी (एनआरसी) हे कायदे मागे घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारे लोकसंख्या नोंदणीसाठी कागदपत्रे न देण्याची शपथ आज हजारो समुदायाने घेतली. ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’विरुद्ध पणजीत दुसऱ्यांदा हजारो जनसमुदायाने आझाद मैदानावर हजेरी लावत या कायद्यांना विरोध दर्शविला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या याप्रसंगी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाने ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ हे दोन्ही कायदे मागे घेतल्याशिवाय लोकसंख्या नोंदणीसाठी कोणताही पुरावा न देण्याचा आणि कायदे मागे घेईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची शपथ घेतली.

आसामातील लोकांचा छावणीत
आश्रय : ॲड. तपाडी

आसाममधून आलेले सर्वोच्च न्यायालयाचे वकील ॲड. ए. एस. तपाडी यांनी सुरवातीला ‘एनसीआर’मुळे आसाममधील लोकांना छावण्यांमध्ये का जावे लागले, याबाबतची माहिती दिली. ज्यांना ‘सीएए’ आणि ‘एनसीआर’चा अभ्यास करावयाचा आहे, त्यांनी आसामामधील लोकांची स्थिती पाहावी. हिंदू आणि मुस्लिम लोक निर्वासितांसाठी केलेल्या छावण्यांमध्ये का राहतात, कशामुळे त्यांच्यावर ती वेळ आली? ‘एनआरसी’ कायद्यात काय दोष आहेत, यावर त्यांनी स्पष्टीकरण करीत या कायद्यांविरुद्ध संघटित होऊनच लढा द्यावा लागणार आहे.

मान्‍यवरांची टीका...
ज्युलिया आगियार यांनी सांगितले की, ‘सीएए’ म्हणजे कसिनो दुरुस्ती कायदा, असा राज्यातील एका मंत्र्याला वाटते. दलित चळवळीचे कार्यकर्ते दादू मांद्रेकर यांनी सांगितले की, देशवासीयांना १९४७, १९६१ आणि आता तिसऱ्या स्वातंत्र्यासाठी लढा द्यावा लागणार आहे. ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’मुळे देश पारतंत्र्यांत पडला आहे. संविधान देशापेक्षा मोठे आहे, हे समजून घेतले पाहिजे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची विद्यार्थिनी आयेशा रैना हिने सांगितले की, जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याविषयी पोलिसांची भूमिका ही आवाज दाबणारी घटना आहे. केंद्रातील सरकारला हिंदू राष्ट्र बनविण्याचा हा प्रयत्न दिसतो. जोपर्यंत विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत तेथील आंदोलन सुरूच राहणार आहे.

राहुल सोनपिंपळे यांनी देशात भाजप सत्तेत आल्यापासून कोण देशभक्त आहे आणि कोण देशभक्त नाही, हा विषय सुरू झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) अजेंडा हा समाजात विषमता निर्माण करण्याचा आहे. ही संघटना सरकारी चौकटीत राहून काँक्रिटीकरणाचे काम करीत आहे. त्यांना हिंदू राष्ट्र बनवायचे आहे, हे समजून घेतले पाहिजे.

याप्रसंगी कुळ-मुंडकार संघटनेचे रामकृष्ण जल्मी, ॲड. नबिला हसन, आसिफ हुसेन, आर्थुर डिसोझा, प्रसेनजित ढगे, आल्बेटिना आल्मेदा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर रामा काणकोणकर यांनी प्रास्ताविक केले, तर प्रकाश कामत यांनी सूत्रसंचालन केले. रियाझ काद्री यांनी आभार मानले.

 

संबंधित बातम्या