डॉक्टरांच्या तीन पथकांनी केले कोविडवर उपचार

Dainik Gomantak
गुरुवार, 16 एप्रिल 2020

पहिल्या पथकातील डॉक्टर्सनी सात दिवस काम केल्यावर ते विलीगीकरण सुविधेत १४ दिवस रहिले, त्यानंतर दुसऱ्या पथकाने काम केले आणि तेही पथक १४ दिवसांच्या विलगीकरण सुविधेत सध्या आहे. सध्या कोविड रुग्णावर तिसरे पथक उपचार करत आहे.

पणजी,
गोव्यात कोविड १९ च्या संसर्गाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य सेवा संचालनालयाने राज्य कामगार वीमा इस्पितळात असलेल्या उपलब्ध डॉक्टरांची प्रत्येक पथकात सात डॉक्टर या प्रमाणे तीन पथके तयार केली. त्यांनी सात दिवसांच्या तीन पाळ्यांत काम करण्याचे नियोजन केले. त्या इस्पितळातील ७० पैकी २१ डॉक्टर वगळता इतर डॉक्टरांना सध्या राज्याच्या आरोग्य सेवेत घेण्यात आले असून त्यांना विविध ठिकाणी नियुक्त करण्यात येत आहे, अशी माहिती मिळाली आहे.
रुग्णांवर यशस्वी उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पहिल्या पथकात भूलतज्ज्ञ डॉ. ग्लाडवीन फर्नांडिस, छातीरोगतज्ज्ञ डॉ. राहूल प्रभुदेसाई, डॉ, मारूती नाईक, डॉ. फ्रांसिस्को परेरा, डॉ. लॉरा डिसोझा, डॉ. श्वेता लोटलीकर, डॉ. नंदीता रावत, डॉ. संगम नाडकर्णी व डॉ. फेसिल मिरांडा यांचा समावेश आहे. दुसऱ्या पथकात डॉ. विभव गुडे, डॉ. शिल्पा कांबळी, डॉ. रेश्मा खांडेपारकर, डॉ. अनंतप्रज्वता शिरोडकर, डॉ. सुचन गावकर, डॉ. कार्ला ब्रागांझा आणि डॉ. पूनम गावकर यांचा तर तिसऱ्या पथकात डॉ. दीपा नाडकर्णी, डॉ. मार्था फर्नांडिस, डॉ. स्मृती केणी, डॉ गायत्री जाधव, डॉ. विद्या तळेगावकर आणि डॉ. सुलक्षणा नाईक यांचा समावेश आहे. हे सारे जण सध्या घरी जाऊ शकत नाहीत. आपल्या कुटुंबियांना भेटू शकत नाहीत.
पहिल्या पथकातील डॉक्टर्सनी सात दिवस काम केल्यावर ते विलीगीकरण सुविधेत १४ दिवस रहिले, त्यानंतर दुसऱ्या पथकाने काम केले आणि तेही पथक १४ दिवसांच्या विलगीकरण सुविधेत सध्या आहे. सध्या कोविड रुग्णावर तिसरे पथक उपचार करत आहे.राज्यात कोविड १९ संसर्गाचे ७ रुग्ण होते. त्यापैकी ६ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या केवळ एका रुग्णावर कोविड इस्पितळात उपचार सुरु आहेत. आता कोविड इस्पितळ म्हणून नामकरण केलेले हे पूर्वीचे कामगार विमा इस्पितळ होय. त्या इस्पितळातील २१ डॉक्टर्स सध्या कोविड आपत्ती निवारणाचे काम करत आहेत. राज्य सरकरने या इस्पितळाचे प्रमुख म्हणून डॉ. एडवीन गोम्स यांना नेमले आहेत. ते तेथे काम करत असून एखाद दुसरा कनिष्ठ निवासी डॉक्टरही फेरी मारून जातो पण प्रत्यक्षात कामगार वीमा योजनेचे वीमा वैद्यकीय अधिकारी तेथे काम करत आहेत. ते डॉक्टर्स गेले महिनाभर घरी जाऊ शकलेले नाहीत आणि त्यांना घरी कधी जाता येईल हेही सांगता येणारे नाही. या इस्पितळाचा प्रशासकीय ताबा हॉस्पेसियोच्या वैद्यकीय अधीक्षक ईरा आल्मेदा यांच्याकडे गेला आहे. त्यांनी डॉ. पंढरीनाथ सावंत, डॉ. निर्मला वळवईकर, डॉ. मिता वेर्लेकर आणि डॉ. जेसुस कुलासो यांची नियुक्ती मडगावच्या हॉस्पेसियो इस्पितळात केली आहे.
दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड १९ महामारीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाखाली १५ मार्च रोजी हे इस्पितळ ताब्यात घेतले तेव्हापासून ७० डॉक्टर्ससह २०० कर्मचारी कोविड रुग्णांच्या सेवेसाठी उपल्बध झाले आहेत. आता त्या इस्पितळातील इतर डॉक्टर्सना राज्य आरोग्य सेवेंतर्गत इतर ठिकाणी नियुक्त करणे सुरु केले आहे. कामगार वीमा योजनेंतर राज्यात साडेचार लाख जणांची नोंदणी झालेली आहे. त्यांच्या सेवेसाठी १३ ठिकाणी दवाखाने सुरु ठेवण्यात आले आहेत. राज्य सरकारने बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवलेल्या काळातही हे दवाखाने सुरु होते, अशी माहिती मिळाली आहे.
या इस्पितळात काम करणाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी राज्याचे कामगार सचिव संजयकुमार, कामगार आयुक्त राजू गावस, कामगार मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी लक्ष्मीकांत नाईक आणि डॉ. अनिल चौहान यांचे कृतीदल स्थापन करण्यात आले. त्यांनी देशभरात जेथे उपलब्ध असतील तेथून वैयक्तीक आरोग्य सुरक्षा सुविधा मागवल्या आणि पुरवल्या आहेत. या इस्पितळातील चार वीमा वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनेगोवे येथील विलगीकरण कक्षात कोणी संशयित रुग्ण ठेवले तर त्यांची तपासणी करण्यासाठी नियुक्त केले आहेत. मडगावच्या छातीरोग इस्पितळात डॉ. राहूल प्रभुदेसाई यांना नेमण्यात आले आहे.
 

संबंधित बातम्या